Letters

पत्र.क्र. २६

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीगुरुवे नमः ॥*

*वरदपूर १६-७-१९५७*

*चि. xxxxx यांस अनेक शुभाशीर्वाद*

तुझे १३-७-६७ चे पत्र मिळाले मजकूर समजला. तूं, रामभट्ट नागली, रान्नप्पा नागली, गौड नागली हे सर्व माझे भक्तच आहांत, गुरुभक्तांचा जीवनक्रम सर्व बाजूंनी निर्दुष्ठच असतो. अन्यथा तो विषादकच म्हणावा लागेल. न्याय, नीति, आचार-विचार स्वपरहितकरच असतो हे सर्वास ठाऊक आहे.

*’आत्मन: प्रतिकूलानि न परेको समाचरेत।* प्रतिकूल आचरण जसे आपल्यास तसेच इतरांनाहि अहितकारक व दुखःदायक असते. इतरांना प्रतिकूल होणार नाही असा आचार, सामान्य मनुष्यधर्म व विश्वासार्ह आचरण असणाऱ्यासच मनुष्य म्हटले जाते.

मनुष्याने घडलेल्या गोष्टी सहन करणे तसेच पुढील भविष्यात होणाऱ्या गोष्टीबद्दल विचार करून त्याप्रमाणे जागरूकता ठेवणे योग्य होय.

लोकांनी आपल्याशी ज्याप्रमाणे व्यवहार करावा अशी आपली इच्छा असते त्याप्रमाणेच आपणहि न्याय-नीतीने दुसऱ्याशी व्यवहार ठेवावा. असा व्यवहार ठेवणाराच खरा मनुष्य होय. झालेल्या गोष्टीस उपाय नसतो. यापुढे तरी तुम्हा सर्वास न्याय, नीति, सौजन्य, परोपकार, सहृदयता, सत्य आचार-विचार, उन्नत अशी पारमार्थिक दृष्टि आणि सर्वात्मभाव इत्यादि सद्गुण देवाविषयी व गुरुभक्ताविषयी उत्पन्न व्हावेत असे तुम्हां सर्वाना माझे हार्दिक आशीर्वाद आहेत.

*सर्वे जना : सुखिनो भवन्तु ।*

*इतिशम्*

*ताजाकलम*

मी स्वतः पत्र लिहिणे सोडण्यास बरेच दिवस झाले म्हणून हे पत्र मजकूर सांगून लिहवून घेतले आहे. तुम्हा सर्वावर याचा अनुकूल परिणाम होवून माझे श्रम सार्थकी लागावेत. सर्वांनी एकमेकांबद्दल आदर बाळगून एकमेकांस सहाय्यकर होऊन न्यायनीति न सोडता आनंदात जीवन कंठावे.

*(खुलासा:* वरील पत्रात ××× म्हणजे ज्यांना हे पत्र लिहिले गेले त्यांचे नाव मूळ *श्रीधर संदेश* पुस्तकात प्रसिद्ध झाले नाही असे समजावे. *)*

home-last-sec-img