Letters

पत्र.क्र. ९३

*© श्रीधर संदेश*

*साधकास मार्गदर्शन*

*ध्यान करताना जे ध्यान सर्वप्रथम अनायासे जमेल ते करावे. श्री दत्त अथवा श्रीराम दोघेहि तुझे शुद्ध रूप असलेले ब्रह्मरूप असे समजून त्या एकच आनंदरूप झालेल्या ब्रह्मस्वरूपाचे लक्ष्य ठेवून दोघांची उपासना चालू ठेव.* एकच तत्त्व पण दिसणारी उपासना रूपाने वेगळी वेगळी (निरनिराळी ) दिसल्यासारखी होते. हया सर्व गोष्टी तुला माहीत असल्या तरी पुन्हा सांगत आहे. कोणतेहि ध्यान मन सहजरित्या करीत असते. ज्या कोणत्या ध्यानाने आनंद होतो तेच ध्यान जास्त केले तर त्याची सहज साध्यता झाली असल्याने ते लवकर जमते व त्याचा साक्षात्कारहि लवकर होतो. *असे हे जमणारे ध्यान आपल्या मागील जन्मापासूनच आलेले आहे असेहि समजावयास हवे.*

साधकाने आसने, थोडा प्राणायाम, नमस्कार घातले तर शरीरहि काटक, सडपातळ, चपळ, शक्ति व उत्साहयुक्त राहून थंडीहि बाधत नाही आणि आरोग्यासहि ते चांगले असते.

श्रीरामापुढे तेरा, श्रीसमर्थापुढे अकरा नमस्कार घालून इतर स्थळी कष्टप्रद होणार नाही अशा प्रकारे नमस्कार घालावेत, थकवा वाटणार नाहीत असे घालावेत. त्याने हुरूप वाटला पाहिजे. तसेच त्यामुळे सुस्ति वाटू नये व उत्साहहि नाहिसा होऊ नये. हे लक्षात ठेवूनच नमस्कार करावेत. नमस्काराची संख्या नित्यासाठी नियमित असावी. नमस्कारामुळे भक्ति, चित्ताची एकाग्रता, उल्हास व आरोग्य वाढते. जमत असल्यास शीर्षासन, सर्वांगासन ही दोन्ही आसने तरी निदान करावीत.

श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

*(संग्राहक – रामस्वामी देवनहळ्ळी)*

home-last-sec-img