Literature

अथ पंचमोध्यायः

विषयत्याग तत्त्वचिंतन । सहज स्थितीचें लक्षण ।
श्रीगुरुकृपेवीण | दर्पणीची संपत्ति ।।१।।

धन्य धन्य ते सकळ जन । जया लाधले श्रीगुरुचरण ।
जन्मसार्थकतेचा प्रश्न । तिहीं सोडविला ।।२।।

जयावरि गुरूकृपा होत । तो ब्रह्म मूर्तिमंत ।
तयाच्या नामें माया जात । मावळूनी ।।३।।

तो चिदेकरसें ओतला । चिद्रुपचि आणि मनाला ।
सकळ नारीनराला । आत्मरूप देखें ।।४।।

सृष्ट्योन्मुखीं अगत्य भेद । पूं स्त्री वासना संबंध ।
विषयभोगाचा नाना छंद । घात घेणा ।।७।।

ज्ञानिया नोहे ही भ्रांति । तयाची सदाची आत्मशांति ।
सर्वी निरिक्षी आत्मस्थिति चिदानंदरूप ।।६।।

ज्ञानी तो न देखे रूप नांव । सकळ उपाधीचा भाव ।
मायेचे सकळ लाघव । यापुढे फिके ।।७।।

एचदानंदमहोदधि । सर्व नासोनि उपाधि ।
ज्ञानी निजींच निरूपाधि निर्विकल्प ।।८।।

देहसौख्यें तो पामर । भक्तिसौख्य भक्त थोर ।
चित्तशून्ये योगीश्वर । ज्ञानी ज्ञानमात्र ।।९।।

देहाचा पांग फिटेना । तेणे पूं स्त्री ही भावना ।
भवसौख्याचे सोहळे नाना । नरकमूळ ।।१०।।

कोण स्त्री कोण पुरुष । विचारें कोणा होये हर्ष ।
अधोगतीचा कळस । विशेष जन्म घेणें ।।११।।

काय नटणें मुरडणें । काय अलंकार घालणें ।
काय या देहगौरवें मानणें । आपण धन्य ।।१२।।

नव ठिकाणी फाटलें । शिरा नाडी गंडाळिलें ।
अती घाणीचेंच ओतलें । तें हें शरीर ।।१३।।

मुखकमल अति सुंदर । तेथें घाणीचें महाद्वार ।
अघरामृताचा जेथोनि पूर । त्याची घाण नेघवें ।।१४।।

अधोभागीं अति कुश्चिळ । त्यागावया मूत्रमळ ।
द्वारे दोन हीं केवळ । दुर्गंधेंचि केलीं ।।१५।।

इंद्रिय मनासी वीट याया । सकळ भरलें देहीं यया ।
ओतीव घाणीच्या देहां या । कवि वाखाणिती ।।१६।।

देहाच्या अज्ञानें पामर । भूलोनि वर्णिती श्रंगार ।
नरकप्रवेशाचेंचि द्वार । वाङ्मय यांचे ।।१७।।

बहु अन्न विकारांचा साठा । दुर्गंधीचा पुतळा मोठा ।
सकल रोगांचा देह कोठा । ओंगळवाणा ।।१८।।

मलाचीच गिलाई जाण । कातडीचे सुंदरपण ।
वसवसीत घामादिकी पूर्ण । ओकारी आणी ।।१९।।

रजोरेताचे मिश्रण । वाटें नवमास गर्मी घाण ।
धातुसप्तकाची गोधडी जाण। ही सुंदर तनु ।।२०।।

रजोधिक्येंचि जै नारी । रेतोधिक्य नर जरी ।
काय देहाची कुसरी । शोभायमान ।।२१।।

सौन्दर्य देखोनि भुलती । देहघाणीस कंटाळेती ।
मलमूत्रा देखोनि । का न मोहिती मूर्खजन ।।२२।।

नवमास विटाळाचा बनला । सकल अलंकारें जरी नटला ।
परिमलद्रव्ये जरि चर्चिला । तरी वीट आणी ।।२३।।

काय तारुण्याची अवदसा । काय विकारांचा वळसा ।
मूर्खपणाचा सारा जलसा । अविवेक्यांचा ।।२४।।

