*© श्रीधर संदेश*
*श्रीमत् प. परिव्राजकाचार्य भगवान श्रीधरस्वामी महाराजांचा श्रीदत्तजयन्तीच्या शुभदिनानिमित्त दिव्य सन्देश*
*निजकिरणविकासितं जगत् गमयति निजसौख्यमद्वयं यत् । सुखशरधिभवांशुभानयं जगति विजयतेऽत्र विश्वधर्मः ।। शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः।*
*मानवी जीवनाचे मुख्य ध्येय दैनंदिन भौतिक जीवन नसून आत्मोद्वार हेंच आहे. जोपर्यंत देह, इन्द्रियें, मन आणि बुद्धि यांची शक्ति क्षीण झाली नाही तोपर्यंतच आत्मोद्धाराचा प्रयत्न करणे योग्य होय. आयुष्याचा अपव्यय करण्यांत काय अर्थ आहे? वैषयिक सुखांचा नेहमी ध्यास धरण्याने त्रिविधतापांच्या ज्वाला जास्तच उफाळतात व त्यामुळे अन्तःकरण दुर्बल बनते. या उलट बालपणापासूनच आत्मोद्धारासाठी तत्पर रहाण्याने आत्मज्ञानप्रद सूक्ष्मबुद्धिची शक्ति जास्तच वाहते. यासाठीच बाल्यावस्थेत जो शांत असतो तोच ‘शांत ‘ होय असे म्हटले जाते. पूर्वे वयसि यः शान्त: स शान्त इति कथ्यते।*
परन्तु आज सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनांत संसारिक विविध पदार्थाचा उपभोग घेण्याकडे अत्यंत प्रवृत्ति असल्याचे दिसून येते. त्यांची अन्तःप्रवृत्ति सुखप्राप्तीचीच असते व त्यानुसार ते प्रयत्नशील असतात. पण संसारिक पदार्थापासून खरे सुख कधी तरी मिळणार आहे काय ? बाह्य पदार्थातच खरे सुख आहे असे मानून त्यांच्या प्राप्तीसाठी आपल्या डोक्यावर निरनिराळी प्रापंचिक ओझी घ्यावयास लावणारे जीवन हे सर्वतोपरी सुखी जीवन म्हणू शकता येईल काय ? अशा प्रकारची संसारिक प्रवृत्ति पशू-पक्षी आणि स्वर्ग-नरक यांतहि आढळून येते.
वास्तविकरित्या विषयसुखाहूनहि श्रेष्ठ असें एक सुख आहे व तें निर्विषय, निरंकुश, निरवलंबित आणि निस्सीमित सुख. त्यांत विषयांची कल्पनाच उद्भवू शकत नाही. फक्त सूक्ष्मबुद्धीकडूनच या सुखाची प्राप्ती होते. हे सुख अखंड आहे. श्रुतिमाता म्हणते की, *’यो वै भूमा तत्सुखम् । नाल्पे सुखमस्ति । भूमैव सुखम् । भूमा एव विजिज्ञासितव्यः ।’* जेथे पहाण्यास, ऐकण्यास व समजण्यास इतर काहीही शिल्लक रहात नाही; फक्त अखंड एकमेव सुखरूपच शिल्लक असते तेच परमात्मरूप होय. जेथे दृश्य व पहाणारा, श्रवणीय व श्रवण करणारा ज्ञाता व ज्ञानी हे निरनिराळे असतात असे हे विश्व अल्प आहे. जें निरवधि सुख व अद्वितीय परमात्मरूप आहे तेच एकमेव नित्य, निर्विकार अविनाशी तत्त्व होय. याच्या विरुद्ध लक्षणांनी जें असतें तेंच अल्प होय.
