Literature

अथ षष्ठोऽध्यायः

फारा दिवसांचा भवरोग । व्यापिलासे अंगप्रत्यंग ।
भवरोगवैद्या सवेग । शरण जावें ।। १ ।।

निज शरण-जन चिंता । बहु लागे श्रीगुरुनाथा ।
धावोनि अभयकरें स्पर्शितां । रोगचि वाव ॥ २ ॥

मुमुक्षुवदनपूर्णचंद्रा । पाहोनी भरतें बोधसमुद्रा ।
पीयूषवचनें शिष्यमुद्रा । आनंदें भरीं ॥ ३ ॥

मुखीचा काळीमा घालवी । चित्सौख्याची कळी उमलवी ।
सकळ पाश सारूनि मेळवी । शिष्या परब्रह्मीं ॥ ४ ॥

ऐसा सद्गुरु पूर्णपणें । नाशी शिष्यांचे सकळ उणें ।
कोण उपमा यया कारणें । द्याया जर्गो ॥ ५ ॥

जे कां भिन्नपणें लाभत । त्यानें तृप्ती कधीं न होत ।
तयाच्या भोगेंचि वाढत । अतृप्ति लोलंगता ॥ ६ ॥

गाळीव सुखाचें निजसार । तै एक परब्रह्म निर्धार ।
तेंचि होतां भवपार । प्राणी पावे ॥ ७ ॥

वेगळेपणें लाभत । तेंचि विषयसुख होत ।
बहु अनर्थ जीवा यांत । पदोपदीं ॥ ८ ॥

आपणाहूनि जे वेगळे । त्याचे अस्तित्व केवी कळे ।
कळे ज्या तया सोहळे । स्वानंदाचेचि ॥ ९ ॥

जे का कळोनि येई । ते तो सहज जड होई ।
जड कोणा न सुख देई । अचेतनत्वें ।। १० ।।

स्वभिन्न या जडविषय । सुख झालें म्हणतां न मे ।
भिन्न पदार्थ सुख होये । म्हणें ते अज्ञान ॥ ११ ॥

तें जाणितांचि तें सुख । अनुभवी निजाचेचि देख ।
तेथे भिन्नपणाचा लेख । निज अज्ञानें ॥ १२ ॥

निज सुखाचा आरोप । भिन्नीं जे न तें सुखरूप ।
वेगळे जें तें दुःखरूप । येणें रोतीं ॥ १३ ॥

जें जड तें हे वेगळे । जाणत्या निजज्ञानरूप कळे ।
ते स्वज्ञानचि त्या आकळे । सुखहि तेवीं ॥ १४ ॥

जड तें भिन्नपण असे । त्यासी जाणीवच नसे ।
जाणीवरूप आपण बसें । भिन्न न निजीं ॥ १५ ॥

वेगळेपण जे मानी असे । वंध्यापुत्रापरी तें भासें ।
आपणचि एक सत्य वसें । जड न कांहीं ॥ १६ ॥

वंध्याकुमारांचे सुख । मिथ्याचि तयाचा लेख ।
निजसुखचि होय हरिख । सत्य पुरुषा ॥ १७ ॥

वेगळेचि ब्रह्म उरतां । तें तो अभावरूप जड तत्त्वतां ।
जाणोन ब्रह्म तूं हें बोधितां । सच्छिष्या मानें ॥ १८ ॥

सकळांचें जें मूळ । ब्रह्म सच्चिदानंद निर्मळ ।
तेंचि आपण केवळ । पाहों जातां ॥ १९ ॥

अन्वये निजस्थिति साधली । व्यतिरिकेंहि सिद्ध झाली ।
कैसेंहि पाहतां आपुली । ब्रह्मरूपता ॥ २० ॥

जे डोळियासी दिसे । त्याचा पाहतां आपणचि असे ।
डोळयासीहि पाहतां वसें । आपणचि ॥ २१ ॥

देह इंद्रियासी पाहतां । मनातें भासें त्या निरिक्षितां ।
मनबुद्धिसहि परीक्षिता । आपणची ॥ २२ ॥

जागृतीचें दृश्य देखें। स्वप्नीचें तें ओळखे ।
सुप्त जें अज्ञान काळोखें । प्रकाश तेंहि ॥ २३ ॥

तिन्ही अवस्थेंहूनि पर । सर्वा प्रकाशिता साचार ।
स्वप्नचि आपण सार । तेणें गुणें ॥ २४ ॥

साधनेंविण जाणतां । सुप्तिज्ञानचि तें तत्त्वतां ।
ज्ञानरूप आपण स्वतां । यया परीं ॥ २५ ॥

जें जें पाहोनि सांडिलें । अवघेंचि तें निवारिलें ।
सकळ जातां जें उरलें । तेंचि आपण ॥ २६ ॥

सर्व निवारितां जें उरें । तेथें द्वैत कैचें ठरे ।
अद्वितीय आपण विचारें । ज्ञान मात्र ॥ २७ ॥

अहं हेंचि ब्रह्म जरी । कार्यरहित अविकारीं ।
पिंड ब्रह्मांडाचें देह चारीं । शशशृंग ॥ २८ ॥

उभारणी आणि संहारणी । हे तो वंध्यापुत्राची कहाणी ।
झालीच नसतां उगी कोणीं। मानावी ती ॥ २९ ॥

मन-बुद्धीहूनि पर । वाचेसिहि अगोचर ।
जेथें पांगुळे तर्क विचार । तें ब्रह्म आपण ॥ ३० ॥

मी हें ईश्वरीहि दिसें । मी हें जीवमात्र असे ।
श्रीगुरुठायीहि विलसें । सर्वं अद्वय ॥ ३१ ॥

मी हें स्वरूपाचें भान । त्याची ऐसीं आंगवण ।
सर्वी व्यापून आपण । अद्वितीय निज ठायां ॥ ३२ ॥

अखिल जीवेश विश्वम् । वितळूनि पूर्ण निःस्सीम ।
उरें शेष कैवल्यधाम । निजरूपेंची ॥ ३३ ॥

पिंड ब्रह्मांड उपाधि | माया अविद्येची व्याधि ।
जीवेश भावनेचीहि आधि। नासोनि गेली ॥ ३४ ॥

सर्वा उर्वरित मी उजळत । निज, निरतिशयप्रभे तळपत ।
अवघी भिन्नत्वाची मात । तोंड न दावी ॥ ३५ ॥

गुरुकृपेचें हे वैभव । येथे नसेचि भिन्नभाव ।
अद्वितीय आपण स्वयमेव । चिदानंदब्रह्म ॥ ३६ ॥

मीपण समरसोनि गेलें । निवांत निर्विकल्प उरलें ।
नव्हतें तें सारेंचि गेलें । खपुष्पापरीं ॥ ३७ ॥

तुझीया पत्रमिसें हे लिहिलें । परि ते सकळासि लाधलें ।
भगीरथाच्या प्रयत्न झालें । जग पावन ॥ ३८ ॥

सद्गुरुवचन निजसार। घेवोनि केला विस्तार ।
याचा करोनि विचार । कृतार्थ होई ॥ ३९ ॥

इति षष्ठोध्यायः

home-last-sec-img