*© श्रीधर संदेश*
*॥ श्री।।*
*सज्जनगड*
*दिनांक : २८/३/६०*
*भक्त समुदायास पत्र*
*॥श्रीराम समर्थ ।।*
*सर्व भक्त समुदायास माझा आशीर्वाद.*
तुम्हा सर्वांचे जीवन सर्वप्रकारे सुखपूर्ण होऊन, तुम्ही सर्वांनी शांतिसमाधानयुक्त दिव्य जीवन आनंदाने पूर्ण करुन, धन्य होऊन कृतकृत्य होऊन उपभोगावे असे माझे अंत:करणपूर्वक सांगणे आहे.
तुम्ही सर्वांनी आपापले व्यवसाय कार्य उत्तम प्रकारे दक्षतेने करून उरलेल्या वेळात भक्तिभावाने जनसार्थकासाठी मनाच्या एकाग्रतेने निष्ठेने उपासना करावी. नित्यनैमित्तिक कर्मे सोडू नयेत. देवपितृकार्य, कुलधर्म कुळाचार भक्तिभावाने नियमित करीत असावे. लोक व्यवहार उत्तम
प्रकारे करीत जावा. मन ताब्यात ठेवून गंभीरतेने वागावे. स्वरूपाचे ध्यान धरुन त्याप्रमाणे वागावे व आनंदस्वरूपाच्या अनुभवाने जीवन घालवावे. अंधश्रध्दा व अंधभक्तीने काही केल्यास लोक तुम्हाला ढोंगीच समजतील व त्यामुळे तुम्ही लोकांच्या हास्यास कारणीभूत व्हाल !!
उपासना सामुदायिक करावी. सर्वानी एकत्र मिळून केलेल्या उपासनेस सामुदायिक उपासना’ असे म्हटले जाते. भजन, पूजन, प्रार्थना, नामजप, ध्यान, आत्मविचार, श्रवण इत्यादि ह्या सामुदायिक उपासनेत येतात. आपले वागणे, बोलणे व बघणे याद्वारे सर्वांना संतोषित करणे हे मनुष्याचे खरे जीवन होय. परोपकार करणे हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ ध्येय होय. नय-विनय, हित-मित, मधुर मृदु सत्य भाषण, शील व सद्धर्माचे आचरण ही सर्व मानवास मुक्त करणारी लक्षणे होत.
ध्यानामध्ये किंवा स्वप्नामध्ये श्रीसद्गुरुचे दर्शन होऊन तुमच्या प्रश्नांचे श्रींच्या मुखाद्वारे समाधान होणे, उत्तर येणे अत्यंत महत्वाचे आहे.
श्रीसद्गुरुच महानमंगल, परमपवित्र आनंदघन असणारे परमात्म्याचे प्रथम स्वरुप होत. तुम्हास सद्गुरुरुपांत अनुभवास आलेले त्यांचे विविध दर्शन घडणेच तत्त्व साक्षात्कार होय…
माझ्या दर्शनाचे स्वरुप मी वर निर्दिष्ट केले आहे. तें साध्य झाल्यास या लीलाविग्रहापासूनही दर्शन घडू शकते, जगाचा हा संसार दोन दिवसांचा आहे. स्वप्नातील अनुभवानुसार निष्कामतेने भक्ती करावी. त्यामुळे मनाची भूमिका जास्त व्यापक होऊन अचल भक्ती, शांती व समाधान ह्या गोष्टी स्थिर होतात. अत्यानंद उफाळून येतो.
सर्कीर्तीयुक्त सद्भक्त बनून, सन्मार्गाने वागून, शुध्द आत्मानंदयुक्त दिव्यजीवन कंठून तुम्ही धन्य व कृतकृत्य व्हावे !!
*इति शिवम् !!*
*सर्वांचा आनंदघन आत्मा*
*श्रीधर स्वामी*