Letters

पत्र.क्र. ६३

*© श्रीधर संदेश*

*।।श्रीराम समर्थ।।*
*मंगळूर ३०-१२-४५*

*स. भ. श्रीशिव समर्थदास यांस श्रीसमर्थचरणस्मरणपूर्वक आशीर्वाद.*

तुमचे पत्र पोहोचून आज २-३ दिवस झाले असतील. श्रीसमर्थ कार्यवाहक मंडळीकडून आलेल्या पत्राला यापूर्वीच पत्राचे उत्तर पाठवावयास पाहिजे होते याबद्दल मनः पूर्वक समर्थाची क्षमा मागतो. तुमची आठवण झाल्याबरोबर अगदी “सदा देवकाजी झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य वाचा।। स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य ती दास सर्वोत्तमाचा ।।” हा सबंध श्लोक बिनचूक आठवतो आणि गौरव वाटतो. राजसेवानिवृत होऊन आज तुम्ही त्याहून अत्यंत गौरवास्पद अशा श्रीसमर्थ सेवी तन-मन-धन आपले वाहिलेत नव्हे तुम्हाला या कार्यी श्रीसमर्थकार्यी श्रीपरमेश्वराने जे अधिकृत केले ते त्याच्या सर्वज्ञतेला अनुरूपच झाले. तुम्हाला पूर्ण सामर्थ्य देऊन व आयुष्य देऊन श्रीसर्वसमर्थ परमेश्वर आपले कार्य पूर्ण करून घेईलच, माझ्या प्रार्थनेची आवश्यकता नसली तरी मी प्रार्थना करतो.

बेंगळूर च्या अधिवेशनाला येणे बहुतेक शक्य होणार नाही. २-२।। महिन्याचा कार्यक्रम ठरला आहे त्या अवधीत मंगलूर सोडून जाता येणार नाही. अखिल श्री. रामदासीयांचे संमेलन कुठे भरावयाचे हे बेंगळूरास ठरेलच. श्री. देवाच्या मताप्रमाणे एकदा महाराष्ट्राच्या मुख्य स्थळांत भरवून मगच दक्षिण प्रांती भरविले तर योग्यच हाईल. इकडच्या प्रांती किती झाले तरी श्रीरामदासी मंडळी कमी. इकडे प्रचारहि फार नाही, मराठी भाषाहि नसल्यामुळे श्रीसमर्थग्रंथांची गोडीहि तितकी न वाटणे साहजिक आहे. हाती आलेलें नीट पदरी पाडून घेवून मग नवीनाकडे पहावे.

श्री देवांच्या कार्याने महाराष्ट्राची बरीच दृष्टी श्रीसमर्थाच्या शिकवणीकडे वळली आहे. श्री समर्थाकडे राष्ट्रगुरु म्हणून पाहाणारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तिकडे या अधिवेशनाचा बराच चांगला उपयोग होईल. श्री. देवांच्या मनातूनहि तसेंच आहे म्हणता त्यांच्या मनासारखे हि घडेल. नवतरुणांनाहि जोम येईल, श्रीसमर्थांना महाराष्ट्र जितका आपुलकीने बघेल तितकी आपुलकी अजून इकडच्या प्रांती उत्पन्न झाली नाही; पुढे होईल.

भवितव्य असल्याशिवाय तशी इच्छा तुमच्या सारख्यांच्या मनातून डोकावणार नाही. श्रीसज्जनगडाविषयीचे व श्री समर्थसांप्रदायाविषयीचे जे आदर्शात्मक भावी परमोत्कर्षाचे उज्वल चित्र तुम्ही आपल्या शब्दाने रेखाटलें आहे, ते त्या परमेश्वराकडूनच (तुमच्याद्वारे) झालेले भविष्यकथन असे समजतो.

‘महायत्न सावधपणें। प्रसंगी धारिष्ट धरणें। अद्भुतचि कार्य करणे ।’ हें ईश्वरी देणे आपल्याकडून चांगले कार्य करून घेवो. श्रीराम उपासना अर्थात श्रीसमर्थ सांप्रदायाची तत्त्वे ‘ब्रह्मांड भेदोती पैंलाड न्यावी’ हे होय, ही श्रीसमर्थाची आज्ञा प्रत्येकानें उराशी बाळगावी. प्रपंच-परमार्थाची गोड सांगड घालणारा श्री समर्थ सांप्रदाय जगालाच आदरणीय आहे त्याच्या थोरवीची जगाला जाणीव आणून देण्याचे पवित्र व तितकेच महत्त्वाचे जे कार्य आपल्याकडून होत आहे. त्याला पूर्ण यश येवो; म्हणून मी श्रीसमर्थचरणी प्रार्थना करणारा–

*श्रीधर*

home-last-sec-img