Literature

अपरोक्षज्ञान १

विजयादशमी हा मोठा आनंदाचा दिवस. ह्या दिवशी लहानापासून, मोठ्यापर्यंत सर्वजण आनांदित असतात. हिलाच ‘विद्यादशमी’ असेहि म्हणतात. ह्या नावावरून तिचे महत्त्व उघडच दिसते. देव, मानव ह्या सर्वांचा विजयी असा हा अत्यंत मंगल दिवस आहे. विद्यारंभासाठी तर हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. निसर्गाचे मनोहरत्व दृग्गोचर होणारी हीच एक मंगल वेळ आहे. कोणत्याहि मंगलकार्यास प्रारंभ करण्यास व ते निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास हा एक सुयोग्य सुमुहूर्त आहे. वैदिकधर्मपरंपरेस अनुसरून आलेला हा दिवस परमार्थासाठी उपयोगात आणून बाल्यावस्थेपासून स्वतःवर झालेल्या संस्कारामुळे आपल्या व दुसऱ्याच्या उद्धारासाठी, ब्रह्मचर्याश्रमात असताना शुभ अशा ह्या विजयादशमीच्या दिवशीच मी तपश्चर्येसाठी बाहेर पडलो. ‘तपसा किं न सिद्ध्यते ?।’ तपाने काय साध्य होत नाही ? ह्या म्हणण्याप्रमाणे आनंदित होऊन तूर्याश्रम स्वीकारासाठीहि मी हाच दिवस निश्चित केला. म्हणूनच विजयादशमीचा हा शुभ दिवस माझ्या तपोदेहरूपी जन्माचा वर्धापनदिन आहे.

मी पुण्यास विद्याभ्यास करीत असता वर्ग चालू असताना एका संदर्भात अध्यापकांनी ‘प्रत्येकाने अत्युच्च ध्येयाने प्रेरित झाले पाहिजे व ध्येयपूर्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असले पाहिजे’ असे म्हणून ‘असे ध्येय बाळगणारा मनुष्य सामान्य जनांपेक्षा श्रेष्ठ होय’ असे म्हटल्याचे मला आठवते. त्याचा विचार करीत असता ‘उपनिषद्प्रतिपाद्य आध्यात्मिक निष्ठेपेक्षा श्रेष्ठ ध्येय दुसरे कोणतेहि नाही’ असे मला आढळून आले. ह्यापूर्वीहि आध्यात्मिक विचारात गढून जाऊन ‘ते ध्येय साध्य करण्यास तप करण्यास जावे, असा विचार मनात नेहमी घोळत होताच.’ ‘ब्रह्मेतदुपास्ये तत्तपः।’ ब्रह्मस्वरूपांत निष्ठा ठेवणे हे सर्व तपांपेक्षा श्रेष्ठ तप आहे असे माझ्या मनाने पूर्णपणे ठरविले. प्रथमतः ‘तत् स्वरूप’ होऊन नंतर त्याच्या उपदेशाने इतरांचा उद्धार करता येईल अशीहि माझी खात्री झाली.

‘यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः। स तपोऽतप्यत स तपस्तप्त्वा। इदम् सर्वमसृजत । यदिदं किं च ।’ ‘ब्रह्म वा इदमग्र आसीत्तदात्मानमेवावेत् । अहं ब्रह्मास्मीति तस्मात्तत्सर्वमभवत् ।’ इत्यादि उपनिषद वाक्यांवरून परमात्म्याने ब्रह्मस्वरूपनिष्ठारूप असे असणारे तप करून जग निर्माण केले हे स्पष्ट होते. म्हणूनच जगातील कोणतेहि कार्य करावयाचे असल्यास त्या ब्रह्मस्वरूपनिष्ठेखेरीज अन्य तपाने ते साध्य होत नाही; असे समजून तेच तप वर्धन करण्यासाठी मी निश्चयपूर्वक प्रयत्न केला. ‘सर्व भविष्यन्तो मनुष्या मन्यन्ते ।’ सुसंस्कृत मानवाच्या स्वभाव धर्माप्रमाणे ब्रह्मविद्येनेच आपल्या ध्येयपूर्तीसाठी योग्य असे वातावरण त्यावेळी निर्माण होणारच असा निश्चय करून, विद्याभ्यास सोडून मी तपश्चर्या करण्यास निघालो. पूर्वाश्रमातील माता-पिता हे श्रीसमर्थ संप्रदायी असल्याने गर्भात असल्यापासून झालेल्या संस्कारांचा परिणाम म्हणूनच ‘श्रीसमर्थ हेच आपले अशी दृढ भावना झाली व ब्रह्मनिष्ठा वाढविण्यासाठी ह्याच विजयादशमीच्या गुरु होत सुमुहूर्तावर मी पुण्याहून सज्जनगडी जाण्यास निघालो. ते ब्रह्मनिष्ठाप अद्यापहि चालू आहे. ‘काल सार्थकचि करावा । जनासहित।।’ लोकांना बरोबर घेऊन कालाचे सार्थक करावे असा श्रीसमर्थांचा उपदेश आहे.

