*© श्रीधर संदेश*
*सौ. राधा पै सागर, यांना पत्र*
*कासरगोड, चैत्र ११ ।*
*चि.राधेस आशीर्वाद.*
श्रीरामनवमी इथेच झाली. भक्तीमार्गावर ३ दिवस व्याख्यान होऊन श्रीराम नवमी दिवशी ‘रामावताराचे वैशिष्ट्य’ विषयावर व्याख्यान झाले. श्रीसमर्थाचे अवतार कार्य १, आर्य २, मी कोण अथवा मी म्हणजे काय? ३, मारुतीचे महत्त्व ४, तरूणाचे कर्तव्य ५, अशी व्याख्याने ठरली असल्यामुळे सोमवार पर्यंत कुठेहि जाता येत नाही. नंतर श्रीरामेश्वरला जाऊन यावे म्हणतो. तिकडे १०।१५ दिवस तरी मोडतील. मी आलेल्याचे स्मरण सदोदित व्हावे म्हणून एकानें १००५ रुपये दरवर्षी श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यास दिले. कासरगोडच्या व्यंकटरमण देवस्थानाकडुन ह्या रकमेच्या व्याजाने दरवर्षी उत्सव व्हावा असें ठरविले. कमी पडलेली रक्कम वर्गणीद्वारा पूर्ण करून तुमची आठवण म्हणून आम्ही सारे मिळून प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाने करूं, असें कासरगोडच्या मंडळीने आश्वासन दिले. हनुमंतजयंति बऱ्याच दिवसापासून झाली नाही. ती या निमित्ताने पुन्हा चालू करावी. म्हणून मला मंडळीनी आग्रहाने ठेवून घेतले आहे. तुझें पत्र मला मंगरुळीच मिळाले. सावकाशाने वाचून उत्तर लिहावे म्हणून होतो. सांगितल्याप्रमाणे ते पत्र कासरगोडी आणावयास विसरले. आज चि. विठ्ठलाचा तुला पत्र लिहिण्याचा फारच आग्रह पडला. कोणचे ते प्रश्न त्याला चांगले सांगता आले नाहीत. एकंदरीत तुझे समाधान होईल असे काही लिहितो. त्यांत बहुतेक तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
एका देहांत स्फुरणारे ‘मी’ हे भान इतर कोणच्याहि भानापूर्वी सारखेच सर्वदेही दिसून येत असल्यामुळे तें सर्वदेही व्यापक आहे. सर्व व्यापून असणारे एक, व्यापाला जाणाऱ्या सर्वदृश्याहून वेगळे आणि त्यामुळे सर्वदृश्याहून मोठे असें ठरते. सर्वांहून मोठे, तें कोणचेंहि एक अथवा सारे हे दृश्यरूप म्हणून ठरवितां येत नाही. सर्वांत मोठे सर्व व्यापक, एकच एक म्हणून यालाच ब्रह्म असे म्हणतात. व्यापून असणारे हे व्यापल्या जाणाऱ्या पदार्थाहून सक्षम, मोठे, एकच एक आपल्या तेजाने उजळणारे, शाश्वत सुखरूप, अनुभवले न जाता अनुभवरूप आहे, म्हणून विचाराअंती ठरतें. देहाच्या आतल्या व बाहेरच्या सर्व भागांतून व्यापून असलेले हे अद्वितीय स्वरूप एकदा कां कोणा एकाला समजलें म्हणजे तो जीव तद्रूपच आपल्याला मानतो, उठणाऱ्या सर्व वृत्तींतून त्याचें तें स्वरूपाचे ज्ञान ओतप्रोत अनुभवास येते. तरंग पाण्यांत विरून समद्रच जसा होतो त्याप्रमाणे मी या स्फुरणाचे भान उठत उठतच ज्ञानमात्र सुखस्वरूपी त्या पूर्ण ब्रह्माच्या अद्वितीयतेंत विरून जातो. त्याचेच ते भान त्याला सर्व अंतरबाह्य दृश्याच्या ऐवजी दृश्य म्हणून जाग्रतस्वप्नादिकांत सर्व दृश्य इंद्रियगोचर होत असतांना देखील भासते. मडक्याचा आकार दिसत असतांनाहि माती दृष्टीच्या आड होत नसल्याप्रमाणे त्याला सर्व आकारांतून सच्चिदा नंदरूपच डोळे करून भासते, दिसत नाही.ब्रह्मःदृष्टिगोचर होत नाही.
मनाचे चिंतन- पाण्याचा एखादा बुडबुडा अथवा तरंग अगाध जलांत मिळून एकरूप झाला की तो समुद्रच, त्याप्रमाणे ‘अहं’ ही स्फूर्ति भ्रमाने भासणाऱ्या पिंडब्रह्माडाचा आकार टाकून, हे अज्ञान विवेकाने नष्ट करून, यथार्थ स्वरूपाच्या भानाने त्या सच्चिदानंदांत केवळ रूपानें लीन झाली म्हणजे बुडबुडा फुटून समुद्र च झाल्याप्रमाणे, ती अहंस्फूर्ति अथवा तो जीव स्त्री-पुरुष, घर-जग, जीव-ईश, जन्म-कर्म, बंध-भोक्ष, साधन-साध्य, मनाचे, देहाचे इंद्रियाचे सर्व धर्म टाकन परब्रह्मांतच विरघळून एकरूप होतो. देहाभिमानाने युक्त असणाऱ्या जीवरूपी अहंस्फूर्तीस गारेची (बर्फाची) उपमा देता येईल. विवेकरूपी उष्णतेने विरघळून गेल्यावर पाणीच-ज्ञानी चिन्मात्र ब्रह्मच.
समुद्राच्या पाण्यांत अनेक बुडबुडे उठत अथवा निमत असले तरी निम्न एकदा समुद्र झालेला बुडबुडा आपल्याहून म्हणजे समद्राहून काय त्यांत वेगळे पाहणार ? ब्रह्मरूप ज्ञानाला सर्व त्याच्या नित्य निर्विकार ब्रह्मरूपतेचेच भान सर्वदृश्यजातांतून त्याला एकसारखेंच भासेल. दृश्याऐवजी स्वरूपस्मृतिरूप भानच त्याला दृश्य म्हणून भासेल. एक बुडबुडा फुटून समुद्रांत एकरूप झाला म्हणून इतर बुडबुडे नसावेत, उत्पन्न न व्हावेत म्हणून असें म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे एक जीव मुक्त झाल्यास सारेच जीव मुक्त व्हावेत अथवा नसावेत असें म्हणतां येत नाही. प्रारब्धाच्या योगाने देह असतो व हा देह पडेपर्यत मनहि असतेच. पण तें शुद्ध मन, पिंड-ब्रह्मांड, जीव-ईश इत्यादिकांच्या आवरणाने मुक्त नसून, सोललेले शुद्ध ब्रह्मरूपतेच्या भानाचें म्हणून शिल्लक असते. यालाच चरम अथवा ज्ञानदृष्टी म्हणतात. हीच तुर्यावस्था.
बाकी सर्व क्षेम.
*श्रीधर*