Letters

पत्र.क्र. १३

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*मंगळूर*
*फेब्रुवारी १९४६*

*चि. राधेस आशीर्वाद.*

तुझ्या वडिलांचे पत्र येऊन पोहोचले, मजकूर समजला.
*Think before you leap* उडी घेण्यापूर्वी विचार करावा. मनाचा ओढा प्रपंचाकडे असल्यास मग काहीच हरकत नाही. दुःख नाही. दोघांचा संसार सुखाचा होईल. गाडीच्या चाकाप्रमाणे नवरा-बायको एकाच मताची असली म्हणजे संसार गोड करून परमार्थ शक्य तितका साधता येतो. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे प्रवृत्ति अथवा निवृत्ति त्याच्या त्याच्या वाट्याला येते. प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला प्रवृत्तिमार्गानेच परमार्थाकडे वळावे लागते. एकदम निवृत्ति त्याच्या आहाराबाहेरची असते. *प्रपंच साधून परमार्थ केला । तो नर भला रे भला ।* मीही पण असेच तेंव्हा म्हणेन. *अधिकारापरी करू उपदेश। साहे ओझे त्यास तेचि देऊ ।।*

विवेकानंदावर एका मोठया श्रीमंत घराण्यातील मुलीचे प्रेम जडले होते. “नोकरीकरता कशाला रखडत फिरतां? माझ्याशी लग्न करून घेतल्याने माझी सबंध जिंदगी तुमचीच आहे. मला तुमच्या पायाची दासी करून घ्या” म्हणन तिने विवेकानंदाना त्यांच्या पूर्वाश्रमांत पत्र पाठविले होते. तेव्हा त्यांनी “या मलमासाच्या देहावर प्रेम ठेवायचे ते त्या आनंदरूपी परमेश्वरावर ठेवलेंस तर दुःखमय अशा संसारातून कायमचीच तुझी सुटका होईल.,,! असे तिला लिहून कळविले होते, असे त्यांच्या चरित्रात आहे. नारायण महाराज म्हणून एक होते, त्यांनीहि लग्न करू इच्छिणाऱ्या मुलीसमोर ” माझ्याशी लग्न करणे आणि या खांबाशी लावणे दोन्ही सारखेच. असे स्पष्ट बोलुन दाखविले होते. आपल्या मनातले विचार स्पष्टपणे कळवावे म्हणजे दुसऱ्याची फसगत होत नाही. लग्न झाल्यावर कित्येकांचे वैराग्य टिकत नाही. रडतराऊताला घोड्यावर बसून तरी काय उपयोगाचे! *’निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेंचि फळ ॥*, *ऋतुमयः पुरुषः ।* निश्चयाप्रमाणे मनुष्य बनतो. *”जया पुरुषासि जें ध्यान । तयास तेंचि प्राप्त ।।”*

*श्रीधर स्वामी*

home-last-sec-img