Literature

अध्यात्मशक्ती

आधिभौतिक सामर्थ्य श्रेष्ठ कि अध्यात्मिक सामर्थ्य श्रेष्ठ याचे विवेचन करावयाचे आहे. ऍटम बॉम्बमुळे आधिभौतिक शक्तीचे ज्ञान सर्व जगतास झाले आहे. अणुबाँबच्या शक्तीला निष्प्रभ करणारी तेजस्वी अशी दुसरी एखादी शक्ती आहे काय? याचा विचार करण्यासाठी आजचा विषय आहे.

अध्यात्मिक म्हणजे आत्म्यासंबंधी व आधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतांचा विचार होय. दृश्य पदार्थांचे सामर्थ्य श्रेष्ठ की आत्मसामर्थ्य श्रेष्ठ याचा आपण विचार करू या. यामुळे परमेश्वरी सामर्थ्य व पदार्थांचे सामर्थ्य यांत कोणतें सामर्थ्य श्रेष्ठ आहे याचा उलगडा होईल.

परमात्मप्रणित अशा या जगांत असणारे सर्व पदार्थ भौतिक पदार्थ होत. “एष त आत्मा सर्वान्तरः ।” तुझा आत्मा सर्वांतरयामी परमात्मा होय; असें श्रुतींनी सांगितले आहे. आत्मा व परमात्मा हे दोन्ही शब्द एकाच अर्थी आहेत. आत्मा म्हणजेच परमात्मा. त्याच्या सामर्थ्यांमुळे उत्पन्न झालेले सर्व पदार्थ व त्या पदार्थाच्या विशिष्ठ संमिश्रणाने उत्पन्न झालेले विशिष्ठ सामर्थ्य यापेक्षा परमार्थाचे सामर्थ्य निश्चितपणे श्रेष्ठ आहे. “एतावानस्य महिमा अतो ज्यायांश्च पूरुषः ।’ जगांत दिसत असलेला महिमा ज्याने निर्माण केला आहे त्याचा महिमा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे; असें श्रुति म्हणतात.

केनोपनिषदात यक्षरूप धारण केलेल्या परमात्म्याने अग्नि व वायु आदींची शक्ती काढून घेतल्यावर अग्नि व वायु आदित आपल्या पुढे ठेवलेल्या गवत इत्यादि जाळण्याचे किंवा उडवण्याचे सामर्थ्य राहिले नाही अशी कथा आहे. परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या वसिष्ठ, दधिचि इत्यादि मुनिश्रेष्ठांनी आपले स्वतःचे अध्यात्मिक सामर्थ्य भौतिक सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे आपल्या स्वत:च्या चरित्रावरून सिद्ध केले आहे. विश्वामित्रासारख्या दिग्विजयी राजाला स्वत:च्या सर्व प्रकारच्या शस्त्रबलाचा वापर करूनहि वसिष्ठाने रचलेल्या कुंपणावर थोडासाहि प्रभाव पाडणे अशक्य झाले. दधिची ऋषींनी तर देवादिकांच्या शस्त्रास्त्रांचे पाणी करून तें पिवून टाकिलें; अशीहि एक कथा प्रसिद्ध आहे.

कारण असल्याशिवाय कार्याची जरूरी भासत नाही. कारण कार्य हे कारणावर अवलंबून असते. पदार्थाची आवश्यकता त्याला कारणरूप म्हणजेच त्याचा उपभोग घेणाऱ्यावर अवलंबून आहे. उपभोग घेणारा नसल्यास उपभोग्य वस्तूंचा काहीही उपयोग नाही. सर्व पदार्थ उपभोग्य आहेत व म्हणूनच ते परमेश्वराने निर्माण केलें आहेत. तो परमेश्वर-परमात्मा पदार्थाहून वेगळा असून त्याच्यांत पदार्थनिर्मितीची महान शक्ती आहे. आपण आपल्यास लागणारी उपभोग्य वस्तु आपल्या इच्छेप्रमाणे तयार करून घेतो, त्यावेळी आपल्यामध्ये निर्माणशक्ति असते. प्रथम आपण निर्मितीची साधनें तयार करून घेऊन त्याद्वारे आपल्यास आवश्यक वाटणारी किंवा असणारी वस्तु तयार करून घेतो. कर्ता हा चैतन्यरूप आहे पण कार्य मात्र जडस्वरूप आहे.