किती स्त्री-पुरूष झाले । नाना कामचेष्टें नटले ।
नाना हावभाव करूनि मेले । मातीत माती ।।२५।।

देहभोगाची वासना । ती वैतरणीची यातना ।
ढकलून देत पाप्यांना । दुःखभोगा ।।२६।।

रौरवींचे किडे अती । त्यांतची सौख्य मानिती ।
तेवीं जीवांची ही स्थिति । केविलवाणी ।।२७।।

सोडूनि स्वरूप आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन ।
तया कैचें समाधान । लोलंगतासी ।।२८।।

जे जेथोनि जन्मत। तीचि त्याची योनी होत ।
त्याकडेचि धांव सतत । तयाची असें ।।२९।।

ब्रम्हस्व योनि नेणतां । मी देह ऐसे मानितां ।
निज देह योनीं रमे तत्त्वता । निज अज्ञानें ।।३०।।

देहाभिमानाची विवसी । झडपलीसे या जिवासी ।
हेंचि आत्मसुखाच्या निधिसी । आडवें विघ्न ।।३१।।

देहासी जैं भी मानणें । तैं मलादिकांही मी म्हणणें ।
मलमूत्रत्यागेंचि लाघणें । सुख जेवीं ।।३२।।

तेवींच देहाभिमान त्यागें । सुख समाधान पाठी लागें ।
पावित्र्यहि लागवेगें । शोधीत ये ।।३३।।

काय संसारी असें हित । जीवा मायिक आवेश होत ।
पश्चात्तापें अंतीं झुरत । भ्रमलों म्हणोनि ।।३४।।

सारा मायिक बाजार भरला । फसवेगिरीचा धंदा मांडिला ।
येथें मन घालिता फसला । मुकला स्वहितां ।।३५।।

तथापि प्रारब्धवेगें । जया संसारीं वागणें लागें ।
मेंन्द सोयरीक सांगे ओळखी घरावी ।।३६।।

त्यांतचि गृहधर्मापरी । निषिद्धकर्मे त्यागोनि सारीं ।
काम्य वर्जून करावीं बरीं । निष्काम कर्मे ।।३७।।

स्नानसंध्या शुद्धाचरण । एकपत्नीव्रत जाण ।
स्त्रियासी पातिव्रत्यप्रमाण अनसूयेसम ।।३८।।

निजयातीधर्मापरी । वर्तणूक असावी खरी ।
व्यवहारीं परमार्थी सारी । मधु मंजुळ किया ।।३९।।

परम मूर्खामाजीं मूर्ख । जो संसारी मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणिक नाहीं ।।४०।।

असो जया स्वहित करणें । तया किती म्हणोनि सांगणें ।
हें ज्याचे त्याने विवरणें । अपुल्या प्रत्ययें ।।४१।।

शाहण्यानें स्वहित करावें । लटका आभास ओळखावें ।
गुरूमुखें स्वरूप न्याहाळावें । ज्ञानमात्र ।।४२।।

सकळ अनर्था निदान । तो हा जाणें देहाभिमान ।
येणेंचि विषयानुसंधान । जीवालागीं ।।४३।।

अन्य देहाचें कौतुक । भिन्नपणें ज्ञानाचा हरिख ।
अथवा पदार्थाचें सुख । निज अज्ञानें ।।४४।।

देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रम्ह पाहे ।
देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ।।४७।।

साऱ्या कार्यमात्राचा गलबला । सांडूनिया निवांत झाला ।
तोचि एक जगतीं भला । ब्रम्हरूप ।।४६।।

महावाक्याचें अंतर । तूंचि ब्रम्ह निरंतर ।
या वचनाचा विसर । पडोचि नये ।।४७।।

धर्मामाजि मुख्य धर्म । स्वरूपी राहणे हा स्वधर्म ।
ऐसें सांगितले वर्म । सद्गुरूराये ।।४८।।

उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञाने पाविजे निरंजन ।
ज्ञानियांचे समाधान । येणे रिती ।।४९।।

प्रगट रामाचे निशाण । आत्माराम ज्ञानघन ।
विश्वंभर विद्यमान । भाग्ये कळे ।।५०।।

इति पंचमोध्यायः

home-last-sec-img