Letters

पत्र.क्र. ८२

*© श्रीधर संदेश*

*श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराजांनी समस्त भारतीयांस दिलेला दिव्य संदेश*

*वैदिकधर्माच्या पालनानेच दिव्यसुखप्राप्ति*

*श्रृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः !!*

*आनंदाद्ध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते । आनन्देन जातानि जीवन्ति । आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्ति ।।* तैत्त. भृगु. ६

या संसाररूपी वृक्षाचे मूळ आनंदरूप ब्रह्मच होय. बीजांतून प्रथम अंकूर बाहेर पडतो त्या प्रमाणेच आनंदरूप परब्रह्मातून ‘अहम्’ (मी) ही आत्मानुभूति उत्पन्न होते. ज्याप्रकारे अंकुरांतून नवपल्लव फुटतात त्याचप्रमाणे ‘अहम्’रूप अंकुरातुन प्रकृति व पुरुषरूपी दोन नवीन पालवी फुटते. नंतर जसा पालवीचा महान वृक्षांत विस्तार होतो त्याप्रमाणेच प्रकृतिपुरुषाचा विस्तार म्हणजेच अखिल विश्व होय. या संसारवृक्षाचा गाभा वेद होय. वेदाच्या शाखा प्रशाखा आणि त्यातून सांगितलेल्या साधना ह्या वृक्षाच्या शाखा प्रशाखा होत. विविध कर्मे ही याची पाने होत. सत्कर्मापासून उत्पन्न होणारी चित्तशुद्धि हेच या फूल होय. फूलापासून फळ उत्पन्न होते त्याप्रमाणे निर्विषयरूप चित्तशुद्धी पासून मोक्षरूपी फल उत्पन्न होते. अशा तऱ्हेने मूळ बीजापासून वृक्ष आपला विकास घडवून आणतो तसाच हा संसाररूपी वृक्ष सुद्धा आपल्या मूलभूत ब्रह्मानन्दाच्या प्राप्तीमुळे पूर्ण विकसित होतो. भूतमात्रांची उत्पत्ति या आनंदरूपी ब्रह्मापासून असून त्यानेच त्यांची स्थिति कायम असते. या आनंदाच्या प्राप्तीसाठी सर्व भूतजात त्या मूलस्वरूपाकडे आपल्या प्रगतशील जीवनाचा ओघ नेऊन शेवटी त्यांत एकरूप होऊन कृतकृत्य होतात हेच या श्रुतीचे तात्पर्य होय.

*नित्यं निरुपाधिकं निरतिशयं यत्सुखं स आनन्दः ।*
जे सुख नेहमी एकच स्वरूपी, अन्य कशांतहि न मिळणारे व स्वतः सर्वाधिक आहे त्या एकमेव सुखास आनन्द म्हटले जाते. *सच्चिदानन्दस्वरूपं ज्ञात्वाऽऽनन्दरूपा या स्थितिः सा सुखम् ।* (नि. उ.) अन्य-निरपेक्ष, स्वतःसिद्ध ज्ञानमात्र आनंदस्वरूपाच्या बोधामुळे जी आनंदरूप स्थिति प्रकाशमान होते तेंच एकमेव सुख होय.

*दुःखस्यात्यन्तनिवृत्तिपूर्वकं निरतिशयानन्दावाप्तिर्मोक्षस्य लक्षणम्।* दुःखाची समूळ निवृत्ति होऊन जो निरवधि आनंद प्राप्त होतो त्यालाच ‘मोक्ष’ म्हटलें जाते. *स्वरूपात्रस्थितिमोक्षः।* स्वस्वरुपामध्ये प्राप्त होणाऱ्या स्थितीस मोक्ष म्हणतात.

*यल्लाभानापरो लाभो यत्सुखानापरं सुखम् ।*
*यज्ज्ञानान्न परं ज्ञेयं तद्ब्रह्मेत्यवधारयेत् ।।*
ज्याच्या लाभापेक्षा मोठा लाभ असूं शकत नाही, ज्या सुखापेक्षा इतर कोणतेंहि जास्त सुख असत नाही, तसेच जे समजून घेतल्यावर इतर काही समजून घेण्यासारखे नसते, तेच आनंदरूप ब्रह्म मीच आहे हें निश्चयपूर्वक समजावे.

*यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।*
*न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ।।*
जो शास्त्रविधींचा त्याग करून, इन्द्रियसुखाच्या आधीन होऊन आपलें जीवन फुकट घालवितो त्याला आत्मज्ञानरूप सिद्धि प्राप्त होत नाही. त्याला ऐहिक सुख मिळत नाहीच पण मोक्षहि मिळत नाही.

*तस्मान्छास्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।*
*ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ।*
याकरितां कार्य कोणते व अकार्य कोणते? हा विधिनिषेधरूपी मार्ग जाणण्याकरिता शास्त्र हेच एकमेव प्रमाण होय. निव्वळ मानवीबुद्धीने त्याचे ज्ञान होत नाही. शास्त्रविधींचं उत्तम प्रकारे ज्ञान करून घेतल्यावरच जीव कर्म करण्यास योग्य असा होतो.

