*© श्रीधर संदेश*
*|।श्रीरामसमर्थ ।।*
*गिरनार वैशाख शु।।३* *महर्षिगुरुकुल, ब्रह्मचर्याश्रम*
*जुनागड, काठेवाड*
*असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ।। भावासारखा देव निश्चयेसी ।।*
*श्रीसमर्थ*
*भावेहि विद्यते देवः ।।*
आपले पत्र पावले, श्रीसमर्थ कृपेने आम्ही सुखरूप आहो. तुम्हीहि श्रीसमर्थकृपेनें सहकुटुंब सुखरूप असाल असा विश्वास बाळगतों. श्रीसमर्थांची तुमच्या समवेत तुमच्या कुटुंबावर पूर्ण कृपा होवो.
श्रीतारकमंत्राच्या अनुग्रहाची तीव्र उत्कंठा तुमच्या मनात दिसून आली. कशाची फारच तीव्र इच्छा झाली की मनाला चैन पडत नाही. सारखें मन तिकडेच ओढते, मनाला तीच चुटपुट लागून राहिल्यामुळे शान्ति समाधान लाभत नाही.
जेणें जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गुण गातो।। बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे । परी अंतरी नामविश्वास तेथे ।। राम जिवाचा जिव्हाळा । राम मनाचा कोवळा । राम जाणे अंत:कळा । निजदासाची सुरवरांचा कोवसा । राम मंडन सूर्यवंशा । रामजप भजनीशा । सप्रेम चित्त रामनामी । नामें तारिले पाषाण । नाम पतीतपावन । नामें मुक्त विश्वजन । शिवाचेनि उपदेशे करूनी ।। नाम जिव्हा जपे जयाची।। तेथें प्राप्ती काय काळाची । आदि करूनि विरंची । विपरीत करून शके ।। राम माझाचि नाही नेमिला । जे जे शरण गेले त्याचाचि जाला । परी रामासारिखा स्वामी फावला । तेचि धन्य संसारी । राम सकळ प्राणिमात्रांचा । आणि कैवारी देवांचा । ऋषिश्वरांचा सारथि अडलियांचा। समयीं आपंगी।।
आताही जयास वाटे भेटावे । रामे मज सांभाळित जावे । ऐसे दृढ घेतले जीवें । तरी एका मी मागेन । श्रीराम जय राम जयजयराम । ऐसा काहीं एक करुनियां नेम । जप कीजे तेणें आत्माराम । जोडे नियमे ।। ऐसे अखंड नाम स्मरावे । परी दूसरियासि कळो नेदावे। निदिध्यास लागलिया राघवे । पाहिजे तात्काळ ।।” ( एकवीस समासी)
श्री समर्थानी अशा त-हेने सर्वानाच तारक मंत्राचा उपदेश देऊन ठेविला आहे.
‘आज्ञेप्रमाणे परमार्थ। केला जाण मी यथार्थ।।आता एकचि मागणे कृपा करुनियां येणे।। ज्याची दर्शनाची इच्छा । त्याची पुरवावी वांच्छा।।’
*या श्रीसमर्थाच्या अगदी निर्याणाच्या वेळच्या मागणीला प्रभु श्री रामचंद्र उत्तर देतात, “ ऐक सखया वचन । त्यासी देईन दर्शन ।। येता जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र होता ॥* जपसंख्या मात्र तेरा कोटीची आहे. बहु बोलिलो म्हणोनि, श्रीसमर्थांच्या मनात कांहीं अन्य येईल असे जाणून *’मज न लगे आसनी बसावे । न लगे अन्नहि त्यागावे ।’* अशी त्याची सुगमता स्पष्ट करुन दाखविली आहे.
‘अखंडीत भेटी रघुराज योगू । मना सांडि रे मीपणाचा वियोगू ।।’ ‘समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे । सदा सर्वदा नाम वाचे वदावे ।। म्हणून अखंड नामस्मरण मुखीं असो द्यावे. दर्शनाची तरी कामना का बाळगावी? त्यानेहि मन अशांत होते. *नभी वावरे जो अणुरेणू काही । रिता ठाव या राघवेवीण नाहीं । तया पाहता पाहता तेचि जाले । तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले । नभासारिखे रूप या राघवाचे । मनीं चिंतिता मूळ तूटे भवाचे ।। तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदासर्वदा आर्त पोटी पुरेना ।। नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे । रघुनायका उपमा ते न साहे । दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे । तया व्यापकु व्यार्थ कसे म्हणावे ।।* कोणचीच कामना मनांत न बाळगता आनंदाने सर्वकाळ नामस्मरण करावे.
श्रींच्या समाधीपासून अनुग्रह घेण्याची हि एक सर्वोत्कृष्ट प्रथा आहे. ‘शुभं च शीघ्र’ या न्यायाने याप्रमाणे मनांत आले तर नि:शंक करावे, मीहि श्रीचरण तळवटी आहे चि.xxxxस विचारले तर तो या विधानाची माहिती देईल. पुष्कळ च लोक दरवर्षी असा अनुग्रह घेतात
‘काहीतरी पुढे करून टाळतात ‘ अशी मात्र भावना करूं नये अंतःकरणांत असे थोडेसुद्धा नाही जसे गोड वाटेल तसे करावे आग्रह कोणचाच नाही.
‘येथें साक्ष आपुले मन ।’
*प्रसन्नो भूयात् श्री भगवान समर्थ*
*श्रीधर*