*© श्रीधर संदेश*
*माघ १८९३*
*॥ श्रीरामदास समर्थ ।।*
*श्री. निर्वाणजी*
*C/o सहदेवदासजी*
*हृषीकेश, डेराडून*
*स्वर्गाश्रम कार्तिक व॥ ११*
*ॐ नमो भगवते समर्थाय*
श्री बद्रिकाश्रमाहून विजयादशमीस निघून कार्तिक व।। ६ स स्वर्गाश्रमी येवून पोहोचलो. श्रीमहादेवजी नांवाचे एक संन्यासी वाटेत मिळून त्यांनी मोठ्या आदराने आपल्या स्थळी नेले. श्रीबद्रीनारायणांतच त्यांचा परिचय झाला होता. लोकांची चांगलीच निष्ठा यांच्यावर आहे. १०-१२ हजारापर्यंत खर्च करून बरीच शिवालये बांधली आहेत. अलमोडा, रानीखेत, नैनीताल या मागनि हलदवानी स्टेशन गाठले. मोटारीनेच हा संबध प्रवास झाला. हा प्रांत म्हणजे जणू काय सृष्टिसौंदर्ययुक्त स्थळांचे भरलेले एक प्रदर्शनच आहे.
भविष्यबद्री, ज्योतिबद्री, ध्यानबद्री, वृद्धबद्री (व) गोपेश्वरबद्री मिळून पंचबद्रीची यात्रा झाली. पुढे घोर कलीत विष्णुप्रयागाच्या पुढे असणारे समोरासमोरील दोन डोंगर मिळून जाऊन सध्याचा बद्रीचा मार्ग बंद होईल, त्यावेळेला भविष्यबद्रीचीच यात्रा सुरू होईल. ज्योति्रमठाहून हे क्षेत्र ७-८ मैलाच्या चढाईवर आहे. एका गर्द झाडीत भविष्यबद्रीचे देऊळ आहे. देऊळ फारच लहान आहे. गांव देवळापासून १।।-२ मैलावरच्या उतारावर आहे. पहाडी म्हणजे एतद्देशीय लोकाखेरीज विरळाच कोणी या यात्रेला जातो.
एक ते दीड फूटाची एक अस्पष्ट मूर्ति एका चिमुकल्या देवळांत आहे. ही म्हणे दिवसेंदिवस वाढते, अवयव अजून काही स्पष्ट दिसत नाहीत. अजून कितीसा काळ जावयाचा आहे. कोणाला माहीत ? तोपर्यंत पूर्ण तयारी होईल, नंदप्रयागाहून श्री महादेवजींच्या आश्रमाला जाण्यास १५-२० दिवस लागले. एकंदरीत बद्रिकाश्रम सोडल्यापासून यांच्या या स्थळी येऊन पोहोचण्यास एक महिना लागला रमतगमत आनंदात सावकाश येऊन पाहोचलो.
हृषीकेशाहून स्वर्गाश्रम सुमारे तीन मैल पायवाटेने होईल. मध्येच दीड मैलावर शिवानंद-आश्रमाजवळून नावेत बसून येता येते. तीनचार नांवा आहेत. सारख्या सायंकाळपर्यंत येऊन जाऊन असतात.
स्वर्गाश्रम हे एक साधकाला व सिद्धालाहि एकांतात विश्रांति घ्यावयाची झाल्यास सर्व दृष्टीनेहि फारच अनुकूल असे अति सुंदर स्थळ आहे. इथे एकांताला वनहि आहे. अंतरा-अंतरावर कुट्टया आहेत. मधूनमधुन चित्ताला शांति देणारी सुरम्य झाडी आहे. गंगाप्रवाह इथे अति संथ आहे त्यामुळे फारच चित्ताकर्षक आणि पवित्र भावना जागृत करणारा असा वाटतो काही केल्या इथून पाय निघत नाही, थोडे दिवस तरी इथे राहणे होणार असे वाटते. त्यातून *’ ईश्वरेच्छा। बलीयसी।’*
श्रीसमर्थकृपेने सर्वहि खुशाल असोत.
*सर्वांचा हितचिंतक*
*श्रीधर*