Letters

पत्र.क्र. २०

*© श्रीधर संदेश*

*श्रींचे उपदेशपर पत्र*

*मुलांनो!*

देव व ब्राह्मण यांच्या ठिकाणी संपूर्ण श्रद्धाभाव ठेवून वागा!
देवस्व व ब्रह्मस्व हे विष आहे हे विसरू नका! विनयाने सर्वत्र जयच प्राप्त होतो. शहाण्या मनुष्यास भांडण करण्याची पाळीच येत नाही. आपले बोलणे सत्य, मधुर, हितकर व मित असावे.

*’सर्वाच्या ठिकाणी परमात्मा आहे’* अशी भावना ठेवून त्यांचा अपमान करूं नका !
मारण्यापेक्षा बोलण्यानेच मनुष्य जास्त घायाळ होतो व त्याची जखम कधीही भरून येत नाही.
तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल दृढविश्वास उत्पन्न झाल्यास सर्वच तुमचे मित्र बनतील. काया वाचा-मनाने कोणाचेंहि अहित चिंतूं नये सर्वकाळ मन शुद्ध ठेवावें. मनुष्याची अंतर्बाह्य वागणूक चांगली असावी. सज्जनांना आवडणाराच परमात्म्याच्या कृपेस पात्र होतो.
धनार्जन न्यायाने करावें.

आपण लोकांशी जसे वागूं त्याप्रमाणेच लोकहि आपल्याशी वागतात.
सज्जनाबरोबर सर्व सज्जनतेनेच वागतात.
परद्रव्य व परस्त्रीबाबत आपले मन अत्यंत शुद्ध असले पाहिजे, तसे नसल्यास ते आपल्या दुर्गतीस कारण होते.
सदाचारी मनुष्यास तो जाईल तेथे यश व मान्यता मिळते,
*श्रीगुरुआज्ञा प्राण गेला तरी उल्लंघू नका!* श्रीगुरु हे परमात्म्याचे व्यक्त रूप होय. कितीहि वैभव प्राप्त झाले तरी त्याचे सर्व श्रेय परमात्म्याचेच आहे असे जाणावें श्रीगुरुसेवेंत आपल्या सर्व
वैभवाचा उपयोग करावा, देव, ब्राह्मण व श्रीगुरु हे आपल्या जीवनाचे आधार मानावेत.

*मुलांनो!*
श्रीगुरु परमात्म्याच्या अनुग्रहाने सर्व सद्गुण तुमच्या ठायीं निर्माण होवोत. तुम्ही सर्व आपल्या गुरुचे महत्त्वदर्शक अशा दीपस्तंभाप्रमाणे व्हा व त्याच्या प्रखर प्रकाशाने उज्ज्वल व्हा! प्रकाशमान व्हा !

*। इतिशम् ।*
*’सर्वे जना: सुखिनो भवन्तु ।’*

*श्रीधरस्वामी*

*काशीक्षेत्र नंदननाम संवत्सर*
*कार्तिक वद्य ५ शके १८५४*

home-last-sec-img