*© श्रीधर संदेश*
*।। श्रीराम समर्थ ।।*
*श्रींचे एक पत्र*
जिद्दी नासिले अनर्था । नमूनी त्या श्रीसमर्था । वदेन कांही उत्तरार्था । पत्राचिये ।।१।।
लिहिले तें पावले । समजोनी वाचले । वाचोनिया लिहिले । योग्य स्वानुभवा ।।२।।
श्रीधरांविषयी चित्ती । असे जी कळकळ अती । कोणासही पाहोनी ती । गहीवर ये ।।३।।
ऐसी हार्दीक तळमळ । तुमचिया ठायीं केवळ । मजकारणे तो कृपाळ । ठेवी मत्कल्याणा ।।४।।
तुमचिया कळकळीने । तारिले मज दयाघने । अल्पावधी एवढे देणे । ते तुम्हा कारणे ।।५।।
असो ययाचिये उपरी । आपल्या पत्राचे उत्तरी । निवेदन जे मी करी । ते अवधारिजे ।।६।।
अंतरंग बहिरंग । साधने ही अव्यंग । होण्यासी भवभंग । अधिकारान्वये ।।७।।
प्रथम ते बहिरंग । शरिरकर्मे घडे संग । दुजे ते अंतरंग । मानसिक जे ।।८।।
दास्य किर्तन पारायण । जप नेम श्रवण मनन । अर्चन वंदन प्राणायाम । प्रथम साधनी ।।९।।
ध्यान आणि धारणा । समाधीपर्यंत जाणा । मानसिक या साधना । अंतरंग म्हणिजे ।।१०।।
दोन्ही यया साधना । श्रेष्ठ आणि कनिष्ठपणा । अधिकारान्वये जाणा । देइजेत ।।११।।
प्रथमांती द्वितीया । साधनाचा उपाय ।त्या त्या अवस्थी सोय । ती ती असे ॥१२।।
जयांना झाले आत्मज्ञान । वाटे प्रपंच मिथ्या भान। मन इंद्रियांचे साधन । तुच्छ होय त्या ।।१३।।
कर्मे जे होय फळ । ते नाशिवंत केवळ । आत्मसुख प्रांजळ । न मिळे तेणे ॥१४॥
म्हणोनिया आत्मस्थिती। सांडोनी सकळ भावासी।सहजी सहज पूर्णपणेसी । ब्रह्मी राहे ।।१६।।
कर्मे जें प्राप्त होये । भोक्ता त्यासी होणे ये। नाठवी तेणे ती सोये । कर्तव्यतेची ॥१७॥
ऐशा विवेकी साधका । आत्मस्थितीवीण देखा। अन्य साधनांचा लेखा । निर्फळ वाटे ।।१८।।
भोक्तृत्वे होयें बंधन । मोडे ब्रह्मी ऐक्यर्पण । भ्रांती प्रपंच विस्तरण । वासनेसी ।।१९।।
वासनेने देहत्व जोडे । मिथ्याचि तो प्रपंच घडे । मन भलत्याविषयी पवाडे । सत्य लोपे ।।२०।।
एवढा ऐसा अनर्थ । मानुनीया प्राप्तव्यार्थ । करिता कर्म यथार्थ । जीवा जोडे ।।२१।।
असो बहिरंगे जया । अंतरंग जोडे तया । न वचे अन्य ठाया । क्रियासक्ती ।।२२।।
ऐशा अंतरंग साधका । सर्व त्याग अवश्य देखा। उपास्याचाहि लेखा । आत्मत्वेंचि ज्या ।।२३।।
आत्मेतर अवघी भ्रांती । वाटे ऐशियाचिया चित्ती । या कर्मकलापी श्रुति । गोवूं नेणे ।।२४।।
सहजपणे वर्तन । तेचि याचे उपासना । देव वर्तवी या कल्याण । लक्षूनिया ।।२५।।
शोधनिया सारासार । असार त्यागिला संसार। जो कां स्वये साचार । आत्मशोधने ॥२६॥
ऐसा जो आत्ममात्र । तोचि तो असे स्वतंत्र । त्यासी इह ना परस्त्र । प्राप्त करणे ॥२७॥
नाही स्वत:चे उद्धरण । नाही अन्यासी तारण । जो स्वयेचि आपण । निजवस्तु ।।२८।।
याचे चिंतनरहित ध्यान । कर्मत्याग हे आवाहन । निश्चय ज्ञान आसन । आत्मदेवा ।।२९।।
मनोन्मनीचा भाव । तेचि पाद्य जया नांव । अमनस्क अर्घ्ये देव । संतोषवी ।।३०।।
आत्मानंतवृत्ति । स्नातार्थ योजी प्रीती । चंदनार्थ भावी सर्वत्री । एकमेवाद्वितीय ।।३१।।
स्वचिन्मयत्वे अर्पी पुष्प । दृढमात्रे अक्षता साटोप । चिदादित्ये उजळी दीप । स्वप्रकाशी ।।३२।।
चिदाग्नि तो धूप या मना । चैतन्यामृत नैवेद्य जाणा । निश्चळत स्वरुपी प्रदक्षणा । सोऽहं नमन ।।३३।।
महामौन ते स्तुती । ‘यतोवाचे’ निर्वतती । सहज संतापे विसर्जीती । आत्मस्थिती निजठाया ।।३४।।
ऐशी याची अखंड पूजा । आप आपणे या सहजा । जो नाठवे कर्मजा । मिश्रपणे ॥३५।।
आत्मीयत्वे सहज योग । अखंडत्वा नव्हे वियोग । चित्ताहुति टाकूनि याग । चिदग्नी संपादिला ।।३६।।
श्रीगुरु दासांचा बोध । आपुलाचि घ्यावा शोध । तोचि होवोनि निर्बोध । आत्मरूप सेवियले ।।३७।।
ह्रदयी बैसला गोविंदु । तेणे लागला भक्तिछंदु ।तो स्वभावे जे बोलतु।तेचि ब्रह्मनिरुपण।।३८।।
याचेनि जी निज सहज सांगणे। ती दासबोध पारायणे।वेगळे यांसी करणे । नलगे काही ।।३९।।
अखंड अनुहत ध्वनी । सोऽहं शब्दी मालवोनि । ॐ हा निजजीवनी | जप त्याचा ।।४०।।
सहजी या ऐसे घडे । शपथेचे कासया कोडे । ज्याची शपथ तो निवडे । आत्मरुपे ।।४१।।
अन्यत्वचि जेथे सरे । एकपणचि जेथ उरे। मायेसकट ईश विरे । जया रूपी ।।४२।।
नाही येथ विभक्तपण । कोणा मानावया येथ कोण । निखळ निर्गुणी आपण । आपणयेची ।।४३।।
हा नव्हे कर्मकिंकरू । हा वेदांचा पर पारू । शास्त्रांचाहि निर्धारू । स्वानुभवे ।।४४।।
हा जगाचा जगद्गुरु । नाही या माया विचारू । कर्म उपासना ज्ञानपारू । ययाचेनी ।।४५।।
असो पत्र वाचुनि जे स्फुरले । ते हे समर्थकृपे लिहिले । मनी पाहिजे समजले । म्हणोनिया ।।४६।।
समजोनी लेखन इत्यर्थ । जाणोनि येथील गुह्यार्थ । प्रार्थावे श्रीसमर्थ । बहुतांपरी ।।४७।।
ययावरी जी स्फुर्ति । तुह्या मिळे यदर्थी । समर्थकृपे तदर्थी । मन जडो ।।४८||
*हिमालय शके १८६८*
*प्रेषक : श्री. गोडसेबुवा रामदासी*