Letters

पत्र.क्र. १९

*© श्रीधर संदेश*

*।। श्रीराम समर्थ ॥*

*वरदपूर. २० -७-१९६७*

*चि. XXX यांस आशीर्वाद.*

*’कष्टेन्विण फळ नाही’* हीच गोष्ट या पत्रांतून मी सांगणार आहे. *’आधी कष्ट मग फळ’ ( सुख )* हे जीवनाचे रहस्य आहे.

*’यत्तवग्रे विषमिव परिणामेऽमृतोपम । तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ।।’*

जें प्रथम विषाप्रमाणे कडू असते, ते शेवटी अमृताप्रमाणे गोड होते, असें सुख सात्विक सुख होय असे समजावे व त्यामुळे आत्मज्ञानाने प्राप्त झालेली प्रसन्नता अंगी बाणते हेच तत्व तुझ्या स्वप्नाने स्पष्ट होते.

प्रथम कडू असलेल्याचा त्याग करून गोड असणारा ची प्राप्ति करून घेतली पाहिजे, म्हणजेच परमार्थात किवा श्रीगुरुसेवेत होणा-या कष्टांकडे दुर्लक्ष्य करून शेवटपर्यंत श्रद्धाभक्ति अचल राहिली तर श्रीगुरुप्रसाद न चुकता मिळाल्याशिवाय राहणार नाही.

आरंभी अनेक विघ्ने येतील, श्रीगुरुंची सेवा सोडून द्यावी असें हि वाटेल. त्यास अपमान आणि कष्ट कारणीभूत होतील ह्या सर्वांवर जय मिळवून हाती घेतलेली श्रीगुरुसेवा शेवटपर्यंत नेल्यास त्याचे गोड फळ निश्चितपणे मिळणार आहे. इतकेच नव्हे तर श्रीगरुकृपेने इहपर कल्याणच होईल. काही लोक तुला चांगल्या कामापासून परावृत्त करण्याठी व गुरुभक्तीमध्ये बिघाड आणण्यासाठी अनेक प्रकारे तुझं मन वळविण्याचा प्रयत्न करतील परन्तु त्या गोष्टींना बळी न पडता जो आपल्या गुरुभक्ती पासून न चळता, सतत गुरुसेवेत शेवटपावेतों टिकतो तोच श्रीगुरुकृपेस पात्र होतो व तोच आपल्या जीवनाच्या साफल्याची प्राप्ति करून घेतो. हेच तत्व तुझ्या स्वप्नातील दृष्टांतात सांगितले आहे असे समज.

एकंदरीत कोणत्याहि आपत्तीला न डगमगता श्रीगुरुदेवांच्या पूर्ण कृपेस पात्र होऊन इहपर प्राप्ती करून घेऊन कृतार्थ हो ! हाच माझा तुला आशिर्वाद आहे.

*इतिशम्*

*मूळ कन्नड पत्रावरून अनुवादित*

*(खुलासाः* वरील पत्रात ××× म्हणजे ज्यांना हे पत्र लिहिले गेले त्यांचे नाव मूळ *श्रीधर संदेश* पुस्तकात प्रसिद्ध झालेले नाही असे समजावे.)

home-last-sec-img