जगदोद्धार ही गोष्ट सामान्य नाही. ते साक्षात् परमात्म्याचे काम आहे. ‘तत्प्रकाशो मुक्तावतारेषु ।’ जगदोद्धार करणारे अवतारी पुरुष हे परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले ज्ञानीच होत. त्यांच्या ठिकाणी परमात्मा आपले जगदोद्धाराचे सामर्थ्य प्रकट करतो असाच ह्या सूत्राचा भावार्थ आहे. असा संयोग कोणामध्ये होईल? हे सांगणे कठीण आहे. ज्ञानी लोक स्वतःच्या योग्यते प्रमाणे स्वतःस शक्य होईल त्याप्रमाणे सद्धर्म व ज्ञानविज्ञानाचा प्रचार प्रकर्षत्वाने करीत राहून बहिर्मुखता कमी करीत व अंतर्मुखता वाढवीत वाढवीत अधिकाधिक काल निर्विकल्प समाधीतच स्वस्थपणे घालवितात. सामान्यास गाढ झोपेत कांहीहि कळत नाही; तद्वत् ज्ञान्यास समाधीत कांहीहि समजत नाहीं.

सुप्ती व समाधी ह्यांचे स्पष्टीकरण करणे झाल्यास सुप्तीची अमावस्येच्या अंधान्या रात्रीशी तर समाधीची पूर्ण चंद्रप्रकाशी पौर्णिमेच्या रात्रीशी तुलना करता येईल. सुप्ती व समाधीच्या वेळी मीपणाचे ज्ञान रहात नसल्यामुळे सृष्टिप्रपंचाबद्दल जाणीव कशी असणार ? समाधिनिष्ठास बाहा जगाशी व त्यांच्या कार्याशी कोणतेच कर्तव्य नसते. ‘तस्य कार्य न विद्यते ।’ असे श्रीमद्भगवद्गीतेत तिसऱ्या अध्यायातील सतराव्या श्लोकात म्हटले आहे. ‘तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिस्तद्यदात्मविदो विदुः ।’ अग्नि, सूर्य, चंद्र, विद्युत् ह्या सर्वांच्या प्रकाशास प्रकाशित करणाऱ्या ब्रह्म प्रकाशास योग्य अशा आत्मनिष्ठेनेच ओळखिले पाहिजे. ह्या सुखापुढे इतर सर्व सुखे तुच्छ होत. ‘तस्य मात्रामुपजीवन्ति ।’ ह्या ज्ञानाच्या आनंदाचा अंशरूप आनंद इंद्रदिदेवता आणि निरनिराळे लोकपाल ह्यांना प्राप्त होतो.

लोकोद्धाराचा संकल्प केला नसला तरी साधक आपल्या अभ्यासाच्या दृढतेसाठी ज्ञानविचार करीतच असतो.

‘तच्चिन्तनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनम् । एतदैक परत्वं च ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः ।।’

ब्रह्माभ्यासाचे लक्षण सांगताना पंचदशीकारांनी ब्रह्मतत्त्वाचे चिंतन, त्याचे प्रतिपादन, चर्चा अशा कोणत्याहि रीतीने अखंडपणे अद्वितीय भावाने ब्रह्मतत्त्वाचा अभ्यास करणे ह्यालाच ‘ब्रह्माभ्यास’ म्हटले आहे.

‘अद्वितीयंब्रह्मतत्त्वं न जानन्ति यथो तथा । भ्रान्ता एवाखिलास्तेषां कैर्मुक्तिः कैर्ह वा सुखम् ॥’

जोपर्यंत अद्वितीय ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्व लोक भ्रमिष्टच होत. अशांना मुक्ति कधी मिळणार ? व त्यांना सुख कसे प्राप्त होणार ? असे वाराह उपनिषदात म्हटले आहे.

