Letters

पत्र.क्र. ७६

*© श्रीधर संदेश*

*भाद्रपद १८९४, कुरवपूर*

*।। श्रीराम समर्थ।।*

*चि. …….यांस आशीर्वाद*

पत्र काही लिहिणार नाही, पत्र व्यवहार बंद म्हणून सांगितलेले आठवते तरी पण स्वामीजींचे कसे काय चालले असावे ? प्रकृति कशी काय आहे कोणास ठाऊक? तिथली हवा मानवली आहे किंवा नाही? इथली मंडळी सेवा व्यवस्थित करतात की नाही? किती त्रास होत असेल कोणास माहीत ? वगैरे चिंतेच्या कल्पनांचे तरंग वारंवार मनात आपो – आपच उठत असणे स्वाभाविकच मनोधर्माचे एक लक्षण असल्यामुळे खुशाली कळवावी म्हणून हे पत्र लिहावयास घेतले आहे. लिहितांना सहज ओघाने इतर काही कळवावे म्हणून वाटल्यास त्या सूचनाही देईन. पण ते गौण आहे. योगक्षेम कळवून तुमची काळजी दूर करावी हाच एक या पत्राचा मुख्य उद्देश आहे. ‘अतिस्नेहः पापशंकी।’

माझी देहस्थिती उत्तम आहे. रोजचा कार्यक्रम म्हणजे पहाटेस तीनला दोघे उठतो. x x x आम्ही होतो त्या खोलीत आहे व मी गुहेत आहे. पाच वाजावयाच्या आंत स्नान, आन्हीक वगैरे आटोपून मी तिथेच थोडावेळ बसतो व x x x लगेच खोलीकडे येतो. कडूलिंबाचा पाला वाटून वस्त्रगाळ रस मी खोली कडे येईपर्यंत अगदी सिद्ध करून ठेवतो. दीड पावशेरभर दोघेही घेतो. वर्षप्रतिपदेपासून याला आम्ही सुरुवात केली आहे. दोघांनाही रस चांगलाच मानवला आहे. ह्या हवेला तो फार चांगला म्हणून प्रारंभ केला. उत्तम गुण दिसून येतो. झाले! सात वाजावयाच्या आत बाहेर मी गुहेकडे येतो. तिकडे xx हि संध्या वगैरे आटोपून दहा वाजे पर्यत गुरुचरित्राचे पारायण करतो व नंतर दूध तापवून गुहेकडे घेऊन येतो. पावभर दूध घेऊन साधारण साडेअकरा बाराच्या सुमारास स्नानाला जातो. एक दीड वाजे पर्यंत स्नान माध्यान्हिकी आटोपून गुहेस परत येतो दोघे मिळून मग भिजत घातलेले धान्य, शेंगा, फळे वगैरे यथेच्छ पोट भरून खातो. भूकही चांगली लागलेली असते. फराळ झाल्यानंतर पुन्हा जी मी विश्रांति घेतो ते पाचच्या सुमारास गुहेबाहेर थोडावेळ बसून साडेपाचसहाच्या सुमारास सायंस्नानास जातो. साडेसात आठला बरोबर सायंकाळच्या आरतीला देवळाकडे सायं आन्हिक आटोपून जातो. तिथे शेजारती पर्यंत राहून थोडा वेळ सर्वही मंडळी मिळून बसून नऊ – साडेनऊला परत गुहेकडे येऊन विश्रांति घेतो. येतांना गरम दूध खोली तच घेऊन येतो. शेंगा,मूग, हरभरे, फळे, दूध, तूप, साखर वगैरे मिळून अगदी रेलचेल. उपासच जाणवत नाही. दुपारी पोटभरुन ताक घेतो. एकंदरीत दिवस अगदी आनंदात जात आहेत. काही कमी नाही. राजयोगही नव्हे आणि तो महाराजयोगही नव्हे यापुढे!!

या स्थळा ची माहिती म्हणजे तपाला अगदी योग्य स्थळ. नदीच्या मनोहर देखाव्याने आणि निसर्गत: मैदानातल्या झाडीझुडूपाने वर लांब पसरलेले या स्थळाचे सौंदर्य अपूर्व आहे. कंटाळलेल्या मनाशी अतींद्रिय सुखाच्या गोड गोष्टी बोलावयास एकांत हा तर जिथे तिथे बरोबरच जाईन तिथे तेथे तयार असतो.

तुम्ही सर्वहि वाटून दिलेली कामे व्यवस्थितपणे पार पाडत असाल. एकोप्याने आणि खेळीमेळीने श्रीगुरुसेवेत अगदी आनंदाने आयुष्याचे क्षण घालवीत जन्माचे सार्थक करीत असाल.

*श्रीधर*

home-last-sec-img