Letters

पत्र.क्र. ५

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीरामसमर्थ ॥*
*आषाढ शु॥ ११ शके १८९०*
*दि ६/७/१९६८*
*वरदाश्रम. दुपारी २ वाजता*

चि. बापू यास आशीर्वाद.

बाळ । तूं परदेशाला निघणार आहेस असें तुझ्या वडिलांच्या व तुझ्या पत्रावरून समजले. चिंता करण्याचे काही कारण नाही. पूर्ण यशस्वी होऊन येशील. आपल्या आचार, विचार आणि उच्चाराने आर्यसंस्कृतीचे महत्व पाश्चात्यांना अापोआप पटेल असे वागणे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आहे.

*’शीलं परं भूषणम् ।’* शीलच जीवनाचे भूषण माहे. वैदिकधर्म नीति शिकवतो. उत्कृष्ट जीवन चालवून परोपकारी व्हावे आणि ज्ञान वैराग्यसम्पन्न होऊन मोक्ष मिळवावा असे वैदिक धर्माचे सांगणे आहे. निरातिशय आनन्दरूप परमात्मस्वरूपांत, बिंदु जसा सिंधुमध्ये एकरूप होतो तसें ऐक्य पावणे म्हणजेच मोक्ष.

बाळ ! वाडवडिलांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेनें व सद्गुरुच्या अनुग्रहाने आदर्श जीवनाची तूं थोर व्यक्ति होऊन सर्व दृष्टीने हि कृतार्थ व्हावेस अशी मी भगवत्चरणी प्रार्थना करितो.

बाळानों ! तुम्हा सर्वांना माझे हार्दिक आशीर्वाद आहेत. तुम्ही सर्वजण सुखी असा. बाकी सर्व क्षेम.

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img