‘अद्वैतं भावयेहक्त्वा गुरोर्देवस्यचात्मनः ।’

श्रीगुरु, परमात्मा व आपले स्वताचे स्वरूप ही सर्व एकच अतहास्वरूप आहेत अशी भावना निरंतर बाळगली पाहिजे.

‘अनाममाश्रुत्य जीवन्मुक्तत्वमाप्नुयात् ।’

अद्वैतग्रहह्मनिष्ठा प्रवाहाचा आश्रय करूनव भवसमुद्र पार करून जीवन्मुक्ति प्राप्त केली पाहिजे. ह्याशिवाय कोणताही उपाय नाही.

‘द्वितीयादूवै भयं भवति ।। भिन्न भावनाच भय उत्पन्न करते.

मायामात्रामिदं द्वैतमद्वैतं परमार्थतः ।’ थोडक्यात मायेचे स्वरूप सांगावयाचे झाल्यास ‘अज्ञान’ हेच ते स्वरूप होय. हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत भिन्न भावना असणारच. ज्ञानाने परमार्थत्व रुजून अद्वैत ब्रह्माची जाणीव होते. हे जग विविध भिन्नत्वयुक्त आहे.

‘अज्ञानमेवात्यहि मूलकारणम् ।’ अद्वैत ब्रह्मस्वरूपाचे अज्ञानच मूळ कारण आहे असे रामगीतेत श्रीराम प्रभूंनी सांगितले आहे.

‘अज्ञानेनावृतं ज्ञानं तेनमूह्यन्ति जन्तवः । अज्ञानाच्या आवरणाने ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आच्छादित झाल्यामुळेच जीव भिन्नत्व, विविधत्व ह्यांनी युक्त असलेल्या जगात मोहित झाले आहेत, असे श्रीकृष्ण भगवानांनी भगवद्गीतेत सांगितले आहे.

‘अज्ञानादेव संसारो ज्ञानादेव विमुच्यते ।’ आपल्या अज्ञानामुळेच मानव संसारास चिकटून राहतो. सूर्यप्रकाशाने धुके व अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणें स्वस्वरूपज्ञानाने संसारापासून सुटका होते.

‘ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषान्नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।

जे ज्ञानाच्या द्वारे आत्मस्वरूपासंबंधीचे अज्ञान नाहीसे करू शकतात त्यांचे आत्मज्ञान सूर्याप्रमाणे प्रकाशित होते; असे भगवद्गीतेत सांगितले आहे. आत्मज्ञान होत असताना अज्ञानरूपी रात्र घालवून मानव अद्वितीय सूर्याप्रमाणे असलेला ब्रह्मभाव प्राप्त करू शकतात.

‘एकमेवाद्वितीयं ब्रह्म ।’ एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ।’

ब्रह्म हे स्वतःच अद्वितीय आहे. त्याच्या अज्ञानामुळेच भिन्नत्व, विविधत्व दिसते. ब्रह्माच्या ज्ञानानेच ते अज्ञान रञ्जुसर्पाप्रमाणे आपोआप नाहीसे होणे सहज शक्य आहे. ज्ञान, अज्ञान ह्यांची व्याख्या निरालंबोपनिषदात केली आहे, तिचा विचार करू या.

‘ज्ञानमिति च देहेन्द्रियनिग्रहस्तद्गुरु पासनश्रवणमनननिदिध्यासनैर्यद्यदृग्दृश्यस्वरूपं सर्वान्तरस्थं सर्वसमं घटपटादिपदार्थमिवाकारं विकारेषु चैतन्यं विना किंचिन्नास्तीति साक्षात्कारानुभवो ज्ञानम् ।’ देह, इंद्रिय, मन ह्यांचे संयमन, सद्गुरुच्या ठायी अनन्यभक्ति, वेदान्त श्रवण, त्याचे युक्त मनन, निश्चयपूर्वक ब्रह्मात्मस्वरूपनिदिध्यास, त्यायोगे पाहणे व दृग्गोचर होणाऱ्या दृश्य वस्तूंत अंतस्थ असणारे, सर्वांशी सम, घटांत मृत्तिका, वस्त्रामध्ये सूत, निर्माण झालेल्या सर्व वस्तूंमध्ये अविकारी स्वरूपांत स्वतःच व्यापून राहिलेले, मातीपासून घट, सुतापासून वस्त्र ह्याप्रमाणे उत्पन्न झालेले सर्व नाम, रूप आदि स्वतः असून म्हणजेच एका आत्मचैतन्याशिवाय कांहीहि नाही. अशा प्रकारे स्पष्ट रीतीने अनुभवास येणारा जो आत्मसाक्षात्कार त्यालाच ‘ज्ञान’ असे म्हणतात.

