*© श्रीधर संदेश*
*।। श्रीराम समर्थ ।।*
*चि. दिनकर यांस आशीर्वाद*
मी मंगळूरला आल्यानंतर तुझी २ पत्रे आली. श्रीधरकुटीच्या खर्चाकरिता ८०० रु. चि….. कडे दिले आहेत. सौ….. पण श्रीकाशीला गेली. आल्या-गेल्याचा व तिथे कायम राहणाऱ्या ७-८ माणसांच्या हिशोबाने तसेच त्यांना वस्त्राकरितां म्हणून पुढे मागे माझ्याजवळ पैसे उरतात किंवा नाही या दृष्टीने एकदम ते पैसे दिले. मला अफाट खर्च असतो त्यांतूनहि त्या त्या माणसांना सांगितलेली सेवा त्यानी केली नाही म्हणजे प्रसंगी पाद्यपूजेच्या पैशांतूनच देवादिकांचे काम पुरे करावे लागते. यावर्षी असेच झाले आहे. यावयाचा पैसा बराच आला नसल्यामुळे होते नव्हते ते सर्व पैसे खर्च होऊन हाती घेतलेले काम पाऊस लागावयाचे आंत पार पाडण्यास ५-६ हजाराचे कर्ज काढावे लागले. सध्या वद्दळीचे काम सुरू आहे. श्रीकरीकान परमेश्वरीचे काम पूर्ण झाले. त्या देवळाच्या बाबतीत एकंदरीत ८३ हजारापर्यंत खर्च झाला. एवढे खर्च करून केवळ देवळाचे कामच तेवढे पुरे झाले पुजाऱ्याकरता व येणाऱ्या जाणाऱ्या करता म्हणून अजून ३०-४० हजाराचे काम तसेच शिल्लक आहे. हे काम तिथल्या मंडळींकडे सोपवून मी मोकळा झालो आहे.
चि. … कडे श्रीधर कुटीच्या खर्चाकरितां पैसे दिले असल्यामुळे तिकडून आलेले पैसे तिकडे देण्याची आवश्यकता नाही, ते पैसे तसेंच जमा असू देत. त्याचे काय करावयाचे ते पुढे कळवीन जिकडे तुटवडा पडेल तिकडे त्याचा उपयोग करता येईल. चि….. ह्या येत्या पौणिमेच्या आत बाहेर गडावर येऊन पोहोचतीलच. वेदपाठ, आत्मपुराणादि कार्यक्रम चालू राहतील. माझी प्रकृति विश्रांतीने हळुहळु सुधारत आहे.
आपण तरून सर्वतोपरी आपल्या आचरणाने दुसऱ्यांनाहि तारक ठरणे म्हणजे आपला उद्धार करून घेणे आहे. शेवटी एक आनंदस्वरूपाहून इतर काहीच नाही हा अनुभव कायम होतो.
*’निरतिशयानन्दवाप्ति मोक्षस्य लक्षणम् ।’* पहा! जितके होईल तितके तुमचे जीवन दिव्य करा! तुमच्या भावना आणि क्रिया सर्व दृष्टीनेहि स्वपरतारक व्हाव्यात. समजून वागणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो.
*ये तु वत्ति विजानाति ज्ञात्वाऽपि वर्धयन्ति ये। ते वै संन्यासिनो धन्या वंद्यास्वे भुवनत्रये ।।*
*जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।* म्हणून जी काही उत्तम लक्षणे श्रीसमर्थानी सांगितली आहेत ती सर्व उत्तम लक्षणे तुम्हा सर्वांच्या ठिकाणी बाणू देत, अशी श्रीसमर्थांजवळ प्रार्थना करतो, सर्वास आशीर्वाद.
*सर्वे जनाः सुखिनो भवन्तु । इतिशम् ।*
*- श्रीधर*