*© श्रीधर संदेश*
*चिकमंगळूर शके १८६५*
*सौ. राधाबाई पै यांना पाठविलेले पत्र*
जीवीचे हे गुज सांगण्यासी तुज । लेखणी ही आज घेतलीसे ।
संसार प्रपंच स्वरूपी मी साच । उगीच हा जाच अज्ञान्यासी ।
मलरूपी देहा मानुनीयां मी हा । पुंस्त्री भावो पाहा विश्वरते ।
नको, नको, ऐसी मलमूत्रमुशी। भोगाची असोसी नर्कवास ।।
क्षणही न भान देहाचें जै जाणा । भोगी ही न मन मोक्ष तोची ।।१।।
ओंगळ ही खोळ, मूर्तिमंत मळ । पांघरी सकळ मुर्ख प्राणी ।
सौंदर्याचा भाव प्रेमसुखा ठाव । घाणीमाजी धांव नाना फोगे ।।
अमंगळ भोगे किती प्रीतियोगें। वागवीत सांगे जीव देहा ।।
देहाची ही प्रीति भोगाची आसक्ती । नरकाची वस्ती अहर्निश ।।
घालविता मोह, देहाचा, भोगाचा। ठाव विश्रांतीचा निजी जीवा ।। २ll
जन्मोजन्मी देह विषयाचा मोह । वासनेचा दाह जीवा लागी ।।
विषयवासने जन्मासी हे येणे । विषयभोगणे जन्मोजन्मी ।
देवा विसरणे, सुखा आचवणें । दुःखी पहुडणे भोगेच्छे या ।।
देवाची विस्मृती जन्मदुःखाप्राप्ती । विषयी आसक्ती नरकवास ।।
मलमासघाणी, जयासी विरक्ती । तया होय मुक्ती सायुज्यता ll ३ ll
देहां नच भान वासनेचे मन । जन्म घेते जाण पुनःपुनः ।
देहाच्या आकारे मनचि हे सारें। भोग भोगी मरे जन्में भोगा ।
विषयाच्या नेटें पुंस्त्री रूपं नटे । विषयाचा थाटे निर्मी भोगा ।।
पुंस्त्रीभावे मग संसारिक भोग । भोग तोची रोग मनालागीं ।।
दुःख दुःख मना जै ये विचारणा । मुक्त होई जाणा तैं ते ज्ञाने ।। ४ll
पुंस्त्री देहा विटे, भोगे त्यागी नेटे । जग जाणे खोटे जन्म वाया।
पिंडास कारण ब्रह्मांड हे जाण । दुःखाचीचि खाण भासे सारे ।।
दृश्याची उत्पत्ती मानी ही विपत्ती। स्वरूप-संपत्ती नासें जेणे ।।
दृश्य सारे विरें, स्वरूपची स्फूरें । संसारीच हरें वारें सारें।
प्रपंचाचा भाग असंभव मग । निवृत्तीचा मार्ग धरी सुखें ।l ५।।
स्वत:पूर्ण नित्य निर्विकारी सत्य । तेथें जगत्कृत्य नोहें कदा ।।
कार्य तेंची रूप, रूप तेंची माप । कारण अमूप अरूपची ।।
अरूपी हे रूप, अमूपी हे माप । कारणासी लोप कोणे होये ।।
लोपे न कारण, जग, तें न जाण । जन्मे मरे कोण, कोण पुंस्त्री ।।
भोग कोणा कोणा, संसार हा जाणा । ऐसी विचारणा निवृत्तीची।l ६ ll
जाणीव ज्या नाहीं तेंची जड पाही । कार्य तें सर्वही जडरूप ।।
झाले जैं तें केलें, केल्यांत हे आलें । जग हे ही व्हाल नानारूपी ।।
चिन्मात्र कारण जड नव्हें जाण । जड कार्य कोण निर्मितसे ।।
चिन्मात्री न जड, माया हि लबाड । जगाचे थोतांड दावी भ्रमें ।।
चिन्मात्र कारण विकारे न जाण । तेंचि मी ही खूण निवृत्तीची ।।७ll
कारण विकारें कार्य केवी ठरे । कार्य उरें सारें कारणेंची ।
निर्विकारें खरें कारण जै उरे । कार्य केवि स्थिरें कारणांत ।।
अद्वय कारणीं कार्य कोण वानी । म यीक करणी भ्रमरूप ।।
सर्व कार्य त्यागें कारणत्वें उगें । स्वस्थ राहो लागे विवेकी जो।।
झाले नाही काहीं, अद्वय मी राही । विचारणा पाही निवृत्तीची ।।८ll
‘अहं’ सर्व देहीं सामान्यते पाही । भिन्नत्व न काही ‘मी’ या मानी ।
एकत्वें जें भान उरतां न आन । आपणा आपण अद्वयत्वे ।।
देहबुद्धि चित्त इंद्रिये उन्मत्त । विषय समस्त न हे जग ।
आपणचि पाहे निजास्तित्वें पाहे । स्वप्रकाशे लाहे स्वसुखाची ॥
अन्याचा जै त्याग स्वरूपचि मग । निवृत्तीचा लाग ऐशापरी ।।९।।
जन्मदुःखा हारी, वासना निवारी । विज्ञाने उद्धरी सद्गुरु तो ।।
परमार्थासाठी सद्गुरूची भेटी । वासनेची दिठी घालविण्या ।।
वासनेचा खेळ घालवी समूळ । स्वरूप निर्मळ बोधोनिया ।।
मोक्षदाता गुरु सर्व भवतारू । निवृत्ति निर्धा ब्रह्मरूप ॥
ब्रह्मरूपीं नाहीं संसार तो कांहीं । भोगेच्छेने मोही भवपाश ||१०||
अमृत ते तारी अमृत ना मारी । सद्गुरु ना सारी प्रपंचात ।
कामज्वरें फार वासना विकार । निवृत्ति ही सार रचें न त्यां ।
संग्रहणी ज्यासी दुग्ध विषत्यागी । तक्र ची तयासी हितकर ।
तक्र देवोनीया वैद्य करी तया । योग्य तयी प्याया दुग्ध क्रमे ।।
आरोग्य जयासी दुग्धचि दे त्यासी । निवृत्तीच्या कुशी नित्य मोक्ष ।।११ll
*श्रीधरस्वामी*