Letters

पत्र.क्र. ३९

*© श्रीधर संदेश*

*एक उपदेशात्मक पत्र-*

*श्रीगुरुकृपा*

श्रीगुरुनिष्ठा कधींहि व केव्हांहि नष्ट होत नसते. मनुष्यास आपल्या देहावरील प्रेमाचा त्याग करावा अशी प्रेरणा होते. मान व अपमान हे त्यांना समानच वाटू लागतात. त्यांच्या मनांत दया, क्षमा, शांती उत्पन्न होते. श्रीगुरूंचा आश्रय लाभल्यामुळे ते अखंड समाधानी असतात. त्यांची निस्वार्थबुध्दी निश्चल होते. सर्वप्रकारच्या सद्गुणामुळे ते सर्वांना प्रिय वाटतात. वाणीमध्ये माधुर्य येते. आपपर दृष्टी नष्ट होऊन समदृष्टी उत्पन्न होते. आपल्यासारखेच इतर आहेत असा दृढभाव कायम राहून दुसऱ्याच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी असे त्यांना सतत वाटते. विषयव्यामोहाचा त्याग करावा असे सतत वाटते. *काम क्रोधादीवर विजय मिळवून ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून जीवनमुक्त होणे हीच ‘गुरूकृपा’.*
*सर्व सद्गुणलक्षणापैकी एखादे लक्षण कमी असल्यास श्रीगुरूंची भक्ती मन लावून करीत शुध्द सेवा करावी. श्रीगुरुंचें ध्यान व जपाद्वारे मोक्षप्राप्ती करून घेण्याच्या तीव्र इच्छेने साधनेची काळजी, विनय, आज्ञापालन, शुभ आचार विचारानी, उपचारानी शांतिसमाधानपर उपचारांनी सत्यवचन व सदाचार राखणे याद्वारे श्रीगुरुंना प्रसन्न करुन घेण्याचे जोमाने प्रयत्न करावेत. कारुण्यमूर्ती गुरुंना आपली करुणा येईलच येईल. त्यांच्या कृपेमुळे दैवीं संपत्ती एकत्र होऊन जीव नक्कीच ब्रह्मस्वरुप प्राप्त करुं शकतो. मोक्षाची अपेक्षा असूनहि योग्य साधना न केल्यास तसेंच श्रीगुरुकृपेचा उपयोग न केल्यास त्या साधकास मोक्षमार्गदर्शन होणार नाही.* अवगुणांचा त्याग करून काळजीपूर्वक निरहंकारी बनून अखंड आत्मानुसंधान केल्यास त्याला मोक्षमार्गदर्शन घडून आत्मसूर्याच्या प्रकाशाचा साक्षात्कार होतो.

ब्रह्मरूपी श्रीगुरु संपूर्णपणे आनंदरूपीच. त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव असत नाही. जसें समुद्रास भरती ओहोटी असली तरी तो समुद्र सर्वत्र व्यापलेला असतो तसेंच श्रीगुरु हे स्थिरचर अशा सर्व प्रपंचामध्ये एकमेवच व्यापून असतात, समजलांत कां बाळानो !
__ गुरुवात्सल्य तुम्हाला अपरिचित आहे का ? ज्याप्रमाणे उच्चकुळांत जन्मलेली सुसंस्कृत आई आपली मुलें सुसंस्कृत व सुमार्गी व्हावीत यासाठी प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे श्रीगुरु आपले शिष्य सुमार्गी व उत्कृष्ट व्हावेत असा प्रयत्न करीत असतात. अनुभवी चिकित्सक वैद्य आपल्याकडे चिकित्सेसाठी येणान्या रूग्णांना जास्त प्रभावी औषधे, मात्रा देऊन त्यांचा रोग पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी प्रयत्नशील असतो त्याप्रमाणेच ज्ञानवि ज्ञानांत पारंगत असणाऱ्या शिष्यांचा उध्दार करण्यासाठी अनुभवी भवरोग वैद्य श्रीगुरु आपल्या भवरोगी शिष्यांना साधनाज्ञानरुपी औषधे देऊन, आपल्या देवी शक्तीची जहाल मात्रा देऊन त्यास पूर्ण सिध्दता प्राप्त होईपावेतो उपचार करतो, शक्तिपात करवितो म्हणजेच श्रीगुरु आपल्या सामर्थ्याने शिष्यातील दोष नाहीसे करतो, बाधा घालवितो व विघ्नांचा परिहार करतो. वैद्यास आपले प्रकृतिमान सांगितल्यावर तो त्याबाबत विचार करुन, औषधोपचार करण्याप्रमाणेच शिष्याची भूमिका, त्यास येणारी विघ्ने, बाधा ही श्रीगुरुंना समजताच ते त्याच्यासाठी काय उपाय करावयाचा याचा विचार करतात आणि शिष्याची मुमुक्षा किती तीव्र आहे हे जाणून घेऊन श्रीगुरु उपचार करतात.

*श्रीगुरुंनी दिलेली साधना जितक्या आतुरतेने, निग्रहाने करतील, आपला अहंकार व प्रतिष्ठा यांचा त्याग करून श्रीगुरूंचा उपदेश जितक्या लवकर आत्मसात करून घेऊन स्वतःस ज्ञानवैराग्यसंपन्न करून घेतील तितक्या अवधीतच तें आत्मसाक्षात्कार प्राप्त करुन घेतील.*

*ताक घुसळून आई मुलांच्या हातावर लोण्याचा गोळा ठेवते त्याप्रमाणे श्रीगुरु श्रुतिशास्त्रसार काढून व पुष्कळशा साधना करवून त्यांचे सार शिष्यास अनुभवावयास देतात म्हणजेच ही गुरुकृपा नव्हे काय ?*

बाळांनो! काया वाचा मनाने करावयाची तपश्चर्या भगवद्गीतेच्या १७ व्या अध्यायातील १५ व १६ व्या श्लोकांत दिलेली आहे ती पहा तिचे आचरण करून दैवी संपत्तीचे बाबतींत ‘दैवासुरसंपत्ति विभाग’ हा भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायांत पहा, तुम्ही सर्वानी मुक्तिसाधनरूप असलेल्या संपूर्ण गुरुकृपेस पात्र होऊन शीघ्रातिशीघ्र जीवन्मुक्ती प्राप्त करावी. तुम्ही आपल्या पावन आदर्श सत्चरित्राने इतरांचाहि उध्दार करावा असा माझा तुम्हाला हार्दिक आशीर्वाद आहे.

*ॐ तत्सत्*
*इति शिवम् ।*

*- श्रीधरस्वामी*
*सज्जनगड*

home-last-sec-img