‘अज्ञानमिति च रज्जो सर्पभ्रान्तिरिवाद्वितीये सर्वानुस्यूते सर्वमये ब्रह्मणि देवतिर्यङ्नरस्थावरस्त्रीपुरुषवर्णाश्रमबन्धमोक्षोपाधिनानात्मभेदकल्पितं ज्ञानमज्ञानम्।’ ज्याप्रमाणे दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो त्याप्रमाणे अद्वितीय, सर्व हृदयस्थ, सकलरूप असणारे जे एकमेव ब्रह्म त्यामध्ये देवता, यक्ष, राक्षस, भूतपिशाच्चादि, पशुपक्षी की कृमीकीटक, वृक्षलतादि, स्त्रीपुरुष, वर्णाश्रम, बंधमोक्ष असे विविध नामरूपांच्या उपाधीने युक्त नानात्म भेद आहेत. असे कल्पित ज्ञान असणे ह्यासच ‘अज्ञान’ असे म्हणतात.

अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे. त्याच्या विरुद्ध किंवा विपरीत भावना यासच आपण मिथ्याज्ञान म्हणतो आणि त्यालाच भ्रांति, अध्यारोप, अध्यास असेंहि म्हणतो. महोपनिषदांतील पाचव्या अध्यायाच्या १२९ ते १४२ व्या श्लोकामध्ये अज्ञान हे मन, बुद्धि, अयथार्थ ज्ञान, क्रिया, अहंकार, चित्त, प्रकृति, मल, कर्म, बंध, पूर्यष्टक, अविद्या, इच्छा अशा अनेकविध रीतीने समजावून सांगितले आहे. त्या अज्ञानास असतू, जड, तम, मोह, तुद्य, अशी नावे दिलेली आढळतात. अद्वितीय ब्रह्मतत्वात ज्यामुळे तविरुद्ध भिन्न, विविधता इत्यादि दिसून येतात त्यासच ही सर्व नावे दिली आहेत. हेच ह्याचे तात्पर्य आहे.

सजातीय, विजातीय, स्वगत वगैरे कोणतेहि भेद नसणारे म्हणूनच निर्गुण, निराकार असे जे अखंड ब्रह्म, त्या ब्रह्मात किंचितदि भिन्नत्व आढळून येत नाही, हे निःसंशय.

‘असत्कल्पो विकल्पेति यं विश्वमित्येकवस्तुनि । निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदा कुतः ।।’ एकमेव अशा ब्रह्मामध्ये जग कल्पिणें हा विकल्प खोटा आहे. निर्विकार, निराकार, निर्विशेष असे असूनहि सर्व ठिकाणी व्यापलेल्या ब्रह्मामध्ये भिन्नता कोठून असणार ?

‘एकात्मके परतत्त्वे भेदकर्ता कथं वसेत् ।” एकात्म म्हणजे अद्वितीय असे जे ब्रह्मतत्त्व त्यामध्ये भेद उत्पन्न करणारा कसा असू शकेल ? अध्यात्मोपनिषदात आक्षेपकांना हा प्रश्न विचारला आहे.

दोरीत सर्प, वृक्षात भूत किंवा चोर, शिंपल्यात चांदी, वाळवंटात मृगजळ, स्फटिकात रेषा ह्याप्रमाणेच ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भिन्नता, विविधता ह्यांनी युक्त असणारे भासमान जग हा आभास भासमान होत असल्याने भ्रमयुक्त अशी जन्ममरणादि दुःखे आपली पाठ सोडणार नाहीत; हे ध्यानात धरून, हे सर्व अज्ञान नाहीसे करून, ब्रह्मस्वरूपात विलीन होऊन, जन्ममरणादि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी योग्य संस्काराने एकात्म ब्रह्मभावना निश्चयरूप साधनाने वाढवीत जाणे ह्यालाच ‘मोक्षमार्ग असे म्हणतात. ह्याच्याविरुद्ध भिन्नता, विविधता, देहाभिमान, विषयसुखकल्पना, कर्तृत्व, भोतृत्व इत्यादि संस्कार वाढविणे हे होय. हा संसारमार्ग आहे. असे वेदोपनिषदांत म्हटले आहे. देहरूपी नावेत बसून पुढे जाणान्या व्यावहारिक जीवनरूपी समुद्राचा प्रवास करणाऱ्यांनी अद्वितीय ब्रह्मेकता ध्रुवतान्याप्रमाणे अचल आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. ‘ज्ञात्वा कर्माणि कुर्वीत । सोऽहं भावयेत् । सविजिज्ञासितय्यः । ॐ इत्यात्मानं ब्रह्मनैक कुर्यात् । ॐ इत्यात्मानं युन्जीत ।’ इत्यादि वाक्यांचे हेच तात्पर्य आहे.

