Letters

पत्र.क्र. ८

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ॥*

*बाळा,*

तुझें स्वरूप । आनंदघन अमूप । तेथे नाही कोप-ताप । तें निष्पाप सर्वदा ॥ १ ॥

तूं आणि तुझा पति । आनंदघनचि निश्चिति । लेकुरे बाळ समग्र जगतीं । आनंदचि मति सर्वदा ।।२।।

देहभाव जरी तुज । तूं भानरूपचि सहज । शोधूनि पाहे बाळा गुज । स्वरूपचि सहज असें ॥३॥

आनंदघन ब्रह्म एक । ज्ञानरूप प्रकाशक । स्वरूपबोधे सर्वा हरिख । आत्मा देख प्रियतम ।।४।।

तूं प्रकाशिसी देहासी । तैसेचि सकल इंद्रियासी । प्राणादि चित्त मनासी । जाण निश्चयेसी त्वतप्रकाश ।।५।।

जैसा जाण उसी रस । पुष्पामाजी जैसा सुवास । फळी जेवीं गोडी सुरस । तुझा वास देहीं तैसा।।६॥

जगी कांहीं शुद्ध असे । तरी तें आत्मरूपचि दिसें । प्रेम अवीटे तेथेंचि बसें । देहीं भासें परी मिथ्या ।७।।

देहाचा वीट कोणा न ये ? । आत्मानुभवें आनंद होये । आनंदआत्मा श्रुति गाये । सद्गुरु सोय सकळिकां ॥८॥

सद्गुरु दावी निजवैभव । अनंत आत्मसुखाची ठेव । देहामाजी स्वयमेव। प्रकाशे देव आत्मरुपें ॥९॥

देहाभिमानेंचि कामादिक । विसरविति आत्मसुख । देहाभिमाने दुःख शोक । सर्वासी देख सर्वदा ॥१०॥

जीव जै आत्मसुखें सुरवाडें । मग तयासी कैचे कोडें । तो सुखचि एक उघडे । देहबुद्धि उडे तात्काळ ॥११॥

तो आत्मसुखेंचि आनंदे । राहे आत्मसुखाचेंनि छंदें । त्या आत्मसुखाची वृष्टि दे । कदापि न खेदे विश्वांत ॥१२||

जन्मा आलियाचे सार्थक । आत्मज्ञानेंचि होयें एक ।
आत्म्यावीण सकळ दुःख । स्वरूपचि सुख सदैव ।।१३।।

*सज्जनगड*
*शके १८८२*

home-last-sec-img