Letters

पत्र.क्र. ९९

श्री श्रीधर स्वामींची काही उपदेशात्मक पत्रे
पत्र.क्र. ९९

॥ श्री गुरवे नमः ॥

कुमारी जानकीस दिलेला आशीर्वाद

आपण आपल्याला जाणून घेणे ही काही कल्पना नव्हे. आपण नुसतेच एक देह नव्हे तर एक अपार आनंद आहोत,
हे जाणून घेणे गरजेचे आहे. हा अनंत अनुभव म्हणजेच मी, असा आपल्या मतीला जेव्हा प्रकाश मिळतो तेव्हा आपण
कोण हे समजून आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूपाचा साक्षात्कार झाला असे समजावे. तेव्हा कसलेही भान राहत नाही,
कसलीही चिंता वाटत नाही. मनात चिंतनही येत नाही, फक्त आनंद तेवढा एक जाण म्हणून जागृत राहतो; यालाच
जीवन्मुक्ती अथवा सदेह कैवल्य म्हणतात, यालाच मोक्ष असे नाव आहे. आत्मचिंतनाची ही शेवटची पायरी.
हे शेवटचे फळ आत्मज्ञानाने प्राप्त होते. एक बिंदू सिंधूत सामावल्यानंतर तो सिंधूच होतो, तसेच अल्प विषयसुखाची
जाणीव असणारा हा जीव अनंत-रूप परमात्म्यामध्ये एकरूप होऊन परमात्म्याशी सायुज्य मिळवितो किंवा आपले
मूळ स्वरूप परत मिळवितो; यालाच मोक्ष म्हणतात. सुख मिळणार अशी अपेक्षा धरून संसार नामक बाजारात हा
जीव येतो, साऱ्या विषयांच्या दुकानातून हिंडतो, बरीच शोधाशोध करतो आणि कुठेही सुख मिळाले नाही म्हणून
शेवटी परमात्म्यालाच साकडे घालतो. त्याच्या क्रुपेने सद्गुरूद्वारे आत्मज्ञान मिळवून, संसार-सुखापासून परावर्तित
होऊन मूळरूप परमात्म्यामध्ये एक होऊन जातो. स्वत:च एक आनंद, होऊन जातो; हाच मोक्ष. कोणतेही दु:ख
नसता असीम आनंद असणे हाही मोक्ष. या देहात जो आपले जनन व मरण पाहून त्यातून काही अपेक्षा न ठेवता
जगतो, तोच जीवन्मुक्त होतो. मी, माझे ही जाणीव आपल्या अनंतानंत आनंदाच्या, आद्य परमात्म्याच्या रूपात
विरघळून जाताना पाहतो. तो आपले मरण पाहतो. आत्मज्ञानाच्या दृष्टीने मरणे, ‘मी’ पणाची बचलता नाहीशी
होऊन आपले निश्चल, यथार्थ आनंदरूपे नित्य, निर्विकल्प होऊन असणे म्हणजेच हा देह जसाच्या तसा
असतानाच एकदा मरून पुन्हा जन्माला येणे. मायारूपी द्वैत नाहीसे होऊन निजरूप अद्वैत प्रकट होणे,
दुजे काही न बाळगता एकटेच राहणे. मोक्षासाठीच मिळालेल्या या देहात जन्म घेऊन, हा देह असतानाच
एकदा मरून जो पुन्हा जन्माला येतो. त्याला पुन्हा गर्भवासही घडत नाही आणि त्यामुळे मृत्युबाधाही होत नाही.
तेव्हा तो जन्म-मरणावर विजय मिळवून मोक्षसाम्राज्याचा स्वामी, आनंदघन परमात्मा होतो. ‘गुरुप्रसादेन मुक्तो
भवति पार्वति’ – श्री शिवाने पार्वतीबद्दल हे सांगितले आहे, की तिला मोक्षानंदाचे सौभाग्य मिळाले, ते गुरुसेवेच्या
परमानंदाच्या दिव्य फळामुळे. मोक्ष तेव्हा मिळतो जेव्हा उत्कट, अनन्य भक्तीने पवित्र गुरुसेवा परमानंदाने केली
जाते. जो देह जीवन्मुक्त होतो तो महासागरातील हिमनगासारखा त्या आनंद – महोदधीत थोडा-थोडा विरघळत
जातो. त्यानंतर देहाची गरज नसल्यामुळे आनंदघनब्रह्मरूप होऊन राहतो. आनंदाशिवाय तेथे काहीही राहत नाही.