मोक्षप्राप्तीस साधन भूत असणाऱ्या दिव्य जीवनाचा आदेश ज्यामुळे प्राप्त होतो त्यास ‘शास्त्र’ असे म्हणतात. *न वेदात् परं शास्त्रम्। धर्मशास्त्रं तु वै स्मृति।।* या प्रमाणभूत वाक्यांवरून श्रुति-स्मृतिंच्या उपदेशास ‘शास्त्र’ म्हटले जाते.

*श्रुत्या यदुक्तं परमार्थमेव तत्संशयो नात्र ततः समस्तम् ।*
श्रुत्युक्त उपदेशच इहपर साधक आहे यांत किंचितहि संशय नाही. एकमेव श्रुतींपासूनच ऐहिक जीवनांत सफलता व परमात्मसुखाचा लाभ होतो. *श्रुतिस्तु वेदो विज्ञेयः ।* श्रुतींनाच वेद म्हटले जाते. *धर्मं जिज्ञास्यमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।* मानवधर्म कोणता? हे जाणून घ्यावयाचे असेल तर त्याला एकमात्र परम प्रमाण श्रुतीच होत. हा धर्म प्राकृत-बुध्दिगम्य नाही. श्रुतीशिवाय जीवनांत सुफलता मिळत नाही हे यावरून स्पष्ट होते. यादृष्टीने जीवनांत सफलत्व मिळण्यासाठी श्रुतीचा आश्रय घेणे हे मनुष्यमात्राचें अनिवार्य कर्तव्य ठरते .

‘वेद’ शब्दाच्या निरनिराळ्या व्याख्यातूनहि याच गोष्टीस पुष्टी मिळते. *अलौकिकसुखोपायं वेत्ति अनेन इति वेदः ।* अलौकिक सुखाचे साधन मानवबुद्धीस गम्य नाही. त्या साधनाचे पूर्ण ज्ञान करवून देत मनुष्यास त्याची प्राप्ती करवून देत असल्याने वेदास ‘वेद’ हे नांव प्राप्त झाले आहे. *जगत्तवं वेत्ति अनेनेति वेदः ।* ज्यांच्या योगाने जगाच्या तत्वांचे पूर्ण ज्ञान होते तेच वेद होत. *इष्टप्राप्त्यनिष्टनिवृत्यर्थं लौकिकालौकिकोपायं वेत्ति अनेनेति वेदः ।* इष्ट-प्राप्ति व निवृत्ति यासाठी लौकिक तसेच अलौकिक उपायांना मनुष्य ज्यांच्याकडून समजवून घेतो तेच वेद होत. *धमार्थकाममोक्षाः वेद्यन्ते अनेनेति वेदः।* धर्म कोणता? अर्थ कोणता ? काम कोणता व मोक्ष म्हणजे काय? या गोष्टी ज्याच्याद्वारे योग्य प्रकारे समजतात तोच वेद होय. या सर्व व्याख्यांवरून वेदाची ‘एकाश्रयता’ सुस्पष्ट होते. भगवान मनु सुद्धा पुढील प्रमाणे म्हणतात.

*चातुर्वर्ण्यं त्रयो लोकाश्चत्वारश्चाश्रमाः पृथक् । भूतं भव्यं भविष्यश्च सर्वं वेदात प्रसिद्धयति । १२।९७ ॥*

ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चार वर्ण स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तीन लोक, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम इतकेच नव्हे तर भूत, वर्तमान व भविष्यातील सर्व सृष्टी सुद्धा वेदापासूनच होते.

*शास्त्रयोनित्वात् ।* या ब्रह्मसूत्रावर भाष्य करतांना भगवत पूज्यपाद श्रीशंकराचार्यांनी म्हटले आहे की, *न ही दृशस्य सर्वज्ञत्वादिलक्षणस्य शात्रस्य सर्वज्ञादन्यतः संभवोस्ति ।* सर्वज्ञत्वादि लक्षणान्वित अशा वेदशास्त्रांची उत्पत्ति सर्वज्ञ परमेश्वराशिवाय होऊच शकत नाही. *वाग्विवृत्ताश्च वेदः ।* वेद परमात्म्याचीच वाणी होय हे योग्यच म्हटलें आहे. *वेदोऽखिलो धर्ममूलम् ।* परमात्मप्रणीत वेदच धर्माने मूळ होत. *लोकयात्रार्थमेवेह धर्मप्रवचनं कृतम् ।* जीवनयात्रा सुखपूर्वक सम्पन्न होण्याकरितांच हें धर्मप्रवचन केले गेलें आहे. *उभयत्र सुखोदकः ।* यापासून जागतिक व पारमात्मिक उन्नत सुखाची प्राप्ती होते.

या वैदिक धर्माच्या पालनाने सर्वांना त्या दिव्य सुखाची प्राप्ती होवो व सर्वांचे जीवन दिव्य बनो अशी मी त्या मंगलमय परमात्म्याकडे प्रार्थना करतो.

*सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img