आपल्यास घर बांधावयाचे ठरले म्हणजे प्रथम त्याचें मानचित्र (प्लॅन) तयार केले जाते; त्या मानचित्राच्या अनुरोधाने मूर्त स्वरूपात येणारे कार्य म्हणजेच घर या दृष्टीने विचार केल्यास कारणरूप इच्छाशक्ति व क्रियाशक्तीचे बाह्यस्वरूप म्हणजेच दृश्य पदार्थ असा याचा अर्थ होतो.

दृश्य पदार्थाच्या उपभोगाचा विचार केल्यास देहामध्ये ‘मी’ पणाची जाणीव नसल्यास दृश्य पदार्थाचे मुळीच प्रयोजन नाही. आपणाजवळ असलेल्या सर्व प्रकारच्या सुखसोयींचा प्राणोत्क्रमणानंतर काहीच उपयोग नसतो. कारण त्या परिस्थितीत देह कोणताच उपभोग घेऊ शकत नाही. त्याला एकटयाला काहीही करणे शक्य नाही. एखादा मनुष्य निरनिराळ्या प्रकारच्या फळांच्या ढिगाऱ्यात झोपून राहिला तर त्याला त्या फळाचा स्वाद मिळत नाही. जागृतावस्थेत निरनिराळया विषयांत गढून गेलेल्या मनुष्यास आपल्या जवळ असलेल्या पदार्थाची जाणीवहि होत नसते. जेवताना मनुष्य विचारचक्रात असल्यास तो फक्त पोट भरून घेण्याचे कार्य करतो. त्यास स्वाद कळत नाही. “अन्यत्रमना अभूवं नापश्यम् ।” मन दुसरीकडे असल्याने मी पाहूं शकलो नाही असा अनुभव येतो असें श्रुति म्हणतात. मन दुसरीकडे भटकत असेल तर आपल्या जवळच्या वस्तूंचे अस्तित्वहि कळत नसते. कोणत्याहि पदार्थाविषयी इच्छा उत्पन्न होऊन देश, काल, मान व परिस्थितीच्या अनुकूलतेने त्याची आवश्यकता वाटल्यास अनुकूल अशा भावनेने बाह्यपदार्थाचा संग्रह होतो. नंतर त्या पदार्थाच्या निरनिराळया मिश्रणाने आवश्यक भोग्य वस्तु तयार करून तिचा उपभोग घेतला जातो. पण बाह्य पदार्थ कितीहि चांगले असले तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी चैतन्याच्या अस्तित्वाची आवश्यकता आहे. ते चैतन्य देहांत नसेल तर त्या पदार्थाचा काहीच उपोग नाही. डोळ्यासच बाह्य सृष्टीचे सौदर्य दिसत असते. डोळ्यांना दृश्यमान होणारे तेज म्हणजेच देहांतील प्रकाश. अंधास बाह्यरूपाचे दर्शन होत नसल्याने त्याला त्याचे महत्व वाटत नाही. मूर्ख, मूर्च्छित व जड अशांना कोणत्याच वस्तूंचे महत्व कळत नसते. आपल्यास न आवडणाऱ्या पक्वानाचे महत्व आपणास मुळीच वाटत नसते. या दृष्टीने विचार केल्यास बाह्यपदार्थात काहीहि सत्य नाही हेच उघड होते. भोगी मनुष्यास त्या त्या पदार्थाचे महत्व वाटत असते. बाह्य पदार्थाचे सामर्थ्य ज्ञानाने समजून येते. या बाह्यपदार्थांना स्वतःचे सामर्थ्य नाही. या बाह्य पदार्थांची जाणीव होण्यास चैतन्याचीच आवश्यकता आहे.