अन्नपूर्णोपनिषदाच्या प्रथमाध्यायाच्या सुरुवातीलाच पंचविध भ्रमांचे वर्णन आहे व त्या भ्रमांचे निराकरणहि केले आहे.

‘जीवेश्वरौ भिन्नरूपाविति प्राथमिको भ्रमः ।” जीव व ईश्वर भिन्नभिन्न रूपे आहेत असे मानणे हा पहिला भ्रम होय.

‘बिम्बप्रतिबिम्बदर्शनेन भेदभ्रमो निवृत्तः ।’ बिंब प्रतिबिंबात जसा भेद नसतो त्याचप्रमाणे ईश व जीव ह्यांत भेद नाही.. अशा प्रकारे प्रथम भ्रमाचे निराकरण केले आहे.

‘आत्मनिष्ठं कर्तुगुणं वास्तवं वा द्वितीयकः । आत्म्यात दृग्गोचर होणारे कर्तृत्व हे खरे की खोटे ? हा दुसरा भ्रम होय.

‘स्फटिकलोहितदर्शनेन पारमार्थिक कर्तृत्वभ्रमो निवृत्तः ।’ देहादि संघातजन्य आरोपांस साक्षीभूत आत्म्यामध्ये कल्पिणे म्हणजे जवळ असलेल्या तांबड्या फुलाचा स्फटिकात आरोप करण्यासारखे आहे. हे दुसन्या भ्रमाचे निराकरण होय.

‘शरीरत्रयोसंयुक्तो जीवः सङ्गी तृतीयकः ।’ स्थूल, सूक्ष्म, कारणरूप असे तीन प्रकारचे देह आहेत. त्याने संयुक्त असा जो जीव तो निःसंग असणार नाही हे निःसंशय. असा जो भ्रम भ्रम होय. तिसरा

‘घटमठाकाशदर्शनेन सङ्गीति भ्रमो निवृत्तः ।” घटमठामध्ये असणारे आकाश घटपटदीत जसे संगयुक्त नसते तसे स्थूल सूक्ष्मादि देहात असणारा आत्मा त्यांच्याशीं संगयुक्त नसतो हे तिसन्या भ्रमाचे निराकरण होय.

‘जगत्कारणरूपस्य विकारित्वं चतुर्थकः ।’ वृक्षाच्या उत्पत्तीने बीजामध्ये ज्याप्रमाणे विकार उद्भवतो त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीमुळे ब्रह्म विकारी होते हा चौथा भ्रम होय.

‘कनकरुचकदर्शनेन विकारित्वं भ्रमो निवृत्तः । सुवर्णालंकाराचा दृष्टांत देऊन चौथ्या भ्रमाचे निराकरण केले आहे. कारणरूप असलेल्या ब्रह्मापासून उत्पन्न झालेले जग सोन्यापासून घडलेल्या अलंकारांसारखे आहे. दागिन्यात मूलद्रव्य सोनेच असते. त्यात कोणताहि फेरबदल होत नाही. त्याचप्रमाणे जगकार्यामुळे ब्रह्मातहि कोणताच फेरबदल होत नाही. उदाहरणार्थ, सोन्याची बांगडी पाहिली तर तिच्यात सोन्याखेरीज कांहीहि नसते व बांगडीरूपी विकार नाममात्रच असतो हे निश्चित, त्याचप्रमाणे सर्वत्र एकाच प्रकाराने असणाऱ्या ब्रह्मास अज्ञानाने जग असे म्हणणे हा नाममात्र विकारच होय. बांगडीचे अस्तित्व, तिचे भासमान रूप, तिच्यावरील आसक्ती हे सर्व सोन्याशीच संबंधित आहेत. बांगडी मोडल्यास निव्वळ सोनेच शिल्लक राहते त्याप्रमाणे जगाचे भासमान होणारे अस्तित्व, ममत्व, ब्रह्माशी संबंधित असल्याने जग नष्ट झाल्यानंतर ‘एकमेवाद्वितीय ब्रह्मच शिल्लक राहते. सोन्याच्या दृष्टीने बांगडी वगैरे ही नामरूपे त्यातच विलीन होतात. त्याप्रमाणे ब्रह्म दृष्टीने विचार केल्यास माया किंवा अज्ञानाचे कार्यरूप जे जग, त्या जगातील सर्व नामरूपादि ब्रह्मातच विलीन होतात. सर्वकाळ एकमेव असणारे ब्रह्म जसेच्या तसेच शिल्लक राहते.

