Letters

पत्र.क्र. ६४

*© श्रीधर संदेश*

*वाराणशी येथील श्री श्रीधरस्फूर्ति-निवासातील साधकास श्रींनी पाठवलेले एक पत्र*

*।।श्रीगुरुवे नमः ।।*
*सर्व खल्विदं ब्रह्मा*

*बाळांनो,*

तुम्ही सर्व स्वरूपाकार अशा अनंतानंत आनंदाच्याच साकार अशा भिन्न भिन्न प्रतिमा आहांत. सर्व विश्वाचा आनंद हेच एक सत्यरूप आहे. मनुष्य अज्ञानावस्थेत असता देहाचा आकार पाहून त्यालाच ज्या प्रमाणे ‘मी हाच आहे’ असें मानतो त्याचप्रमाणे आनन्दरूपाला ओळखून त्याला ‘मी हाच आहे आनंदरूपच मी आहे’, असे मानू लागतो.

आनन्दाशिवाय विश्वाचे इतर कोणतेही तात्विक स्वरूप उत्पन्न होऊच शकत नाही. *आनन्दो ब्रम्हेति न्यजानात् ।* आनंद हाच एकमेव परमात्मा आहे.

*आनंदाद्येव खल्विमानि भूतानि जायंते। आनन्देनैव जातानि जीवन्ति । आनन्दप्रयभिसंविषंति।”* सर्व प्राणिमात्र आनन्दामुळेच जीवित आहेत. समजून उमजून किंवा न समजता या आनन्दाकडे सर्व प्राणिमात्र आकर्षिले जातात आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा धरून साधन अनुष्ठानाने त्याची प्राप्ती झाल्यावर हे सर्व प्राणिजात त्यातच एकरूप होवून विलीन होतात. असा श्रुतिमातेचा आपल्या कडेवरील मुलांना उपदेश आहे. आनंदस्वरूपाची अभिलाषा हेच भक्ति-ज्ञान वैराग्य होय. यालाच ध्यानयोग म्हणतात. आनन्दरूपाची एकमेव अनुभूतिच असावी, आनन्दानुभवाशिवाय इतर कोणत्याहि वृत्तीचा उद्गम होवू न देणे हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे. आनंदमात्र स्थिति हीच खरोखर आत्मस्थिति होय. या भावरूप आनंदात एकमेव आनन्दाशिवाय इतर कोणाचेहि अस्तित्व असू शकत नाही. हेच प्राचीन असे विश्वाचे मंगलमय सत्यरूप आहे. अशा निश्चल, निर्विकल्प आनंदरूपाद्वारा तुम्ही सर्व तृप्त आणि कृतकृत्य होवून आपले जीवन सफल करा. या अविचल अशा आनंदाची प्राप्ति तुम्हा सर्वांना होवो.

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।’*

*तुम्हा सर्वांचा आनंदात्मा*
*श्रीधर*

home-last-sec-img