*© श्रीधर संदेश*
*।।श्रीराम॥*
*मंगळूर*
*चि. अय्या यांस आशिर्वाद.*
२८-८-४८ तुझ्या पत्रात ‘आपणांस शरण आलेला हा एक पायरीपाषाण आहे. सद्गुरुमाउली ने या पाषाणाला घडवून याला एक दिव्य मूर्तीचे स्वरूप आणण्याचा भार घेतला आहे’ असे लिहिलेस ते अगदी यथार्थ आहे. तर (मग) चिंता कशाची? *’विचित्र कळा ये मायेची। परी ओळखी न संगवे वस्तूची।। मायातीता अनंताची । संत सोये सांगती।। वस्तुसि वर्णिले नवचें। तेंचि स्वरूप संताचें। या कारणे वचनाचें। कार्य नाहीं।। साधक भावे नमस्कार घाली। त्याची चिंता साधूस लागली। सुगमपंथे नेऊन घाली । जेथील तेथें ।।*
*काही एक नियम ठेवून तप करावे, भगवंतास भक्तिप्रेमाने आळवावे, अध्यात्म विचाराने मनाची शांति सदोदित कायम ठेवावी; आचार, विचार व उच्चार अगदी मृदु आणि उन्नत असावेत.*
सेवेची एक संधी तुला मिळली होती. पुढे योगाप्रमाणे मिळेल. *आत्मपरता हीच एक माझ्या मते आत्मरुप सद्गुरुची अत्युत्कृष्ट सेवा आहे. ‘पोटी गेल्या अमृत । बाह्य काया लखलखीत । हे जसे त्याप्रमाणे यापुढे सर्व काही साधतें.*
*सर्वहि सुखी असा.*
*श्रीधर*