Letters

पत्र.क्र. ५०

*© श्रीधर संदेश*

*सज्जनगड*
*अधिक ज्येष्ठ शु ll १५ सोमवार*
*शके १८८४*

*ll श्रीराम समर्थ ll*

*चि. पृथ्वीराज यांस आशीर्वाद*

तुझे पत्र परवा माझ्या हाती आले. समग्र वाचून बघितले बाळ ! आनंद मात्र सर्वाद्य परमात्मस्वरूपांत दुःख, शोक, भय, चिंता आणि उद्विग्नता यासारखे जे काही आभास उगीच चित्तांत उमटून भासतात आणि सुखरूप असणाऱ्या स्थितीचा लगेच विसर पाडतात त्या आभासांना मायाकार्य म्हणतात.

*’नभी धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसे दावी ओडंबर । माया देवी ।।दा. ७.४.४० ।।*

उचलती म्हणजे उसळती असा अर्थ इथे घ्यावा. *शब्दसृष्टीची रचना। होत जाते क्षणक्षणा। परंतु ते स्थिरावेना। वायूच ऐसी ।।२५।।* मोठी गंमत आहे. हा एक Cinema आहे. मायेची ही सर्व चलच्चित्रपटकला आहे. एका पांढऱ्या शुभ्र कापडी पडद्यावर एकापाठीमागून एक अशी जशी चलच्चित्रे दिसतात त्याच प्रमाणे अंतःकरणरूपी शुभ्र निर्विकल्प जाणीवरूप पडद्यावर विविध काल्पनिक दृश्यें एकापाठीमागून एक आपोआप उमटून लीन होत असतात. विशाल समुद्रात अनेक तरंगाच्या थैमानाप्रमाणे विशाल अंतःकरणांत अनेक कल्पनांचा थैमान चाललेला असतो. श्रीसमर्थांनी सातव्या दशकांतल्या पांचव्या समासात कल्पनेच्या या थैमानाचे फार उत्तम वर्णन केले आहे. (कल्पना) *क्षणा एका धोका वाहे । क्षणा एका स्थिर राहे । क्षणा एका पाहे। विस्मित होऊनि ।।२२।। क्षणा एकातें उमजे । क्षणा एकातें निर्बुजे । नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ।।२३।। कल्पना माया निवारी। कल्पना पाहा यावरी । संशय धरी आणि वारी । ते हि कल्पना ।। १८॥ कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान । ब्रह्मीं लावी अनुसंधान । ते हि कल्पना ।।१९।। कल्पना द्वैताची माता। कल्पना ज्ञप्ति (ज्ञान) तत्वता। बद्धता आणि मुक्तता । कल्पना गुणे ।।२०।। कल्पना अंतरी सबळ । नसते दावी ब्रह्मगोळा। क्षण एकातें निर्मळ । स्वरूप कल्पी ।।२१।।* असे हे मूळ चंचल कल्पनेचे चंचळ कार्य काहींना काही चाललेच असते ही *कल्पना जनाचे मूळ । कल्पना भक्ताचें फळ । कल्पना तेंचि केवळ । मोक्षदाती ॥२४।। असो ऐसी हे कल्पना। साधनें दे समाधाना। येरवी ते पतना। मूळचि की ।।२५।। म्हणोन सर्वांचे मूळ । तें हे कल्पनाचि केवळ । इचें केलिया निर्मूळ । ब्रम्हप्राप्ति ।।२६।।* हे वाचून हसू येतें नाहीं बरें? म्हणूनच ही एक मोठी गंमत आहे म्हणून मी मागे लिहिले, मोक्षाचे साधन श्रीसमर्थ सांगतात, *’श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान । मिथ्या कल्पनेचे भान । उडोनि जाय । २७।। शुद्ध ब्रह्माचा निश्चयो । करी कल्पनेचा जयो । निश्चिताचे संशयो । तुटोनि गेला ।।२८।।* सर्व कल्पनांना पहाणारे केवळ ज्ञानरूप आपण एक मृगजळांतल्या सूर्यप्रकाशाप्रमाणे सत्यरूप आहोत. *मिथ्या कल्पनेचे कोडें । कैसे राहे साचा पुढे । जैसे सूर्याचेनि उजेडे । नासें तम ।।२९।। तैसें ज्ञानाचेनि प्रकाशे। मिथ्या कल्पना हे नासे । मग हे तुटे अपैसे । द्वैतानुसंधान ॥३०॥ कल्पनेने कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे। कां शरें शर आतुडे । आकाशमार्गी ।।३१।। शुद्ध कल्पनेचे बळ । झालिया नासे सबळ । हें चि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥३२।।*