क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे’ – ज्ञान्याचे संचित, प्रारब्ध, आगामी ही तिन्ही कर्मे नाश पावून त्याचेवर
पुन्हा जन्म घेण्याचा प्रसंग येत नाही. ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते; पुनर्नाभिजायते,
पुनर्नाभिजायतें – तो ज्ञानी पुन्हा या मृत्युलोकी येणार नाही. वेदामध्ये दोन-दोनदा सांगितले आहे, की कोणत्याही
लोकी पुनर्जन्म घेणार नाही. ‘परे व्यये सर्वं एकीभवति’, ज्ञान्याचे प्राणादि सर्व काही अविनाशी आनंदस्वरूपात
ऐक्य होऊन नष्ट पावते, असे श्रुतीत म्हटले आहे.

संचित, प्रारब्ध, आगामी ही तिन्ही प्रकारची कर्मे, अनेक जन्मांपासून साठून पुढील अनेक जन्मांना कारणीभूत
होतात, तेच संचित. एका जन्मी तीन जन्मांना पुरेसे संकल्प केले जातात, त्यांपैकी या जन्मी पाठलाग करून
आलेले कर्म हे ‘प्रारब्ध’: या जन्मी केलेले कर्म पुढे अनेक जन्मांना कारणीभूत ठरते, तेव्हा त्याला ‘आगामी’ म्हणतात.
देहसुख-वासनाच पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. पण आत्मसुखाच्या अनुभवाने ती निघून जाते.
आनंद बह्मरूपात ऐक्य व्हायचे असल्याने पुढील कित्येक जन्मांना कारणीभूत ठरणारे संचित आगामी कर्मे,
ज्ञान्याला आपण ‘निष्क्रिय’ आहोत याची जाण देतात. आपला जन्म उपयोगी होणार नाही, हे पटल्याने त्याचा
संपूर्ण नाश होतो. ज्ञान्याच्या देहाला कारणीभूत ठरलेले प्रारब्ध आयुष्य असेपर्यंत आपली फळे देऊन आपोआप
नष्ट पावते. ज्ञान्याचे पाप-पुण्यकर्म, त्याचे भजन-दूषण करणाऱ्याकडे जाते व जन्म मरणांना कारणीभूत ठरलेल्या
तिन्ही कर्मापासून त्याची सुटका होते व या चक्रात सापडतच नाही.

सूर्यकिरणांसारखे आनंदरूपे स्वयंप्रकाशित राहून आपली प्रकाशकिरणे म्हणजेच या साऱ्या कल्पना आहेत,
असे जो निश्चितपणे मानतो त्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. महासमुद्रातील लाटा जशा आपणहून
नाहीशा होऊन जातात, तशाच त्या कल्पना आनंदस्वरूपात विलीन होऊन जातात. आपलेपणाची अद्वितीय
जाण ही त्या आनंदापेक्षा दुसरे काही नसते. ज्ञान्याचे मन समुद्राला भेटणाऱ्या नदीसारखे असते. अनवरत ज्ञान
उजळ होत आहे, त्यापायी आपली काम-क्रोधादि बाधा, आपले कल्पना-प्रपंच. बाह्य प्रपंच यांपासून तो बहिर्मुख
होत नाही. यालाच परमपद म्हणतात. हे मरण, मरणाच्या कल्पनेला पळवून लावते.

जानू, तुझा उद्धर व्हावा यासाठी मी खूप प्रयत्न करतोय. तू विचारलेस की मोक्ष म्हणजे काय? त्याला उत्तर
असे आहे –

पोरी, गुरू हा त्रास निवारण करतो. आनंदरूप देतो. त्याच्यापासून कुणाचेही वाईट होत नाही. ब्रह्मानंद सोडून
तो इतर काहीच देऊ शकत नाही. गुरू बाधा निवारण करतो. बाधा देत नाही. गरुसेवा, ध्यानधारणा, या गोष्टी
आत्मनिश्चयाने कराव्यात. त्याच्यावर अचंचल भक्ती करावी व असे समजावे की गुरू हा आपला उद्धार करायला
आलेला आनंदघन परब्रह्ममूर्तीच आहे. एवढे जर मनी ठसविले, तर निश्चितपणे साऱ्या बाधा, सारे अज्ञान नाहीसे होते.
या एकादशीच्या दिवशी पूर्ण गुरुगीता अर्थ लावून वाच. तेव्हा तुला समजेल, की गुरू कसा असतो.

तुझे हित होवो असा आशीर्वाद देतो.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img