मी या निजीं दुजेपण । तेंचि जाणावें तूंपण ।
तूपण मायालक्षण । भेद दावी ॥ १ ॥
या मायेसी निवारितां । परब्रह्मीं मेळवितां ।
नसे सद्गुरुवीण त्राता । जीवालागीं ॥ २ ॥
या गुरुकृपेचेनि सुकाळें । आत्मप्रभेचेनि सुढाळे ।
सकळ मायाचि नाढळे । मी या भानीं ॥ ३ ॥
जयाच्या आनंदसागरीची झुळुक । नाशी सकळ संसारदुःख ।
शांतवी मनाचा अखिल शोक । तो हा सद्गुरु ॥ ४ ॥
मागील अध्यायीं श्रुतिप्रमाण । अहं ब्रह्म वाक्याचें विवरण ।
बृहदारण्यकाची खूण । संकेतें दाविली ॥ ५ ॥
झालें श्रुतीचे प्रमाण । आतां युक्तीचें साधन ।
बाणावया समाधान । पाहूं कांहीं ॥ ६ ॥
मीं हें नांव आत्मयाचें । स्वरूपबोधक सकळांचें ।
तेणें कोण विचारतां साचें। ‘मी’ म्हणती ॥ ७ ॥
तूं म्हणोनि जया म्हणणें । तोहि स्वतःसी ‘मी’ म्हणें ।
‘मी’ चें ‘तूं’ पणें हो असणें । कळो आलें ॥ ८ ॥
तिन्ही लिंगी ‘मीं’ हें एक । ‘तूं’ हि तैसाचि निष्टंक ।
पूस्त्रियादि भेदाचा लेख । दोन्हीं नसे ॥ ९ ॥
देहीं प्रत्यक्ष भेद दिसे । ‘मी’ हें सर्वी एकचि वसें ।
सर्वी जे मी हें असें । ते भेदरहित ॥ १० ॥
भेद देहाकारें भासे । तेणें देहाहुनि अनारिसें ।
“मी” हे जयाचें भान ऐसें । तो देहरहित ॥ ११ ॥
तिन्ही लिगांविरहित । जेवीं मी हें अखंडित ।
तिन्ही लिगांविरहित । ‘तूं’ ही तेवी ॥ १२ ॥
भेदरहित जैसें मी हैं। तैसेंचि तूंपण पाहे ।
भेदरहित वस्तु आहे । मी तें तेंचि तूं ॥ १३ ॥
दुजेपणाचें जें तूंपण । मांवळूनि उरें आपण ।
भेदरहित एकपण । परब्रह्मीचें ॥ १४ ॥
तिन्ही लिगांमाजी आलें। सर्व जग हें जें जन्मलें ।
नाना रूपात्मक नटलें । कार्यजात ॥ १५ ॥
नच पूंस्त्री लिंगधारी । न नपुंसक जें चराचरीं ।
मी तूं नित्य निर्विकारी । जन्मरहित ॥ १६ ॥
लिंगत्रयात्मक जें झालें । तयासीच कार्य बोलिलें ।
अलिंग स्वरूप कारण भलें । कार्य नोहे ॥ १७ ॥
जया उत्पत्ति तया नाश । कारण न जन्मे अविनाश ।
जन्म हा रूपविशेष । कारण ते अरूप ॥ १८ ॥
नामरूपेंचि भिन्नता । कार्याच दिसे तत्त्वता ।
या कारण जे कां स्वतां । तें अद्वितीय ॥ १९ ॥
कार्यीच दिसे अनेक । कार्यीच असे भेंद देख ।
कार्यापूर्वील कारण एक । अद्वितीय निजांगें ॥ २० ॥
भेदरहित वस्तु आपण । कैचें तेथें दुजेपण ।
आपणामाजीं दुजेपण । मानीं कवणूं ॥ २१ ॥
नासें तें दुजें सकळ । दुजे जाता आपण केवळ ।
अद्वितीय वस्तु निर्मळ । ज्ञान मात्र ॥ २२ ॥
‘तूं’ तील हें मी पण ऐसें । कार्यरहित होवोनि विलसे ।
कारण मी तूं होवोनि असे अद्वितीय ब्रह्म ॥ २३ ॥
त्रिकालींहि कारण वसें। तरि तें एक रूपेचि असें ।
भिन्न कार्य हें होतसें । केवीं त्यामधीं ॥ २४ ॥
जया एकरसेंचि असणें । त्यांत भिन्न कार्य केव होणें ।
या कार्याचे त्या कारण मानणें । हेंहि अघटित ॥ २५ ॥
या सकळ अनर्थाहूनि रहित । वस्तु आपण निवांत ।
त्यांत झाल्या कार्याची मात । कदापि न संगवे ॥ २६ ॥
ऐसे गुरु शिष्या सांगत । वेदांतील अद्वैत ।
जेथें नाहीं कार्यजात । मिथ्या मायिक ॥ २७ ॥
ऐसे गुरुशिष्य एक होती। कारणरूपें कार्य न देखती।
सांडूनिया देहांन्ति । ज्ञानमात्र ॥ २८ ॥
इति तृतीयोध्यायः