*© श्रीधर संदेश*
*श्रीमत् प. प. सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराजांचा दिव्य-संदेश*
*कार्तिक पौणिमा शके १८७४, श्रीकाशी*
*”शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः ।”*
या चर्मचक्षुंना दिसणाऱ्या प्रपंचास बाहयप्रपंच असें म्हणतात देहामध्ये चालणाऱ्या कल्पनातरंगाना मानसिक सृष्टि अथवा अंतःप्रपंच असें नांव आहे. या अंतर्बाह्यप्रपंचामध्ये परमात्मा गुप्तरूपाने आहे. परमात्मरूपावर ही दोन आवरणे आहेत. या आवरणांचा निरास झाल्याशिवाय परमात्म्यांचे यथार्थ दर्शन होणे शक्य नाहीं.
*बाह्यप्रपचांत परमात्मा नामरूपाच्या आच्छादनाखाली गुप्त आहे* नेत्रांस गोचर होणारे हें नामरूपात्मक आवरण विवेकाने नाहीसे करून परमात्म्याच्या यथार्थ निराकार सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन, ज्ञानदृष्टीने अखंड घेत असावें.
*अंतःप्रपंचांत तरंग अथवा बुडबुड्याप्रमाणे एकापाठीमागून एक उठणाऱ्या अनंत कल्पनांतून व तसेंच या कल्पनातरंगाना जाणणाऱ्या ‘मी’ या आपल्या स्मृतीच्या आच्छादनातून परमात्मा गुप्त आहे.* ही दोन आवरणेहि दूर करावयास पाहिजेत. दागिन्याची दृष्टि मालवून ज्याप्रमाणे सुवर्ण घ्यावे किंवा तरंग, फेस,बुदबुदादि आकाराची दृष्टि घालवून जशी निश्चल पाण्याचीच केवळ एक दृष्टि ठेवावी त्याचप्रमाणे चंचल कल्पनातरंग पाहण्याची दृष्टि अजीबात घालवून, त्यांना जाणणाऱ्या ‘मी’ या आत्मस्मृतीलाहि आपल्या ज्ञानरूपतेनें प्रकाशित करणाऱ्या नित्य -निश्चल, नित्य-निविकल्प, नित्य निर्विकार अशा परमात्मस्वरूपाची एक निष्ठाच सतत वाढवावी. कोणतीहि वृत्ति न ठेवतां, मीपणाची स्फूर्तिहि न भासतां केवळ निर्विकल्प स्वरूपाचे ज्ञान एकच एक आपल्या अनंतानंत दिव्य आनंदस्वरूपाने सतत प्रकाशूं लागले म्हणजे स्वरूपसाक्षात्कार झाला असे समजावे.
आरशांत भासणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे ‘मी’ या एका अखंड आत्मस्मृतीत माया-अविद्येमुळे ईश जीव, पिण्ड ब्रह्माण्डादि प्रपंच भ्रमाने भासत असतो. आरशापुढील पदार्थ नाहीसा झाला म्हणजे त्यांत दिसणारे प्रतिबिंबहि पण नाहीसे होऊन जसा एक आरसाच शिल्लक राहतो त्याचप्रमाणे ‘मी’ या आत्मीय भावनेपुढील अविद्या माया, जीव ईश, पिण्डब्रह्माण्ड इत्यादि स्वाज्ञानजन्य कार्यकारण उपाधि, तीव्र स्वरूपधारणेने नष्ट झाली म्हणजे एकच एक निर्विकल्प सच्चिदानंद स्वरूप आपल्याच लक्षणाने अखंड प्रकाशूं लागते. यालाच ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात. आत्मसाक्षात्कार असेंही याला एक दुसरे नांव आहे.
कोणी काही म्हणो, ही स्थिति प्राप्त झाल्याखेरीज कोणीही मुक्त होत नाही. यास्थितिमुळेच ब्रह्मा, विष्णु, महेश्वर नित्यमुक्त म्हणून प्रसिद्ध आहेत याच स्थितीने जीव जीवन्मुक्त होतो.
अत्युन्नत आत्मदृष्टीपुढे, स्त्रीपुरुषादि भेदभाव, संसारिक संकुचित कल्पना, भोगसुखाच्या वासना, सर्वप्रवृत्तिधर्म टिकू शकत नाहीत. प्रकाश अंधःकाराप्रमाणे यांचा परस्पर विरोध आहे. अशी ही नित्य-मंगल, चित्प्रभापरिपूर्ण निर्विकार, निर्विकल्प मनोभूमिका संपादन करणे हेच या लोकींचे कर्तव्य आणि हेच मानवजन्माचें साफल्य ! !
श्रीसद्गुरुकृपेने व देवतानुग्रहाने तुम्हा सर्वांचेहि दिव्यजीवन नित्य मंगल रूपाने अखंड प्रकाशो! !
*इति शम्*
*श्रीधरस्वामी*