Letters

पत्र.क्र. ९८

॥ श्री गुरवे नमः ॥

श्री परमानंद स्वामींना दिलेला आशीर्वाद

श्री गुरूला अनन्य शरण आलेल्या परमानंदास परमानंदी रहा म्हणून परमानंदाने दिलेला आशीर्वाद.

बाळ सुखरूप आहेस ना? एक आनंद रूप मिळविणे हेच इतर गोष्टींपेक्षा महत्त्वाचे. ‘सम्यक् न्यास: संन्यास:’ आनंदी असलेल्या स्वत:ला सोडून इतर सगळ्या गोष्टी त्यागणे म्हणजेच संन्यास. आनंदरूपाचा निश्चय करून कामक्रोधादि षड्रिपूंवर विजय मिळविणे म्हणजेच संन्यास.

अजिह्वः षंडक: पंगुरंधो बधिर एव च । मुग्धश्च मुच्यते भिक्षुः षड्भिरेतैर्न संशयः ॥
(नारद परिव्राजकोपनिषद्)

भिक्षु म्हणजे संन्यासी. त्याच्यात जर सहा लक्षणे असली तर तो सुख पूर्वक या भवसमुद्रपार जाऊ शकतो. अनंत आनंदस्वरूप मोक्षही मिळवू शकतो. ती लक्षणे अशी आहेत –

१.संन्याश्याचे पहिले लक्षण आहे ‘अजिह्व’ असणे. म्हणजे जीभ नसलेला. याचा अर्थ असा की हे इष्ट, ते इष्ट नाही, याला चव आहे त्याला चव नाही, असे ज्याला कधीच वाटत नाही, जो सदैव हित, मित व सत्य बोलतो असा.

२. नवजात मुलगी, षोडशी किंवा शंभर वर्षे वयाची म्हातारी यांच्याकडे पाहताना, त्यांच्या शरीराकडे न पाहता त्यातील निर्विकार आत्मस्वरूप चिन्मात्राचे दर्शन घेऊन किंचितही विचलित न होणारा, ज्याचे मन स्वत:ला ‘षंड’ म्हणून घेते. म्हणजेच जो काम प्रवृत्तींपासून दूर राहतो, त्याला झिडकारतो असा. असे हे दुसरे लक्षण जे संन्याशाला निवृत्तिमार्ग दाखवते.

३. जो भिक्षार्थी असतो व मलमूत्र विसर्जनासाठी हिंडतो किंवा वाटल्यास जंगलाकाठी असलेल्या एकांतात एक-दोन मैल चालत जातो, त्याला ‘पंगू’ असे संबोधतात. पंगूपणा हे तिसरे लक्षण.

४. कुठेही आला, गेला, बसला, उभा राहिला तरी ज्याची दृष्टी स्वत:भोवती चार हातापासून लांब जात नाही, त्याला ‘अंध’ म्हणतात हे यतीचे चौथे लक्षण.

५. स्तुती, निंदा, मन रमविणाऱ्या गोष्टी, तुच्छ लेखून बोलले बोल ऐकूनही जो आत्मरूप आनंद-अनुसंधानात राहतो, त्याला ‘बधिर’ म्हणतात. हे यतीचे पाचवे लक्षण.

६. ज्या गोष्टींमुळे सामान्य माणसाच्या तोंडाला पाणी सुटते, अशा गोष्टी अवतीभवती भरपूर पसरलेल्या असल्या तरी मन विचलित होत नाही अशा देहेंद्रियांनी जो बलिष्ठ असतो, अशा तरुण यतीला ‘मुग्ध’ म्हणतात. हे सहावे लक्षण,

बाळ! दारेषणा, पुत्रेषणा, वित्तेषणा या ईषणांना म्हणजे लोकवासना, शास्रवासना व देहवासना यांना त्यागून जो आपले स्वरूप हेच आनंदमय असे समजतो व त्यात लीन होऊन जातो, तोच संन्यासी, स्वरूपित अनंत आनंदावर आरोपित झालेल्या पिंड, ब्रह्मांड, जीवेश, स्त्री-पुरुष या भावनांना त्यांच्या वासनांसमवेत सोडून जो आनंदरूपे राहून केवळ निर्विकल्प राहतो, तोच यती, असा निर्भेळ आनंद मिळविण्यासाठीच ‘संन्यास’ असतो. त्याचा विचार करा अन् त्या स्थितीत रहा, हाच माझा आशीर्वाद.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img