*गुरुवार १०/५/५१*
*चैत्र वद्य त्रयोदशी*
*हरिद्वार*
*चि. नीलकंठास आशीर्वाद.*
तुझी काळजी मला फारच वाटू लागली आहे.
*तो जीत असताचा मेला। मरणास मारून ज्याला ।जन्म मरण न स्मरे त्याला । विवेक बळें। तो जनी दिसतो परी वेगळा । वर्तता भासे निराळा। दृश्य पदार्था त्या निर्मळा स्पर्शलाच नाही।* या ओव्या नीट मनात आण. *’भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा’* अशा प्रकारे होऊं नकोस. *उपासना मूर्तिध्यानी । अथवा आत्मानुसंधानी ।अथवा श्रवण मननी निरंतर।* असे सारखे मनाला धारकी धरावें. *केल्याने सर्वहि होते. होत नाही म्हणून म्हणणारा करंटा, आपले अवगुण आपणच शोधून आपल्यास सुधारावे. आपले हित आपल्याकडेच आहे. स्वहिता ताडला प्राणी। असे कोणच्याहि दृष्टीने होऊ नये.* मारुतिरायांनी सांगितलेला नित्यनेम त्यावेळी सेवेमुळे होत नव्हता. आता आळसाने होत नसावा. पहा आपणास आपण वैरी बनू नकोस, *सद्गुरुकृपा होय त्यासी ।जो शोधी आपणासी।* श्रीसद्गुरु समर्थ कृपेला तुम्ही सर्वहि पूर्णपणे पात्र व्हा.
*इति शम्*
*श्रीधर*