Letters

पत्र.क्र. ८९

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ॥*

*चि. लक्ष्मीनारायण यास आशीर्वाद,*

बाळ, तूं तुझ्या मुलाबद्दल लागून घेऊन उगीच विषाद वाढू देऊ नकोस. वाळलेले पान झडून गेल्यावर झाड दुःख करतें काय ? त्याला वाईट वाटेल कां ? त्याचप्रमाणे आयुष्य संपलेल्या माणसाबद्दल दु:ख करूं नये. नदीच्या प्रवाहांत इकडे तिकडे पडलेले लाकडाचे पुष्कळसे ओंडके प्रवाहाबरोबर वाहात जातात, त्याचप्रमाणे ऋणानुबंधामुळे अनेक लोक एकत्र येतात व ऋणानुबंध संपताच एकमेकास सोडून जातात. समुद्राच्या पाण्यांत बुडबुडे उत्पन्न होऊन थोड्याच वेळांत ते पाण्यात विलीन होतात, त्याच प्रमाणे मानवी देह थोडा वेळ राहून आपला समय पूर्ण होतांच बुडबुड्या प्रमाणे विलीन होतात. सर्व मानवांचे देह एक ना एक दिवस नष्ट होतातच. संसार वासना असणाऱ्यांची स्थिती मानवाने जुने कपडे टाकून नवे कपडे धारण केल्यासारखीच आहे. एका देहांतून निघून जीव दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. पूर्वजन्माच्या कर्मफलानुसार देह धारण करून कर्मफलाप्रमाणे आयुष्य संपताच देह सोडून जातो. आपल्या नातेवाईकांना दुःख देऊन मरण हेहि आपल्या पूर्वजन्मकर्माचे फळ होय.

तुझा मुलगा थोडे दिवस जिवंत राहून तुला दुःख देण्यासाठीच जन्माला आला होता, हे सुद्धा कर्मफलच होय. त्यामुळे यापुढे शोक करावयाचे कारणच काय ? नष्ट होणारा देह आपल्या निसर्गाप्रमाणे नष्ट झाला तर अशा देहासाठी कोणी व कशाला रडावे ? शोक का करावा ? दुःख कां करावें ? मन निराश कां करावें ? जन्माला येणे हे स्वतःच्या उद्धारा साठी असून इतरांच्या जन्म-मरणामुळे हर्ष किंवा व्यथा करण्यासाठी खास नाहीं नदी समुद्रास जशी मिळते तसे परमात्म्यापासून दूर आलेल्याने आपले अज्ञान घालवून श्रीगुरुनाथांनी समजावून दिलेले आत्मस्वरूप प्राप्तीचे ध्येय न सोडतां श्रीगुरुदेवांना प्रसन्न करून घेऊन या भवदुःखातून पार होऊन जाणे हेच जन्मसाफल्य !! आलेला अतिथी आपल्या घरी जाण्यासारखेच मनुष्य आपले आयुष्य संपल्यावर देह टाकून देऊन आपल्या मूळस्वरूपांत म्हणजेच परमात्मस्वरूपामध्ये लीन होण्यासाठी जातो. देह हा केव्हांहि विनाशीच असून आत्मा नित्य, अविनाशी, आनंदस्वरूपच आहे असे समजून गुरुभक्तज्ञानी कोणाचा जन्म किंवा मरण झाल्यास शोक करीत नसतात. मग तूं कां बरें शोक करतोस ? फुटलेले मडके फेकून देण्याप्रमाणेच आपण मृत देह जाळून टाकतो, यांत शोक करण्यासारखं काय आहे बरं ?

माझी सेवा केल्यामुळे मोक्षमार्ग दाखवून तुला मुक्त करावें, असें, मला वाटणे साहजिकच होय. तसेंच तुझ्या मुलालाहि मोक्ष देणे हे माझें कर्तव्यच आहे. प्राण सोडून गेलेला देह जळाला व आत्म्याला मुक्ती प्राप्त झाली, अशाप्रसंगी शोक करण्याचे कसलेच कारण राहिले नाही.

माझी मुले, माझे घर असे म्हणणे म्हणजे त्या घरांत असलेल्या एखाद्या घुशीने ‘हें आपलें आहे व यातील सर्व माणसें माझी मुलेच आहेत’ असें म्हणण्यासारखेच होय.

जीव हा परमात्म्याचा अंशच होय तर घर आणि देह हे पंचमहाभूतांचे कार्य होय. येथे कोणाचा कोणाशी संबंध आहे का ? हे न समजतांच तूं कां शोक करतोस ?

सूर्यकिरणे ही सूर्याचेच स्वरूप असल्याप्रमाणे तूं या देहांत आहेस व तो देह गेल्यावर केवळ आनंदस्वरूपी परमात्मा होणार आहेस, असें समजून समाधानाने रहा.

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img