Letters

पत्र.क्र. ७३

*© श्रीधर संदेश*

*श्री अय्याबुवा यांना पत्र*

*श्री बद्रिकाश्रम*
*भाद्रपद शु।। १५*

*।।श्रीरामदाससमर्थ ।।*

*ॐ नमो भगवते श्रीसमर्थाय,*

चातुर्मासाच्या पूर्णतेचा हा दिवस, आपले पत्र पोहोंचून ७-८ दिवस झाले असतील, चातुर्मास संपल्यानंतरच उत्तर पाठवू म्हणून मनात आल्यामुळे थोडासा उशीर झाला.

आपल्या वचनाप्रमाणे श्रीसमर्थाच्या कृपेने काहीहि कमी पडले नाही. या दोन महिन्यांत भक्तमंडळीकडून १२७५ रुपये तारेने आले. यांतून माझ्या गुहेच्या आसपास राहणा-या संन्याशांची भिक्षेची सोय करण्यांत आली. थंडीत इथे चहा न प्याल्यास हागवण लागत असल्यामुळे विजयादशमीपर्यंत त्यांच्या चहाचीहि सोय यातूनच झाली. शिवाय दीनदुबळयांची, म्हाताऱ्या- कोताऱ्यांची अाजाऱ्यां-पाजाऱ्यांची बरीच सोय अन्न, वस्त्र, वाटखर्च, अनुपान वगैरे मुखाने श्रीसमर्थ कृपेने या पैशांतूनच झाली. अतिशय महागाई; नुसत्या एकशेर पिठाला दोन रुपये द्यावे लागतात. श्रीसमर्थकृपेने माझ्यावर काहींची श्रद्धा असल्यामुळे मला सर्व सामान बऱ्यांच कमी किमतीत मिळाले. आज उद्यांच निघणार होतो पण विजयादशमीपर्यंत राहणे भाग आहे. भिक्षेची सोय केल्यामुळे मला तेथपर्यंत राहणे भाग आहे. कृष्णाष्टमी झाल्यानंतर येथील सारी अन्नछत्रे बंद होतात आणि साधुसंन्यासी वगैरे विरक्तांना भिक्षेच्या दृष्टीने फार त्रास होतो म्हणून बंद न करता आपले छत्र १५ दिवस जास्ती ठेवले आहे. पण त्यालाहि म्हणे पीठ मिळाले नाही. त्यामुळे त्याचाहि विशेष आधार यावर्षी साधु संताना नाही. श्रीसमर्थांची कृपा मला मात्र थोड्या दरात उत्तम गव्हाचे पीठ मिळाले आहे. अजून २-३ शे रुपये शिल्लक आहेत. आता साधुसंत मंडळीहि विशेष नाहीत . १५-१६ जण नेहमी राहणारे आहेत. कसेहि झाले तरी एवढे रुपये खुशाल पुरतील, नारायणाच्या मनांत त्यांची सोय अशारीतीने करावयाची असेल. श्रीसमर्थांची कृपा.

दिवसेदिवस थंडी जरी जास्त होत आहे तरी आमच्याजवळ बरेच कपडे असल्यामुळे निदान विजयादशमीपर्यंत तरी थंडीचा त्रास होणार नाही. आम्हा सर्वांची प्रकृति श्रीसमर्थ कृपेने उत्तम आहे मिरे, जेष्टमध, सुंठ वगैरे चांगले पाण्यात उकळून मी घेतो. बटाटे, पचण्यास हलके असे इकडे फराळाचे पीठ, काजू, बेदाणा, शेंगदाणा वगैरे वापरीत असल्यामुळे एक शेरभर दूध पुष्कळ होते. येथील मापी शेर तिकडच्यापेक्षा कमी भरतो. काजू, बेदाण्याचे पार्सल मंगळूरहून व शेंगदाण्याचे पार्सल साताऱ्याहून आले नाहे. एकशेर शेंगदाण्याला इथे चार रुपये आता पडतात.

इथे सध्या नुसती थंडी आहे. १५-२० दिवसांनी बर्फ पडावयास लागेल. बर्फाची हवा का एकदा सुरू झाली म्हणजे प्यावयास आणून ठेवलेले पाणी देखील गोठते म्हणतात. आश्विनाच्या शेवटच्या दिवसात बर्फावरूनच चालावे लागते . बर्फ पडण्याचे मान फार मोठे असल्यामुळे थोडा वेळ ऊन्ह पडले तरी त्याचा काही परिणाम दिसून येत नाही. गेल्या वर्षी या दिवसांतच बर्फाला सुरवात झाली होती असे सांगतात. या वर्षी अजून तितकी थंडी पडली नाही. पाऊसहि फार थोडा आहे चांगलेच उन्ह पडते. किती झाले तरी नावच हिमालय, चोहोबाजूच्या पर्वतशिखरावर मोठया प्रमाणांतच बर्फ पडलेला दिसतो रात्रंदिवस ही शिखरे बर्फाने झाकलेलीच असतात. ‘आपण वर’ आणि ‘आपण वर ‘ अशी जणू काय पैजच या पर्वतातून लागलेली दिसते गगनस्पर्धी अशा पर्वतांचे मोठे सुंदर दृश्य येथे पहावयास मिळते. सृष्टिसौंदर्याचे जणू काय प्रदर्शनच या दिवसांत भरलेले आहे असे वाटते झाले. या दहापंधरा दिवसानंतर थंडीने संबंध गवत जळून जाऊन जिथे तिथे काळ्याकुट्ट दगडाचीच मोठी भयाण अशी उतरंड पर्वताकार भासेल. थोडेसे पावसाचे थेंब पडत असलेले दिसतात न दिसतात तोंच बदबद बर्फ पडेल. वळचणीची धार पडत असता असताच थोडेसे उन्ह कमी झाले की तिथेच ती गोठेल. तोपर्यंत आम्ही कांही राहणार नाही. लोकांच्या तोंडून असे वर्णन ऐकले जाते. एखाद्या वर्षी इतकी थंडी तर एखाद्या वर्षी कार्तिक पर्यंत देखील चांगले कडक उन्ह असते आणि चैत्र वैशाखांत एकेका वर्षी म्हणे बर्फ पडावयास सुरवात होते भगवंताची लीला, असेच म्हणून या सृष्टीला एक नियम लावून सांगणे कोणालाहि शक्य नाही. ‘ ऐशी ही विचित्र-कळा त्याच्या मायेची ” आहे ” हे कैसे कैसे त्याचा तोचि जाणे”

“समर्था तुझे एक लेकरू दूर देशी” म्हणून श्रीसमर्थाजवळ माझी करुणा भाकावी. मी श्रीसमर्थ कृपेनें इकडे आनंदात आहे

श्री समर्थांची कृपा सर्वावर होवो, सर्व जीवांचे अात्यंतिक हित इच्छिणारा

*श्रीधर*

आपण वाचून चि.दिनकरास द्यालच, इतके विस्ताराचे पत्र कोठे लिहीत बसू. तो उत्सूक असलेल्यांना दाखवील आणि थोडया श्रमांत काम होईल. प्रत्येकांना ‘थोडक्यात काम होते ‘ म्हणून पत्र पाठविले नाही. सर्वाविषयी माझ्या मनात सारखाच प्रेमादर आहे.

home-last-sec-img