*© श्रीधर संदेश*
*विद्यार्थ्यांस दिव्य संदेश*
*माझ्या आवडत्या बाळांनों!*
हे आपलें विद्यामंदीर म्हणजे सरस्वतीदेवीचे निवासस्थान. विद्यार्थी या मंदिरांत ज्ञानार्जन करीत असतां, शिकत असलेल्या सर्व विषयांत सत्याचा विचार प्रकट केलेला आहे हे लक्षांत ठेवले पाहिजे व त्याप्रमाणे आचरणहि केले पाहिजे. त्यायोगेच आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
आपण शिकत असलेल्या विद्येमुळेच आपली योग्यता सर्वत्र ठरविली जाते. मनुष्याचे आचार-विचार, चालचलवणूक, स्वभावप्रकृति ही सर्व लक्ष्यांत आणून देणारी दिव्यशक्ति म्हणजे विद्याच.
*विद्याविहीन: पशुः…….. ॥*
विद्या नसलेला मनुष्य पशूच होय, आपले संस्कार व आपली योग्यता समजण्यासाठी विद्येची आवश्यकता आहे.
मनुष्यामध्ये तेज निर्माण होण्यासाठी आणि त्या तेजास तीव्रता येण्यासाठी त्याची योग्यताच कारणीभूत असते.
*” विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम् ॥”*
देहसौन्दर्याने किंवा वेशभूषणांनी मनुष्य विद्वान ठरत नाही. विद्याविहीन मनुष्य सौन्दर्यदृष्टया किती हि आकर्षक असला तरी विद्यावंताच्या तेजस्वितेची बरोबरी तो करू शकत नाही. प्रपंच्यामध्ये विद्याविहिनाचे आकर्षण जन्मसार्थकतेस सहाय्यभूत होऊंच शकत नाही. तेथें विद्येचीच आवश्यकता आहे. एखादा कुरूप मनुष्य विद्यावंत असल्यास तो विद्येच्या प्रभावाने आकर्षण मिळवू शकतो *” विद्या परं दैवतम् “* आपण पूजनीय व्हावे असे वाटत असल्यास, आपणांस सर्व जगांत मान्यता मिळवावयाची असल्यास निजविद्यासंपादनासाठी कष्टच केले पाहिजेत. अशा मानवाची विद्या किंवा अधिकार स्तुतीस पात्र ठरतात. तो जगास मार्गदर्शकहि ठरतो. विद्याविहीनास ते अशक्य आहे.
*” द्वे विद्ये वेदितव्ये पराचैवापरा च ॥”*
सर्वसाधारणपणे मनुष्यास योग्यता मिळवावयाची असल्यास विद्या हे एकच साधन आहे. विद्वानांच्या चरणकमलांत सम्राटाचे तेज असते. “पराचैव व छाम” या दोन मुख्य विद्या आहेत. विद्या संपादनाव्यतिरिक्त त्यासाठी साधन ही मुख्य गोष्ट आहे असे म्हटले जाते. कोणती विद्या उत्कृष्ट आहे ? या प्रश्नास, ज्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय किंवा जीवनाची सार्थकता प्राप्त होते तीच विद्या असेंच उत्तर आहे. जी शिकल्याने पारमार्थिक यश प्राप्त होईल, जी मानवी आदर्शत्वाला कारणीभूत होऊन जीवनाची उन्नति प्राप्त होईल व जीवनसुखासाठी जी कारणीभूत होईल तिलाच विद्या म्हणता येईल..
लोकपूज्यता, लोकहित, जीवनसार्थकता, परमात्मकृपा या जीमुळे प्राप्त होतात तिला विद्या म्हणतात. तुमच्या बाल्यावस्थेत हे कसे शक्य आहे ? असे आपण विचाराल. समय हा आपणास आपल्या मर्जीनुरूप वापरता येतो, त्याचप्रमाणे बालमतहि सहज बदलू शकते. विद्यार्थी-जीवनांतच संस्कार सहजपणे घडवितां येतात. संस्कार हे ओल्या मातीप्रमाणे मृदु आहेत.
विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्यपालन केले पाहिजे. भविष्यांत भव्यता येण्यासाठी भद्रता मिळवून देणारी ब्रह्मचर्य ही मुख्य गोष्ट आहे. विद्यार्थ्याने परिशुद्ध असें जीवन जगले पाहिजे. विद्यार्थी ज्या प्रमाणांत गुरु व वडील माणसें यांच्या ठिकाणी भक्तिभावाने वागतील त्याप्रमाणांत त्यांचे भविष्यहि उज्वल होईल. विद्यार्थीदशेत आपले मन इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. वाईट व्यसने व वाईट संस्कार यांमध्ये तुमचे मन गुरफटण्याची जास्त शक्यता आहे. अशा वाईट प्रवाहात सांपडल्यास आपले भावी जीवनच नष्ट होईल.
भक्तीची वचनें भगवंताजवळ जाण्यासाठी साधनभूत असतात. भगवंताची भक्तावर नेहमीच कृपा असते. मी तुम्हास देत असलेल्या आशीर्वादांत थोडीतरी भगवंतकृपा आहे असा माझा विश्वास आहे.
तुम्ही आदर्शभूत विद्यार्थी व्हा! तुमच्या अध्यापकवर्गास ऐहिक व पारमार्थिक सुख प्राप्त होवो ! या जीवनांत आपण जें प्राप्त करून घ्याल ते जगांत आदर्शभूत होवो ! आपलें विद्यामंदीर जास्तीत जास्त यशस्वी होवो !! असा माझा आशिर्वाद आहे.
*श्रीधरस्वामी*