संकल्प किंवा इच्छा हे मनोधर्म आहेत. इच्छा उत्पन्न झाल्यावर मन जागृत होऊन इंद्रिये कार्यान्वित होतात. इच्छेच्याद्वारे सर्व पदार्थाचे महत्व ठरत असते व इच्छेप्रमाणेच ते वाढत असतें यावरून पदार्थाचे महत्व त्या पदार्थात नसून तें इच्छेवर अवलंबून आहे हे उघड आहे.

जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणाऱ्या क्रूर मनास अँटम बॉम्बचे महत्व वाटेल; पण दयाशील असणाऱ्या साधुस दान, धर्म व परोपकार यांचीच जास्त किंमत वाटत असते. क्षुधेने व्याकूळ झालेल्या भिकाऱ्यास त्यास मिळालेल्या एक घासभर अन्नाचे महत्व अँटम बॉम्ब पेक्षा जास्त आहे. कारण अपेक्षित वस्तु प्राप्त झाल्यामुळे मनाचे समाधान झाल्यानेच अँटम बॉम्ब पेक्षा त्या घासभर अन्नास जास्त महत्व आहे. याने आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एकंदरीत कालमानाप्रमाणे उद्भवलेल्या व्यक्तिगत अपेक्षेच्या योग्यतेप्रमाणे त्या त्या पदार्थाची किंमत ठरते व त्या त्या पदार्थाचे महत्व वाढते.

जगोत्पत्तीस आधिभौतिक सिद्धांत जसा कारण आहे तसाच अध्यात्मिक सिद्धांतहि कारण आहे. “इच्छामात्रं प्रभोः सृष्टिः।” जगोत्पत्तीस सर्वशक्तिमान अशा परमात्म्याची इच्छाच कारणीभूत आहे असा अध्यात्मिक सिद्धांत आहे.
“मनोमात्रमिदं सर्वं ।” जग हे परमात्म्याच्या मनःसंकल्पामुळे उत्पन्न झाले आहे. मनामुळे इच्छेची व इच्छेमुळे पदार्थाची उत्पत्ति होत असते. इच्छा हा मनाचा एक धर्म आहे.

परमात्म्याच्या संकल्पामुळे सृष्टोत्पत्ति झाली आहे. संकल्प हा मनाचा स्वभावच. ही सृष्टि सुरवातीस परमात्मस्वरूप होती. ‘मी’ पणाची जाणीव सुरवातीस उद्भवली. तीतून इच्छा उत्पन्न झाली. इच्छेच्या स्वरूपाचे संकल्पांत रूपांतर होऊन सृष्टोत्पत्ति झाली. प्रथम ‘मी’पणाची जाणीव, तीतून मन, मनातून इच्छा, इच्छेतून संकल्प व संकल्पातून उत्पत्ति या क्रमाने पिंडब्रह्मांडादिनाहि संकल्पच कारणीभूत आहेत. एकंदरीत पाहूं जाता जगोत्पत्तीस इच्छाच कारणीभूत आहे.

पदार्थाच्या उपभोगासाठी इंद्रियांची आवश्यकता आहे. इंद्रियोत्पत्तीस इच्छाच कारण आहे. इंद्रियशक्तीतून मन व प्राण यांचा प्रादुर्भाव होऊन जगोत्पत्ति होते. म्हणजेच इच्छाशक्ति म्हणजे जग. मात्र जगाच्या सामर्थ्यापेक्षा इच्छाशक्तीचे सामर्थ्य श्रेष्ठ आहे. संकल्प व इच्छा यांना सृष्टिकर्ताच कारणीभूत आहे. तो सर्वशक्तिमान आहे.
“तत सृष्ट्वा तदेवानुप्राविशत् ” परमात्म्याने आपल्या इच्छेने सृष्टि निर्माण करून तिच्यांतच त्याने प्रवेश केला. ” अभवत् यदिदं किंच’ सृष्टि निर्मात्या परमात्म्याने आपल्या एकांशाने या सृष्टीचे रूप धारण केले. ‘ स इह प्रविष्ट आनखाग्रेभ्यः’ मानव देहांत परमात्मा नखशिखांत व्यापला आहे. ‘मी ‘ पणाची जाणीव शरीराच्या सर्व भागांमधून आहे तशी ती सृष्टीतहि आहे. ‘मी’ पणाची जाणीव नाहीशी झाल्यास शरीरास व सृष्टीस काय किमत रहाणार? काहींच रहात नाही. ” एकोऽहं बहुस्याम्” मीपणाची जाणीवच सर्व गोष्टीस मूळ कारण आहे. मी पणाच्या जाणीवरूपी परमात्म्याने ही विविधरूपी सृष्टि निर्मिली आहे. “अहमेवेदं सर्व । आत्मैवेदं सर्व । ब्रह्मैवेदं सर्वे । स त्वमेव त्वमेवेतत् । ” हे सर्व मी पणाचे स्वरूप होय. हे सर्व आत्मरूप
ब्रह्मरूप तूंच असल्याने सृष्टि म्हणजे तूं व तूं म्हणजेच सृष्टि होय; असें श्रुतींनी सांगितले आहे.

