Letters

पत्र.क्र. १७

*© श्रीधर संदेश*

*स्वर्गाश्रम*
*फाल्गुन शु. १५*

*चि. आण्णास आशीर्वाद.*

कालच तुझे पत्र येऊन पोहोचले. श्रीसमर्थकृपेने आम्हा सर्वांची देहप्रकृति उत्तम आहे. तुम्हा सर्वांची खुशाली समजली. चि. भाऊची देहस्थिति पूर्वीप्रमाणेच आहे असें तुझ्या पत्रात आढळून आले. ईश्वरकृपेने त्याची प्रकृति उत्तम बनो. श्रीदासबोध वाचित आहेसच, *’जो जे वांछील तें तें लाहो । प्राणिजात । ‘* अशाच इच्छेने श्रीसमर्थांनी श्रीदासबोध म्हणजे एक कल्पतरू, भक्तांच्या इच्छा पूर्ण होण्यास आपल्या अवतारसमाप्तीनंतर आपलेंच रूप म्हणून सांगून आपल्या समर्थ नावाची उज्वल किर्ति कायम राखण्याकरिता आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपल्या मागे ठेविला आहे. *’यो यदिच्छति तस्य तत्।”* *यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्’* असें मी लिहिले तर *’सत्याचा जो स्वाभिमान । तो जाणावा निराभिमान । ‘* असेंच ठरेल. *प्रथाचें करावें स्तवन । तरी स्तवनाचे काय प्रयोजन । येथे अनुभवा कारण । अनुभव पहावा ।।’* सात आठ दिवसांच्या आतच येथून माझे प्रयाण होईल. गिरनारास जाणार आहे.
सर्व सुखी असा।

*श्रीधर*
*संग्राहक व प्रेषक-नीळकंठ रामदासी सामनगड.*

home-last-sec-img