Letters

पत्र.क्र. ६८

*© श्रीधर संदेश*

*चिकमंगळूर*

*भाद्रपद शु।। ८ शके १८६५*

*सौ. राधाबाई पै यांना पाठवलेले पत्र*

प्रपंचाचा भार घालोनियां देवा । केलीस तूं सेवा मनोभावें । समर्थाचे ब्रीद उणे नोहे कदा । भक्तासी आपदा भवीं नोहे ।। योगक्षेम वाही भक्तांचा श्रीहरी । उणे तिळभरी पडो नेदी । गीता-भागवती केलें जें कथन । असत्य तें जाण नोहे कदा ।। १॥

समर्था समर्थ विश्वपाळ जो कां । दास त्याचा लोकां जाणवत । समर्थाच्या दासा हीनत्व जरी ये । कोणाचें तें जाय ब्रीद पाहो ।। माझे उणे साहे, भक्तांचे न साहे। भगवंत पाहे बोलियेला । देवे जरी केला भक्तांचा अव्हेर । कोण जगी थोर भक्ता त्राता ।।

बोलिल्यासारिखे मानव चालत । देव चुकवीत घडे केवीं । देव चुको नेणे, चुके देव जरी । धर्मा जगीं वाव कोठे आहे । समर्थाचे ब्रीद समर्थे पाळावे । दासा उणे यावे नच कदा । नको करू चिंता पाळीत श्रीहरी । विश्वास हा धरी, भिऊ नको ।।

बहु अपराधी परी तव दीन । चरणीं मी लीन तुझ्या सदा । जैसा जळी मीन खेळे निशिदिनीं । क्रिडे मी चरणीं तेवीं तव ।। पराधिन मसीं करू नको ऐसे । पत्रीं तव दिसें अभिप्रावो । देवाचें स्वाधीन पराधीन व्हाया । कर्ज देवराया झाले नाही ।।४।।

अखंड चिंतन घालवी तूं काळ । तुज मायामळ लागो नेणे । अमृते मरण पावें हे न घडे । अनर्थ न जोडे भक्ता कदा ।। माता वधी बाळा निजप्राणासाठीं । भक्तप्राणासाठी देव भिणे । देवाची जी कीर्ती चाले आजवरी । पुढेहि संसारी चालतसे ।।५।।

कळवीन तुज कार्तिकाउपरी । चालवी तोवरी चालू सेवा ।।

*भगवान श्रीधर*

home-last-sec-img