Letters

पत्र.क्र. ३२

*© श्रीधर संदेश*

*मुक्काम काशी*
*हेमलंबी नाम संवत्सरे*
*आषाढ शु।१५ शके १८७९*

*कर्नाटकांतील सर्व भक्तवृंदास आशीर्वाद.*

तुम्हा सर्वांचे जीवन मंगलमय होऊ दे. तुम्ही सर्व पवित्र व आदर्श व्यक्ती बना. तुमच्या जीवनाच्या सर्व व्यवहारात मुर्तिमंत धर्म नांदू दे, मी इकडे आल्यानंतर दुप्पट-तिप्पट उत्साहपुर्ण दक्षतेने सर्व कार्ये पार पडावीत. तुमच्या सत्कार्याची ती कीर्तीच मला तिकडे ओढून नेईल हे नि:संशय.
आश्रम स्थापन करुन मी इकडे आलो आहे. पाठशाळेचा प्रारंभ झाला आहे. *हीत आदर्श धार्मिक शिक्षण मिळून ही संस्था पुर्णपणे यशस्वी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. या शिक्षणसंस्थेतून अध्ययन पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी ‘धर्मसूर्य’ बनून सर्वविश्वाला प्रकाशमान करावे, असा मनांत उदित झालेला दिव्यसंकल्प आहे.*

*सर्वांच्या आपत्तींचा परिहार करुन, सर्वांना दिव्य आनंद प्राप्त करून देऊन इहपर शांतिसौख्य देणारे तें एक परमपवित्र स्थळ होण्यासाठी, माझ्या स्मृतीला उजाळा देणारा ‘वरदपूरचा श्रीधराश्रम’ माझ्या प्रतिनिधीरूपाने मी प्रयत्नपूर्वक तेथेच ठेऊन आलो आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः।’ या न्यायाने त्याचे रक्षण तुम्ही केलेत तर तो चांगला धष्टपुष्ट होऊन तुमचेहि रक्षण करील. आश्रम पवित्र राखणे व त्याची भरभराट करणे तुमच्या हातांत आहे.कोणत्यातरी एखाद्या तुच्छ हेतूने काही लोक आश्रमाबद्दल अपप्रचार करीत असले तरी आपल्या कार्यात तुम्ही अचल विश्वास ठेवाल तर अल्पावधीतच तो आश्रम आपल्या दिव्य प्रभावाने निंदा करणारांना वंदन करावयास लावील हे सूर्यप्रकाशाइतकें स्पष्ट आहे. तुम्ही सर्व धर्माचे प्राणच बना! तुम्हा सर्वांचे जीवन दिव्य व्हावे.कसलीहि उणीव म्हणून न राहता तुम्ही सुखाने नांदा! तुम्हाला आदर्श मानून सर्वजणांनी कृतार्थ व्हावे. “धर्मा चे स्फूर्तिकेंद्र म्हणजेच वरदपुर” असा संदेश वरदगिरीच्या शिखरावरील दिव्य धर्मध्वज देत आहे. सर्वांचे लक्ष तिकडेच केंद्रित होऊ दे.*

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।’*
*इति शम्*

*श्रीधरस्वामी*
(मूळ कानडी पत्रावरून अनुवादित -‘श्री श्रीधरस्वामी महाराज’या पुस्तिकेतुन)

home-last-sec-img