यापुढे श्रीसमर्थ शुद्धाशुद्ध कल्पनांच्या खाणाखुणा सांगतात, *शुद्ध कल्पनेची खूण । स्वये कल्पिजें निर्गुण । स्वस्वरुपी विस्मरण। पडोचि नेदी ।।३२।। सदा स्वरूपानुसंधान। करी द्वैताचें निर्शन । अद्वय निश्चयाचे ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥३४॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अशुद्ध तेचि प्रसिद्ध । (सर्वाच्या अनुभवांत आहे. इचाच संस्कार अधिक त्यामुळे ही) सबळ जाणावी ।। ३५।। शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्चितार्थ । आणि सबळ व्यर्थ । द्वैत कल्पी ॥३६॥ सबळ म्हणजे अशुद्ध कल्पना, ‘अद्वैत कल्पना प्रकाशे । तेचिक्षणी द्वैत नासे। द्वैतासरसी निरसे। सबळ कल्पना ॥३७॥ कल्पनेने कल्पना सरे । ऐसी जाणावी चतुरें। सबळ गेलिया नंतरें। शुद्ध उरली ॥३८।। शुद्ध कल्पनेचे रूप । तेंचि जें कल्पीं (आनंदघन) स्वरूप । स्वरुप कल्पिता तद्रूप । होये आपण ।।३९।।* कल्पना समरसणे म्हणजे ती समुद्रांत गार विराल्याप्रमाणे आनंदरूपात विरून आनंदरूपच होणे, चांचल्य नष्ट होऊन कल्पना निश्चल आनंदरूप झाली म्हणजे आनाद्यनंत एक आनंदच उरला. त्यांत कल्पना उठलीच नाहीं असें होऊन काल्पनिक विश्वाची उभारणी नाहीशी होते त्रिकाली एकरूप असणा-या सर्वकारण ब्रह्मरूप आनंदांत दुसरे काही झालेच नाही हा सिद्धांत प्रत्ययास येत असल्यामुळे *’कल्पनेसी मिथ्यत्व आलें। सहजचि तद्रूप झालें । आत्मनिश्चय नासिलें । कल्पनेसी ॥४०॥* कल्पना मग ती कोणतीहि असो तिची उत्पत्ति आणि तिचा नाश आनंदरूपीं आपण पाहत आहो. ही धारणा अखंड ठेऊन *आपुलेन अनुभवें । कल्पनेसी मोडावें । मग सुकाळी पडावें। (निर्विकल्प आनंदघन स्वरूपाच्या)अनुभवाने ।। ७-४-४८॥ निर्विकल्पासी कल्पावें । कल्पना मोडी स्वभावें । मग नसोनी असावें । कल्पकोटी ॥४९॥ कल्पनेचे एका बरें । मोहरिताच मोहरे । स्वरूपी घालिताच भरें। निर्विकल्पी ॥५४।। वस्तूसि (स्वरुपासी) जरी कल्पावें। तरी ते निर्विकल्प (आनंदरूप) स्वभावें ।तेथे कल्पनेच्या नावें । शून्याकार ॥७-७-१॥ सवें लावितां सवें पडे । सवें पडतां वस्तू आतुडे । नित्यानित्य विचारे घडे । समाधान ॥५।।*

अरे, नावाडी सुदृढ नौका चालवून नेत असतां खालील पाणी बघून घाबरूं नये. निवांत ऐस. तूं भाग्यवान आहेस. कुठे काही घाबरावयाचे कारण नाही.

*श्रीधर स्वामी*

home-last-sec-img