Letters

पत्र.क्र. ६

© श्रीधर संदेश*

*कार्तिक १८८९*
*॥ श्रीरामसमर्थ ॥*

*चि. नारायण करमरकर यास आशीर्वाद*

तुझें हार्दिक तळमळीचे व तसेंच कळकळीचे पत्र पाहून गहिवरून आलें. सबंध पत्रांतून गुरुभक्ति उचंबळत होती. आत्मसाक्षात्काराची उत्कंठाहि तशीच उसळत होती.

*”सद्गुरुपदी अनन्यता । तरी तुज कायशी रे चिंता । वेगळेपणेची माता । ती लटकी बंधेची सुता । म्हणोनिया अभिन्नता । मुळींच आहे ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निदिध्यासें साक्षात्कार । नेमस्त आहे ।। सोऽहं आत्मा स्वानंदघन | अजन्मा तो तूचि जाण । हेचि साधूचे वचन । सुदृढ धरावें ।। महावाक्याचे अंतर । तूंचि ब्रह्म निरंतर । ऐसिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥”*

हे बघ, दयाळू परमेश्वराने जीवाला वैराग्य प्राप्त व्हावे आणि अवीट सुखाचा शोध लागावा म्हणून वीट आणणाऱ्या पदार्थांचा, देहांचा, अवस्थांचा, त्यांच्या अनुभवाच्या अभिमानांचा परिचय या जीवनात सर्वांना करून दिला आहे. थोडासा विचार केल्यास सुषुप्तीत जें सुख उरतें तें जागृत अवस्थेच्या, स्वप्न अवस्थेच्या आणि सुषुप्तीतल्या त्या अज्ञानाच्या त्यागाने त्याच्याशी एकरूप होऊनच लाभते व तेंच सुख अवीट असल्यामुळे त्याच्या प्राप्ती करता या सर्वांचा त्याग प्रत्यही घडत असतो हे स्पष्ट होते.

*” मिथ्या जाणोनि त्यागावें । ब्रह्म होऊनि अनुभवावें । समाधान तें पावावें । निःसंगपणे ।।*

समजून घेऊन त्या निष्ठेत राहाण्यास जागृत, स्वप्न, सुषुप्ति, या तीन अवस्थांचा अनुभव एक पुरे, यावरच स्वतंत्रपणे विचार केला तरी प्रत्यहीं येणाऱ्या अनुभवावरून त्यागाचे महत्त्व, जगाचें मिथ्यत्व, एकात्मत्व आणि सर्वांचे आनन्दरूपच स्पष्टपणे कळून येण्यासारखें आहे. जागृत स्वप्नातील देहात्मबुद्धीला, विषयवासनेला, भेदाला आणि विविधतेला कारण एक आनन्दस्वरूपाचे अज्ञानच हे सुषुप्तीतील आनंद झाला व काही समजले नाही, या अनुभवावरून समजून येते. आनन्दाचा अनुभव आला तो तेथें आनंद असल्यामुळेच, काही समजले नाही असा स्वरूपाच्या अज्ञानाचा भाव प्रगट करतो व त्यामुळेच स्वप्न-जागृतीतल्या सृष्टीची व त्यामधून घडणाऱ्या मानसिक तसेंच दैहिक व्यवहाराची उत्पत्ति होते हे समजून येतें. अज्ञानाने नामरूपात्मक सृष्टीची उत्पत्ति होते व आसक्तीने जन्ममरणाचे आभास दिसतात. त्या अज्ञानाच्या नाशानें अद्वितीय आनन्दस्वरूपाशी ऐक्य होऊन दृश्य वासना नाहीशी होते. दृश्याभास ओसरतो व जन्ममरणाचा हिशोब आटोपतो हे स्पष्ट होतें. यालाच ब्रह्मैक्य, स्वरूपानुभव, मोक्ष अथवा जीवनमुक्ति असे म्हणतात. या स्वतः सिद्धतेचा व कृतकृत्यतेचा अनुभव तुम्हां सर्वांना येवो. आनन्द स्वरूपाची पक्कड सदैव अचल राहो हा आशीर्वाद.

*॥ इति शिवम् ॥ – सर्वे जनाः सुखिनो भवन्तु। -*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img