‘कारणाद्भिन्न जगतः सत्यत्वं पंचमो भ्रमः ।’ आपण आता पाचव्या भ्रमाचा विचार करू. कारणरूप ब्रह्माच्या विरुद्ध असणारे जगच सत्य आहे अशी कल्पना होणे हा पाचवा भ्रम होय. कारणरूप ब्रह्म हे एकमेव असल्याने त्यास जग असे दुसरे नावच नाही. जग उत्पन्न झाल्यानंतर ते ब्रह्मापेक्षा भिन्नलक्षण असल्याने ह्या जगव्यवहारात ब्रह्मरूपाची ओळखसुद्धा विसरून जाऊन कारणरूप ब्रह्मापेक्षा वेगळे असणारे जग एक सत्य आहे असे आपण काँ मानू नये ? असा कांहींचा भ्रम आहे.

‘रज्जु सर्प दर्शनेन कारणाभिनजगतः सत्यत्वभ्र मो निवृत्तः ।’ दोरीस भ्रमाने तिच्यापेक्षा वेगळा असा साप समजणे जसे योग्य नाही त्याप्रमाणे आपणांस कारणीभूत असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी त्यापेक्षाहि वेगळे असणारे जग खरे आहे असे भ्रमाने मानणे हे रञ्जुसर्पदृष्टांताप्रमाणे जग सत्यत्व भ्रमाचे निराकरण होय.

सामान्यपणे भ्रम हा सोपाधिक व निरूपाधिक असा दोन प्रकारांनी उत्पन्न होतांना आढळतो. मृगजळाचा भास होणे हे सोपाधिक भ्रमाचे उदाहरण आहे. मृगजळ मिथ्या आहे हे जरी लक्षात आले तरी सुद्धा प्रखर ऊन असेपर्यंत वाळवंटात मृगजळ भासमान होतेच होते अथवा आपण डोळ्यास निळ्या रंगाचा चष्मा लावून त्यातून उन्हाकडे पहात असता ते निळेच दिसते. हा भास असला तरी जो पावेतो निळ्या रंगाचा चष्मा आपल्या डोळ्यावर तो पावेतो ऊन निळेच दिसणार. हा सोपाधिक भ्रम होय. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत भासमान होणारा भ्रम कायम राहणारच. शुक्ति-रजत दृष्टांतहि सोपाधिक भ्रमाचेच उदाहरण आहे. रज्जुसर्प हे मात्र निरूपाधिक भ्रमाचे उदाहरण आहे. रञ्जुसर्प मिथ्या आहे हे लक्षांत येताच तत्क्षणीच रज्जूतील सर्पभ्रान्ति नाहीशी होते. स्थाणु पुरुषाचा दृष्टांतहि निरूपाधिक भ्रमाचे उदाहरण म्हणता येईल. सोपाधिक भ्रमाचे उदाहरण असलेल्या मृगजळाप्रमाणे जग हे मिथ्या आहे असे I आपल्या लक्षांत आले तरी जोपर्यंत बहिर्मुखवृत्ति शिल्लक आहे तोपर्यंत नेहमीप्रमाणे जग इंद्रियगोचर होतच राहील व जसजशी अंतर्मुखदृष्टी हड होत जाईल तसतशी रज्जुसर्पाच्या उदाहरणाप्रमाणे जगासंबंधी जो निरुपाधिक भ्रम आहे तो अनुभवाने हळूहळू नष्ट होईल. निर्विकल्प समाधीत सुषुप्तिप्रमाणे कांहीसुद्धा दृग्गोचर न होता एकमेवाद्वितीय असा आनंदच प्राप्त होईल.

‘एकमेवाद्वितीयं ब्रह्म ।’

हरिःॐ तत्सत् !

home-last-sec-img