Letters

पत्र.क्र. ७८

*© श्रीधर संदेश*

*श्री. शंकर पंडित सज्जनगड, यांना पत्र*

*॥श्रीराम समर्थ ॥*

*चि. पंडितास आशीर्वाद*

पत्र वाचले. १) ज्या ठिकाणी ध्यानाला बसले असता लौकर मन एकाग्र होते, मन प्रसन्न राहते, चांगले विचार उत्पन्न होतात त्या ठिकाणीच ध्यानाला बसावे. एकंदरीत ब्रम्हपिशाचे ठिकाण तुला विशेष अनुकूल आहे. पाऊस पाण्यामुळे ज्या दिवशी तेथे बसता येणार नाही त्या दिवशी असतोस त्या मठीतच ध्यानाला बसत जा; पहा कसे होते ते.

२. ज्या त्या देवाचे ध्यान, शरीराचा आकार जसा वेगवेगळा असतो त्याप्रमाणे त्यांच्या औपाधिक तेजाचा रंगहि वेगवेगळा असतो. विष्णुप्रकाश नीलवर्णाचा असतो. पीतवर्ण ब्रम्हदेवाचा प्रकाश असतो, लालवर्ण गणपतीचा, देवीचा असतो, फटफटीत चांदण्याच्या प्रकाशासारखा पांढरा शुभ्र ब्रम्हस्वरूपाचा प्रकाश असतो.

३. कोंडलेला श्वास भसकन् रेचकाच्या वेळी एकदम बाहेर न जाईल, तो पूरकाच्या दुप्पट सावकाश अनायासाने सोडता येईल अशा बेताचा कुंभक करावा, रेचकानंतर लगेच पूरक करता न येता दम लागला तर कुंभक अधिक झाला म्हणून समजावे. रेचकानंतर पूर्वी सारखाच शांततेने सावकाश पूरक करता यावा अशा बेताने कुंभक करावा, उचकी लागणे, खोकला येणे, गुदमरल्यासारखे होणे, मोठा सुस्कारा प्राणायामाच्या व्यत्यासाची लक्षणे होत. प्राणायामाचा बेताबेताने अभ्यास करावा.

४) नाद, तेज ही योगशास्त्राच्या दृष्टीने महासाक्षात्काराची पूर्वचिन्हें माहेत. घाबरू नये किंवा साशंक होऊ नये, प्रकाश दिसतांना पाहणारा केवळ ज्ञानाच्या रूपाने शिल्लक असतो व त्याच्या त्या जाणीवस्वरूपाचे हे प्रकाश जाणले जातात. आनंदस्वरूपाचा अनुभव शुद्धीवर आल्यावर येतो. आपण सर्वप्रकाशक ज्ञानमात्र आनंदरूपच आहो. अविनाशी आहों, सदैव एकरूपाने असणारे निर्विकल्प आहो, कोणत्याहि कल्पनेला प्रकाशविणारे निर्विकल्प जाणीवरूप आहों ही स्वरूपाची स्मृति सदैव जाग्रत असावी.

५) लघु दीर्घ शंकांचे वेग दाबू नयेत. त्याने रोगाची उत्पत्ति होते. पाणी नसेल तर दगडाने, पानाने, मातीच्या ठेकळाने ती स्थळे पुसून शुद्ध करावी आणि नंतर जलाने यथाक्रम शुद्ध करावी. गडावर पाणी आहेच. कुठे जातांना कमंडलुभर पाणी न्यावे. शक्य तो जलाने शौच संपादून मगच ध्यानाला बसणे उत्कृष्ट. तसेंच शक्यच नसल्यास आत्मरूप नित्य शुद्ध आहे या दृष्टीने आत्मचिंतनांत आत्मध्यानांत राहण्यास काही हरकत नाही.

६) मागच्या जन्मींच तुला सगुणसाक्षात्कार झाला आहे. बरेंच साधन मोक्षाकरतां केले आहेस. त्यामुळे या जन्मांत तुला देवतादर्शनें आपोआप होतात आणि देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडणे हे पूर्वजन्मीच्या साधनाचें फळ या जन्मी तुला मिळत आहे. उत्तमच आहे. शंका टाकून दे. भ्याडपणा बाळगू नको. तशा निष्ठ साधकास दाखविण्यास हरकत नाही.

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img