Letters

पत्र.क्र. ७७

*© श्रीधर संदेश*

*मंगळूर, २०/६/४८*
*चि. भास्कर यांस आशीर्वाद.*

तुझे आणि अय्याचे पत्र मिळाले. आपले आचरण नियमबद्ध असावे व आपल्याकडून उकृष्ट तप व्हावे म्हणून जे वाटते ते तुझ्या पूर्वजन्माच्या वासनेचे आणि भगवत्कृपेचे एक द्योतक आहे. असो. बाळा ! तुझ्यावर श्रीरामाची व श्रीसमर्थांची पूर्ण कृपा होवो.

माझ्या भेटीपर्यंत तुला श्रीदासबोधाची पारायणे आणि श्रीतारकमंत्राचा जप जास्तीत जास्त किती करता येईल तितका मनोभावे कर. साधनांत वरचेवर उत्साह वाढवावा, मनांत समाधान चांगलेच असावे, हृदयांत आनंदाचा पूर वाहावा. आरोग्यहि उत्तम राहावे. नियमबद्धता हेच तप. शक्य तितके लवकर उठून स्नानानंतर भिक्षेपर्यंतचा काळ एकांतात जावा. ह्यात ध्यान व जप या व्यतिरिक्त काही नसावे. सेवा अंगावर पडली तर मात्र यांत विघ्न म्हणून मानूं नये. ध्यान-जपाइतकेच तिचे महत्व आहे, भोजनोत्तर थोडावेळ विश्रांतीत घालवावा. नंतर आचमन करून श्रीग्रंथराजाच्या पारायणाला सुरवात करावी. अध्यात्मरामायणहि पाठांत असले तरी उत्तमच. पद्धतीप्रमाणे व अनुकूलतेप्रमाणे संध्येनंतर अथवा अगोदर अष्टके म्हणावीत, भजन अथवा प्रदक्षिणा ह्यानंतर व पुढे आरतीला हजर असावे. शेजारतीनंतर आत्मविचारांत, जपांत थोडा काळ घालवून विश्रांति घ्यावी. आहाराचा नियम आरोग्यानुरूप सात्विक असा आपल्या नियमाला बाध न येईल याप्रमाणे ठेवून घ्यावा. *माझ्या ‘अहं’ स्फूर्तीतच श्रीगुरु परमात्म्याचे नित्य निविकार सचिनदानंदरूप अखंड अद्वितीय असे सदा उजळत आहे, हा निश्चय मात्र श्वासासारखाच अविरत ठेव. प्रसंगोपात समयसूचकता ठेवावी.*

श्रीसमर्थ सांप्रदायरुपी पदकाला शोभा आणणारे तुम्ही सर्व ही अमोल हिरे ठरा. सर्वास माझा आशीर्वाद.

*सर्वेजनाः सुखिनो भवन्तु।*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img