आपणांस प्रथम जाणीव होते. तदनंतर सविकल्प ज्ञानास प्रारंभ होतो. त्यानंतर मी, माझे काम अशा क्रमाने स्मृतीस सुरवात होते. मी, माझें यापासूनच कार्यारंभ होतो. मी पणाची जाणीवच कार्यास स्फूति देते. कार्य हे जडरूप आहे.

अँटम बॉम्ब म्हणजे एक कार्यच. ते मनाच्या संकल्पाने उत्पन्न होते. जड पदार्थापेक्षा संकल्पामध्ये जास्त सामर्थ्य आहे. अँटम बॉम्बमध्ये मी पणाची जाणीव नाही. तो दुसऱ्याच्या संकल्पाधीन आहे. निरनिराळया पदार्थांच्या संयोगाने अँटम बॉम्ब तयार होतो. पदार्थांचा संयोग न झाल्यास किंवा संयुक्त पदार्थाचे पृथक्करण झाल्यास अँटमबॉम्बमध्ये सामर्थ्यच असू शकत नाही.

परमात्म्याचा संकल्प अमोघ आहे. त्याच्यात सर्वशक्ति केंद्रित झाल्या असल्यामुळे त्यास अनन्य साधारण महत्व आहे. युद्धासाठी अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याचा आश्रय घेतला तर दुर्योधनाने यादव सेना घेतली पण त्याचा काय शेवट झाला? हे आपणांस माहीत आहेच.

हे जग परमात्म्याशिवाय कुचकामी, अचेतन, शक्तिशून्य, प्रभावहीन आहे. परमात्मशक्तीपुढे जगच्छक्तीचा मुळीच पाड लागत नाही.

जगांत परमात्म्यावांचून काहीही नाही. तोच जगाला कारणीभूत आहे. त्यांत पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही सृष्टीची बीजे होत. ती एकापेक्षा एक सरस व शक्तिमान आहेत. पण या सर्वांपेक्षां परमात्म्याची शक्ति अत्यंत प्रबल आहे. परमात्म्याचे ज्याला ज्ञान झाले आहे असा मनुष्य योगी किंवा सिद्ध पुरुष होय. तो “ सोऽह ” म्हणतो. तो परमात्म्यांत विलीन होतो. त्याची शक्ति म्हणजेच परमात्मशक्ति. अशा पूर्णसिद्धांना अणुबॉम्ब काय करू शकणार आहे ?

सर्व सामर्थ्यांचे मूळ कारण, आपल्या देहांत परमात्मा असल्याची जाणीव असणे हे होय. ही जाणीव झाल्यानंतर कोणत्याहि पदार्थाविषयी इच्छाच होत नाही आणि ज्या पदार्थाबद्दल इच्छाच नाही त्या पदार्थास मुळीच किंमत नसते.

योगी इच्छाशक्तीच्या बळाने एखाद्या पदार्थाविषयी मन केंद्रित करून त्या पदार्थाची शक्ती वाढवू शकतो किंवा ती संपूर्ण शक्तीच नाहीशी करतो. त्याचप्रमाणे अणुबॉम्बची शक्ती वाढवू शकेल किंवा नष्टहि करूं शकेल.