*हे परमात्मस्वरूपसुख कोठे व कोणाच्या आश्रयाने रहातें?* असा प्रश्न केल्यास त्याला ते सर्वोपाधि विनिर्मुक्त सत्तामात्र स्वरूप आहे असेंच उत्तर आहे. परमात्मरूप आपल्याच प्रभावाने व वैभवाने प्रभावशाली व वैभवशाली आहे. ते आपल्याच महिम्यामुळे सुप्रतिष्ठित आहे. तेंच सर्वांचा आधार होय, त्याला कोणाचाच आधार नाही. केवळ आनन्द व सुख हेच त्याचें रूप. ज्याप्रमाणे रज्जूवर सर्पाचा आरोप केला जातो तद्वत् अद्वितीय आनंदरूप परमात्म्यामध्ये या जगताचा आरोप मात्र केला जातो.
गाई, म्हशी, हत्ती, घोडे, सोने, चांदी, दास, दासी, आयुष्य, आरोग्य, व्यवहार, बुद्धि, स्वरूपवान भार्या, पुत्र, जमीनजुमला, इष्टमित्र, इतकेच नव्हे तर गजांतलक्ष्मी असणे हे या संसारातील सुभाग्य व महान् वैभव समजले जाते पण उपनिषदें मात्र तसे मानीत नाहीत. कारण अनंतकोटि ब्रह्मांडातील संपूर्ण वैभवहि या आत्मीय अपार वैभवापुढें, या सत्य व सर्व कारण सुखाच्या व आनन्दापुढे अति अल्प, विनाशी, विकारी व असत्य आहे. मग या जगतातील दृश्यमान अशा संसारिक वैभवाची काय कथा? त्या परममंगल आत्मीय सुखावर बाह्यसुखाचा केवळ आरोप मात्र केला जातो. सरोवरातील पाणी व चित्रामध्ये दाखविलेलं पाणी यांत जेवढा फरक आहे तद्वतच या दोघांत फरक आहे. चित्रस्थ सरोवरांत पाणी दिसत असून नसते, त्यातून पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही; त्याचप्रमाणे काल्पनिक प्रपंचातील सुखांत सुख नसल्याने, त्याच्यापासून शांति समाधान आणि खरे सुख मिळू शकत नाही.
*न पश्यो मृत्युं पश्यति न रोगं नोत दुःखताम् । सर्वं पश्यः पश्यति सर्वमाप्नोति सर्वशः।* या प्रकारे वास्तविक सुखस्वरूपास जाणून आत्मदृष्टि ठेवणारा पुरुष मृत्यु पावत नाही. त्यामुळे रोग उत्पन्न होत नाहीत; त्याला दुःखाचा अनुभव घ्यावा लागत नाही; तो सर्वांठायीं भरलेल्या एकमेव आपल्या आनंदघनरूपासच पहातो व तद्रूप होऊन जातो असे श्रुतिमाता सांगते. हा मानवजन्म या मोक्षप्राप्तिसाठीच योग्य मानला जातो व तो मिळविणे हीच त्याची योग्यता होय. *सच्चिदानंदस्वरूपं ज्ञात्वा आनंदरूपा या स्थितिःसैव सुखम्।* अर्थात् आपल्या सच्चिदानंदरूपास जाणून घेऊन त्या निरवधि आनंदस्थितीत राहणे हेच खरे सुख होय व हेच मानवजीवनाचें मुख्य ध्येय होय.
*आज भगवान दत्तात्रेयाचा शुभजन्मदिन आहे. आजच्या या शुभदिनी श्रीदत्तात्रेय अखिल विश्वांतील लोकांचे दुःख निवारून, त्यांना देहसुखाच्या घाणीतून उध्दरून, तत्त्वज्ञानाच्या पावनतीर्थांचे स्नान घालोत; त्यांच्यातील हिंसावृत्ति व रागद्वेष नष्ट करून त्यांना समत्वाचा उपदेश करोत; वेदविहित निष्काम कर्म, एकान्तिक भक्ति, निर्विषय स्थिति, विश्वात्मभाव, स्वार्थत्याग, जनहितदक्षता, जगदुद्धारकता आदि गुणांनी त्यांना मंडित करोत व अशा प्रकारे ते आत्मतृप्तीच्या जगत् मंगलकर दिव्य जीवनाचा उपभोग घेवोत; अशी शुभकामना करू या.*
*सर्वे भवन्तुः सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥*
*श्रीधरस्वामी*