*© श्रीधर संदेश*
*।। श्रीराम समर्थ ।।*
*स्वर्गाश्रम*
*फाल्गुन वद्य ७*
*चि. xxx यांस आशीर्वाद.*
चार-पाच दिवसांतच मी गिरनार कडे जाईन जातांना श्रीराम नवमीस श्री अयोध्येस उतरावे म्हणतो. बघावें । ‘ईश्वरेच्छा बलीयसी’।
श्रीबद्रीनारायणाचे महाव्दार यावर्षी वैशाख शु. ७ ला उघडणार आहे. त्या दिवशी मे ची १२ तारीख पडते. काले-कंबळीवाल्याची चिठ्ठी हि मिळते.
तुमच्या अहं स्फूर्तितच मला तुमच्या शुध्द सद-चिद् आनंदरूपाने बघा. तिथेच मी आहे. तुमच्या त्या शुद्ध स्वरूपाने अखंड मला पहाणे म्हणजेच माझे ध्यान ; तेच माझे तात्विकरूप आहे. इकडे तुम्ही लक्ष घातले म्हणजे अखंड ‘तुम्ही आम्ही एके स्थळी’ या श्रीसमर्थांच्या उपदेशाचे रहस्य उमगेल अणि मग मला तुम्ही वेगळे पाहणार नाही. हीच स्थिति प्राणिमात्राला कृतकृत्य करते. तात्विक दृष्टीच एक शांति देते अशाच स्थितीत अखंड अचल राहणे मनुष्यमात्राचे कर्तव्य ! !
तात्विक दृष्टीवर भर देऊन लिहिले आहे. यांत दुसरी कोणतीहि विपरीत भावना करून घेऊन लिहिण्याचे स्वारस्य गमावू नका!
*’सर्वे भद्राणि पश्यन्तु’*
*श्रीधर*
*ता क.*
कर्ण प्रयागापर्यत बस मिळते. पुढे ६०-६५ मैल चालून यावे लागते. हृषीकेशाहून बद्रिकाश्रम १६४ मैल आहे. कर्णप्रयागापासून २० मैल अलिकडे रुद्रप्रयाग आहे. तेथून श्रीकेदारनाथाला वाट फुटते. या रुद्रप्रयाग पासून ४० मैल श्री केदार नाथ आहे. श्री केदारनाथाहून श्रीबद्रीनारायणाला चालूनच जावे लागते चार धाम सांगितले म्हणजे गंगोत्री यमनोत्री तीत समावेश होतो एक बद्रीनारायणलाच जावयाचे झाल्यास तसे जावे. स्वर्गाश्रमात माझी ओळख चांगलीच आहे. हृषीकेशांत रामाश्रमांत माझे नाव सांगतले तर सोय हाईल. श्रीबद्री नारायणात कालीकमलीचे वैद्य कृष्णानंदाना माझे नाव सांगितले तर पण सोय होईल. कालीकमलीचे वाटेत मिळणारे धान्य आरोग्यकारक, निदान या रेशनिंगच्या वेळेला तरी नाही. छत्रांत सोवळे ओवळे, वर्णाश्रम व्यवस्था नसते.