Letters

पत्र.क्र. ३१

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ॥*

*श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीश्रीधर स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र काशी येथील सौ. सावित्रीदेवींना पाठविलेले उपदेशपर पत्र*

*बाळे* ही सारी सृष्टी हा चित्ताचा विलास आहे. चित्त एका वस्तुकडे असेल तर दुसऱ्या कोणत्याहि वस्तूची भावना होत नाही. *आपल्या समोर श्रीगुरुमूर्ति उभी येऊन राहिली तरी आपले चित्त त्यांच्याकडे नसेल तर आपणास भावनाहि होणार नाही व श्रीगुरुंचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा होणार नाही.* चित्त म्हणजेच आपला एक प्रकारचा संकल्प होय. विचार करून पहाता आपण व आपला संकल्प याशिवाय दुसरे काहीहि नसते. आपल्या कल्पनेत जो विजातीय संस्कार आहे तो बाजूस सारून आपण सदा अखंड स्वरूपांत आपल्या कल्पनांचा, तसेच त्यापासून होणाऱ्या पिंड-ब्रह्मांड, जीव-ईश, माया, अविद्या इत्यादि संपूर्ण भिन्न भिन्न वृत्तींचा लय करुन ‘मी शुद्ध ब्रह्म आहे’ या स्मृतीपासून रहित होऊन केवळ मूळ अस्तित्वात राहणे ही निजस्थिति होय.

*बाळे ! अशी स्थिति प्राप्त करणे हाच तत्वसाक्षात्कार वा आत्मस्वरूपप्राप्ति होय, ह्या स्वरूपस्थितीचे दर्शक जे दयाळु सद्गुरु आहेत ते सुद्धा निस्फूर्तिका असे आपले स्वस्वरूपी ब्रह्मच होत. आपल्या हृदयांत चांचल्यतेला किंचितहि स्थान न देता । देहोऽहम् ‘ या भावनेपासून ते ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ पावेतों जेवढया स्फूर्ति आहेत त्या सर्व आपल्या स्वरूपात विलीन करून ज्ञानस्वरूप केवळ शुद्ध ब्रह्मच परिपूर्णतेने अंतरबाह्य भरलेले आहे असा निश्चय करून त्या अनंतानंदात तद्रूप होणे हीच आत्मनिष्ठा होय. हाच गुरुदेवांचा रहस्यमय उपदेश आहे. गुरुपदेशाच्या या गूढ रहस्याचे मर्म समजून घेऊन एकाग्र मनाने बहिर्मुखवृत्ति नष्ट करून अंतर्मुखवृत्ति वाढवीत जावी.*

*बाळ! हीच गुरुदेवांची सेवा आहे. गुरुदेवांची प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी अशीच निष्ठा वाढवला पाहिजे. पूजा-पाठ, जप-तप, नेम-व्रत, इत्यादि अभ्यासामुळे आपल्या स्वरूपस्थितीत राहणे म्हणजेच श्रीगुरुदेवांचा अत्यंत सन्निकाश प्राप्त करणे होय, बाळे ! मनाचे सर्व दौर्बल्य घालवून व बाहय साधनांना कमी करून ज्याप्रमाणे पाण्यांत पाणी मिळविल्यावर तें एकरूप होते त्याप्रमाणे गुरुरूप परब्रम्हात तद्रूप होऊन स्वरूपस्थितीतच रहावे ।*
*इतिशम्*

*तुझाच आत्मा*
*श्रीधर*

home-last-sec-img