चैतन्यांत शक्तिसामर्थ्य आहे किंवा चैतन्य म्हणजेच शक्ति होय. कोणत्याहि पदार्थात शक्ति आहे असे म्हणणे ही एक कल्पना असून कल्पनाच त्या पदार्थांत शक्ति निर्माण करीत असते.

अध्यात्मनिष्ठेनें साधना केल्यास मानव भौतिक साधनेने मिळणाऱ्या सामर्थ्यापेक्षा प्रबलतर सामर्थ्य करू शकेल. अद्यापि यामध्ये थोडा तर-तम भाव आहे. खरे पाहता अध्यात्मिक शक्ति आधिभौतिक शक्तींचा नाश करून तिला निष्क्रिय करू शकते पण आधिभौतिक शक्तीचा कोणताहि परिणाम अध्यात्मिक शक्तींवर होत नाही.

म्हणूनच ” तमेवैकं ज्ञानथ, आत्मानमन्यावाचो विगुञ्चथामृतस्वैप सेतुः । ” सर्व वयं करून आत्मरूप जाणून घ्या ! आत्मस्वरूपाचे ज्ञान हा भवसागर तरण्यासाठी सेतुरूप आहे. यामुळे तुम्हास अविनाशी तत्वाची प्राप्ति होईल.

‘मी ‘ असे जे निजस्मृतिलक्ष्य, तेंच चैतन्यरूपी परमात्मस्वरूप होय. अज्ञान्यास आपल्या स्वरूपाची जाणीव नसल्याने तो सामर्थ्यहीन आहे. तोच आत्मस्वरुपज्ञानी झाल्यावर महा दिव्य शक्ती संपन्न होतो. यांच्या शक्तीपुढे अँटम बॉम्बची शक्ति क:पदार्थ होय.

मानवजन्माच्या सार्थकतेकरितां कोणत्या शक्तीचा विकास झाला पाहिजे असा प्रश्न निर्माण होतो. आधिभौतिक शक्तीच्या विकासाने परस्यापहारादि शक्य आहे. अध्यात्म शक्तीच्या विकासाने स्वतः सुखी होऊन, जन्ममरणाच्या रहाटगाडग्यातून मुक्त होऊन चिरसुखी होता येईल. इतकेच नव्हे तर आपणांस शरण आलेल्यांचाहि उद्धार करता येईल.

आधिभौतिक शक्तिसंपन्नास आपल्यापेक्षा शक्तिशाली असलेल्या मनुष्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. परंतु अध्यात्मिक शक्तिशाली मनुष्यास द्वैताची भावना नसल्याने तेथें तर-तम भावच रहात नाही. मग नतमस्तक होण्याचा संबंधच नाही.

पुष्कळ विचार केल्यावर अध्यात्मिक शक्तीशी बरोबरी करू शकणारी दुसरी कोणतीहि शक्ति नाही हे आढळून येते. “यल्लाभानपरो लाभो यत्सुखानपरं सुखम् । यत् ज्ञानान्नपरं ज्ञेयं तद् ब्रह्मेत्यवधारयेत् ॥” जें प्राप्त झाले असता इतरांच्या प्राप्तीची आवश्यकता भासत नाही, जे सुख प्राप्त झाले असता इतर सर्व सुखें कुचकामी वाटतात, ज्याची जाणीव झाल्यानंतर ज्ञेय ( समजून घेण्याचे ) असे काहीही शिल्लक रहात नाही त्याला ब्रह्म असे म्हणतात. ते ब्रह्म म्हणजेच ‘मी.’

” सर्वव्यापारमुत्सृज्य अहं ब्रह्मेति भावय । ” सर्व उद्योग सोडून मी ब्रह्म आहे अशी जाणीव करून घे असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. अशा या अध्यात्मशक्तीचा संग्रह करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून झटले पाहिजे. आपणां सर्वांवर परमात्म्याचा अनुग्रह असो.

home-last-sec-img