Letters

पत्र.क्र. ४२

*© श्रीधर संदेश*

*डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, मुंबई यांस*

*॥ श्रीराम समर्थ ॥*
*श्री सज्जनगड क्षेत्र,*
*आषाढ शु।। १२ शके १८८३*

*ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरो:पदम् ।। मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा ।।*
*(श्रीगुरुगीता श्लोक ७४)*

*चि. कुळकर्णी आदि समस्त भक्तमंडळीस आशीर्वाद.*

*सर्वहि धन्य व्हा!* कुळकर्णी, तुमच्या ठिकाणी असलेल्या भक्तीमुळे पादुकाप्रसादाची तुमची सविनय प्रार्थना श्रीसद्गुरू अनुग्रहाने परिपूर्ण झाली. तुम्हाला पूजेचे वैदिक मंत्र, रूद्र, पुरुषसुक्त इत्यादि स्वत:लाच येत असल्यास तुम्हीच पूजा करा. नाहीतर माझ्यावर श्रद्धा-भक्ती असणाऱ्या निष्ठ व पढिक वैदिका कडून करविल्यासहि उत्तमच, नैवेद्य वैश्वदेवादिक्रम चालला तर आनंदच. निरतिशय जोमाने, उत्साहाने व आनंदाने तुम्ही सर्व कार्यास लागा.

*’गुरुभक्ति सदा कुर्यात् श्रेयसे भूयसे नरः ।’*
निःश्रेयस आणि अभ्युदय ह्या दोन्ही जीवनभूत अशा सर्वश्रेष्ठ साधनांच्या सहज प्राप्त्यर्थ मनुष्यमात्रास सदैव श्रीशंकरानीच आदेश देऊन ठेवला आहे. ब्रह्मोपनिषदाच्या ३० व्या श्लोकांतहि हीच ओळ आली आहे.

*’सर्वश्रुतिशिरोरत्न नीराजित पदाम्बुजम् । वेदान्तार्थ प्रवक्तारं तस्मात्सम्पूजयेद्गुरूम् ।।*
अखिल श्रुति शिरोरत्नांनी म्हणजे *’प्रज्ञानं ब्रह्म’* इत्यादि चार महावाक्यांनी ज्यांच्या चरणकमलाची आरती केली जाते, जो अतिगूढ वेदांतार्थाचा उपदेश असतो त्या सद्गुरुची अनन्य पूजा करावी असा ह्या श्लोकाचा भावार्थ आहे.

गुरूतत्त्व व ब्रह्मतत्त्व एकच. ‘गौरवाद्गुरू:’ आणि ‘बृहत्वाद् ब्रह्म दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. ह्याकरितांच –
*’गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवेनमः ।।’*
म्हणून श्रीगुरुला वंदन केले आहे.

*’यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ । तस्मैते कथिता ह्याः प्रकाशन्ते महात्मनः ।।’*
ज्याला परमेश्वराच्या ठिकाणी उत्तम भक्ति आहे, ज्याला परमेश्वरा प्रमाणेच श्रीसद्गुरुंच्या ठिकाणीहि सर्वोत्कृष्ट भक्ति आहे त्यालाच सांगितलेले उपनिषदांचे अर्थ आत्मसाक्षात्कारार्थ कारणीभूत होतात. ह्या अशा महात्म्या खेरीज इतरांच्या हृदयांत तो अर्थ आत्मसाक्षात्काराकरितां जसा प्रकाशित व्हावयाला पाहिजे तसा होत नाही, असाध्वन्यर्थ यांतून निघतो. श्वेताश्वेतरोपनिषदाचा शेवट ह्याच मंत्राने झाला आहे.

*’ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन । कथा निरूपण श्रवण मनन । नीतिन्याये मर्यादा ।।*

*यामधे येक उणे असे । तेणें तें विलक्षण दिसे । म्हणोनि सर्वहि विलसे। सद्गुरुपाशी ।।*

*तो बहुतांचे पालनकर्ता । त्यास बहुतांची चिंता । नाना साधनें समर्था । सद्गुरुपाशी ।’*

*’आपणासारिखे करिती तत्काळ . नाही काळवेळ तयालागी ।* हया न्यायाने वरील तीन ओवीतून सांगितलेली लक्षणे शिष्यांचीहि पण ठरतात.

*’आधी करावे ते कर्म । कर्ममार्गे उपासना।*
*उपासका सांपडे ज्ञान । ज्ञाने मोक्षचि पावणें ।’*
हा समर्थांचा दण्डक आहे. सर्व प्रकारच्या उन्नतिकारक आदर्श जीवनाने तुम्ही सर्व ज्ञानविज्ञानसंपन्न होऊन श्रीसमर्थसंप्रदावाचे भूषण व्हा. श्रीसमर्थोपदिष्ट मार्गाने जाऊन स्वपर उद्धारक ठरा आणि श्रीराम व श्रीसमर्थांना तुमच्या आचार-विचाराने संपूर्ण संतुष्ट करा. तुमची यशोदुंदुभी सर्व जगभर निनादो ! तुमच्या मंगलमय जीवनाने अखिल विश्व प्रपंच आणि परमार्थ दृष्टीनेहि नितांत सुखी होवो !!

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’* *नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्यासम्प्रदायकर्तृभ्यो वंशऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्य*

*- श्रीधरस्वामी*

home-last-sec-img