*© श्रीधर संदेश*
*॥ श्रीराम समर्थ ॥*
*ध्यान कसे करावे*
(शके १८८२ मध्ये श्रीक्षेत्र सज्जनगडी श्रीमत् प. प. भगवान सद्गुरु श्रीधरस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने व सान्निध्यांत त्रयोदशाक्षरी राममंत्राचे १३ कोटी जपाचे अनुष्ठान चालू असतां अनुष्ठान करणाऱ्या साधकांना ध्यान कसे करावें ! याबद्दल श्रींनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन पत्ररूपाने केले होते. ते सर्वांनाच मार्गदर्शक आहे.)
*’सोऽविमुक्त उपास्यो य एषोऽनन्तोऽव्यक्त आत्मा सोऽविमुक्ते प्रतिष्ठित इति ।’*
त्या श्रीरामांच्या अविमुक्त क्षेत्रांत (काशीत ) उपासना करावी. हा अनंत अव्यक्त आत्मा अविमुक्त क्षेत्रांत आहे ! असे सांगून ते वाराणसी काशी क्षेत्र भ्रूमध्याच्या ठिकाणी देहांतच आहे. तेथे डोळे मिटून अगर बाहेरून भ्रूमध्यदृष्टी ठेवून मनाने अनंत आनंदरूप श्रीरामाची (आत्मारामाची) उपासना करावी असे सांगितले आहे. कसलाही प्रयत्न न करतां सहज दृष्टी डोळे उघडून देखील तेथें ध्यान केले तरी चालेल. भ्रूमध्याच्या ठिकाणी असलेल्या चकाला ‘आज्ञाचक्र’ म्हणतात. योगशास्त्राच्या दृष्टीने देहांत असणारे हे परमात्म्याचे स्थळ होय. त्यामुळे येथे तेजोरूप आत्म्याचा साक्षात्कार होतो. *’काशत इति काशी’* म्हणून जसे म्हटलें त्याप्रमाणे येथे मन आणि दृष्टी स्थिर झाल्याने सगुण-साक्षात्कार व सिद्धांची दर्शन होऊन त्यांच्याकडून आदेश (आज्ञा) मिळतात म्हणून यास ‘आज्ञाचक्र’ असेंहि म्हणतात.
नाभीच्या खालच्या भागांत अधोमुख असणाऱ्या कुंडलिनीचे शेपुट भ्रूमध्याच्या ठिकाणच्या परमात्मप्रकाशाच्या झाड आहे. कुंडलिनी जागृत होऊन वर ब्रह्मरंध्राकडे जाऊ लागली म्हणजे अर्थातच ती मूळ जागेहून दूर होऊन परमात्मसाक्षात्कार होतो, भ्रूमध्यांत द्विदलकमल आहे असें योगग्रंथातून वर्णन आहे. यालाच त्रिवेणीसंगमहि म्हटले आहे. इडा-भागीरथी, पिंगळा यमुना आणि सुषम्ना-सरस्वती या तिन्हींचा येथे संगम होतो. तात्पर्य भ्रूमध्याचे महत्त्व योगोपनिषदांत असे सांगितले आहे तसें उपासनाज्ञानप्रधान तारसार व श्रीरामोत्तरतापिनी या उपनिषद तूनहि सांगितले असल्याने येथे बाहेरून दृष्टी ठेवावी व ध्यान करावे अथवा ते कठीण वाटल्यास डोळे मिटून आंतून या ठिकाणी तसेंच चांदण्याप्रमाणे आनंदाचेंच शुभ्रप्रकाशरूप ध्यान करावे किंवा असें ध्यान करून त्याच तेजाने मुसावलेल्या सगुण श्रीरामपंचायतनाचे श्रीमारुतिसमर्थासहित त्या प्रकाशांत ध्यान करावे व अशा ध्यानांत श्रीरामाचे प्रसन्न हास्यवदन निरखीत श्रीरामाचा जप करावा. *’शुक्लतेजोमयं ब्रह्म ।’* असा तारकयोगाचा म्हणजे दृष्टिसाधनाचा सिद्धांत आहे. या शुक्ल तेजाचे ध्यान करीत दृष्टी स्थिर झाली म्हणजे क्रमेण हा पांढरा प्रकाश आपोआप दिसू लागतो.
माझ्या पौर्णिमेच्या प्रवचनाच्या वेळीच हे सांगण्याची सूचना झाली होती पण सर्वव्यापक अनंत आनंदघनरूपाला भ्रूमध्याची कशाला अडगळ म्हणून हि तत्क्षणीच वाटले आणि त्या ब्रह्मनिरूपणाच्या भरात राहिले.
‘तूं सांगितले नाहीस’ म्हणून प्रत्यक्ष अंतस्फूर्तीने दोन तिनदां टोचणी आल्यावरून व उपनिषद्प्रतिपाद्य उपासनाविधिहि डावलून गेल्यासारखे होऊ नये म्हणून हे थोडक्यात सांगितले. देहातल्या काशीक्षेत्रांत राहून आपली उपासना करावी असें श्रीरामाला वाटते. म्हणून या पारायणामध्ये उपनिषदांतील विधी सोडून जाऊ नये म्हणून श्रीरामांनी केलेल्या सूचनेनुसार थोडक्यात दिग्दर्शन केले आहे.
दुसरें *वायुपुत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि । तन्नो वेगी प्रचोदयात् ।।* श्रीमारुतिरायांच्या मंत्राचा जप झाल्यानंतर रोज या गायत्रीने अकरा वेळ व श्रीरामरायांच्या मंत्रजपानंतर *दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि । तन्नो रामः प्रचोदयात् ॥* या गायत्रीने तेरा वेळां तर्पण करावें.
श्रीरामरहस्योपनिषदाच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटचे-
*ऐहिकेषु च कार्येषु महापत्सु च सर्वदा ॥१०॥ नैव योज्यो राममंत्रः केवलं मोक्षसाधकः ।। ऐहिके समनुद्राप्ते मां स्मरेद्रामसेवकम् ॥ ११ ॥ यो रामं संस्मरेन्नित्यं भक्त्या मनुपरायणः ॥ तस्याहमिष्टं संसिद्धये दीक्षितोऽस्मि मुनिश्वराः ॥ १२ ॥ वाञ्छितार्थं प्रदास्यामि भक्तानां राघवस्य तु ।। सर्वथा जागरूकोऽस्मि रामकार्यधुरंधरः ॥ १३ ॥*
हे श्लोक श्रीमारुतिमंत्रानंतर म्हणावे; हे झाले नित्याच्या उपासनेसंबंधी.
श्रीसीतामाईंनी आपल्याहि उपनिषदाचे (सीतोपनिषद्) पारायण व्हावे अशी आठवण दिली आहे. रोज वेळेच्या अभावी न झाल्यास शुक्रवारी पाठ करावा.
*॥ जय जय रघुवीर समर्थ ॥*
*श्रीधरस्वामी*