Letters

पत्र.क्र. ६७

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीरामसमर्थ ।।*

*मैसूर ३-७-४९*

*चि. xxxx यांस आशीर्वाद,*

चरित्रलेखनाविषयी चि. xx उगीच का डोक्याला त्रास देत आहे!

काळाला कलाटणी देणाऱ्या थोर विभूतींची लोकोत्तर परोपकाराची असामान्य महत्कार्ये विश्वालाच कशी हितकारी झाली हे दाखविण्याकरितां व इतरानिंहि त्यांच्या अमोल सद्गुणांचे उत्कृष्ट अनुकरण करावे म्हणून अशाच महान पुरुषांन चरित्र लिहावयाचे असते. लोकहिताकरिता अंत:करणाच्या कळकळीने झटणा-या अशा या महात्म्याचे दीर्घ प्रयत्नाचे अनलस पवित्र जीवन दुसऱ्यालाहि पण आदर्श होते. त्याची वागणूक म्हणजे श्रुतिस्मृतिपुराणांतून रेखाटलेले विश्वमान्य व्यक्तीचे सुंदर जीवनचित्र असते. ते या भवसमुद्रांत इतरांना नावेप्रमाणे उपयोगी ठरते *’महाजनो येन गतः स पन्थाः।* या न्यायाने अशांचे जीवनचरित्र म्हणजे धर्मरहस्याचा कूट प्रश्न उलगडून दाखविणारा तो एक सर्वोपयोगो धर्मग्रंथच झालेला असतो पावलोंपावली अशा थोर व्यक्तींचें वागणे म्हणजे परमात्मपदाकडे जाणारी ती एक सुलभ आणि पवित्र अशी पायवाट झालेली असते. म्हणूनच जवळची मंडळी त्याच्या प्रत्येक प्रसंगाची टांचणे करून ठेवतात आणि मग चरित्ररूपाने प्रसिद्ध करतात. अतर्क्य भविष्यकाळाचे गूढ योगायोग कसे असतात ते कोणालाही सांगता येत नाहीत. परमेश्वरप्रसादानें क्षणमात्रांत रंकाचा राव होतो. परमेश्वरी सामर्थ्य अनंत व अतर्क्य आहे.

मैसूरपासून १५ मैलावरच्या एकांत विजन स्थळांत चातुर्मास्य ठरला आहे. पत्र लिहावयास पुढे होणार नाही आणि दर्शन हि पण कोणाला नाही. अष्टेकर व नीळकंठ काशीकर माझ्या जवळ आहेत बाकी सर्व क्षेम.

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु’,*

*इतिशम्*
*श्रीधर*

home-last-sec-img