Literature

अमरप्रभा

‘अमर-प्रभा’ प्रभा म्हणजे प्रकाश. अमरप्रभा म्हणजे ज्यास नाश नाही असा प्रकाश. मग असा अविनाशी प्रकाश कोणता? याविषयी संशोधन करून त्याची माहिती प्राप्त करून घेणे हाच आजचा विषय आहे.

सूर्यप्रकाशाचे उदाहरण घेतल्यास तो प्रकाश शाश्वत आहे असें म्हणता येणार नाही. कारण तो प्रकाश उदय व अस्त यांच्याशी निगडित आहे. अस्त पावणारा प्रकाश हा अमरप्रकाश होऊच शकत नाही. संपूर्ण जगास तो प्रकाश देत असला तरी त्याचा अस्त होत असल्याने सूर्यप्रकाश हा शाश्वत प्रकाश होऊ शकत नाही. चंद्राचे उदाहरण वरील प्रमाणेच आहे. सूर्य-चंद्राचा प्रकाश डोळयाने दिसतो पण डोळे मिटल्याने तो दिसेनासा होतो. डोळे मिटले तरीहि दिसणारा, सर्व इंद्रिये व मन यांना उजाळा देणारा, उदयास्तरहित, नित्य, निर्विकारी, असा जो ज्ञान-प्रकाश, त्यालाच आपण अमर प्रकाश म्हणतो.

सूर्य, चंद्र, अग्नि इत्यादिकांचा प्रकाश कितीहि विशाल असला तरी त्याचा अनुभव सदासर्वकाळ मिळणे शक्य नसते. तसेच त्यांच्या प्रखर तेजानें आपले डोळे दिपून झाकले जातात. यावरून अशाश्वत अशा या प्रकाशापेक्षा शाश्वत-प्रकाश निराळा आहे हे उघड ठरते. बाह्यजगत व अंतर्जगत असे या जगाचे दोन प्रकार आहेत. बाह्य जगांत दिसणाऱ्या वस्तु व त्यांचे परिणाम यालाच बाह्य जगत म्हणतात. अंतर्दृष्टीनी उद्भवणारे विचारतरंग व त्यापासून मनावर होणारे परिणाम याला अंतर्जगत असे म्हटले जाते. अंतर्बाहय जगतास प्रकाशित करणारा व त्याला कारणरूप असलेला आत्मप्रकाशच अमरप्रभा आहे
असें निर्विवादपणे म्हणता येईल.

“अंचति, प्रकाशते इति आत्मा” नेहमीच स्वप्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या वस्तूस आत्मा असे म्हणतात. या जगात सर्व प्राणिमात्र सुखासाठी आपल्या कल्पनेनुसार नानाप्रकारचे प्रयत्न व कष्ट करीत असतांनाहि परिणामी त्यांच्या पदरी दुःखच येते याचे कारण काय ? तर भ्रामक बाह्यजगत सुखकर आहे अशा कल्पनेने त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे व खरे सुख कोणते यांची कल्पनाहि नसल्यामुळे ते दुःख भोगीत असतात. अंतर्ज्ञानी बाहय जगास ओळखू शकतो. अंतर्दृष्टी नसणारा बाह्यदृष्टीने विचार करीत असल्याने तो यांत्रिक बनतो व अंतर्मनापासून दुरावतो. कोणत्याहि गोष्टीचा विचार अन्तर्दृष्टीने करावयास हवा. अन्तर्मन, इंद्रियादींना प्रेरक होऊन त्यांना प्रकाश देणारा शाश्वत आत्मप्रकाश आपण ओळखला पाहिजे. “श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वा चोहवा च स उ प्राणस्य प्राणश्चक्षुपश्चक्षुः” तो आत्मप्रकाशच श्रवणेंद्रियाचे श्रवणेंद्रिय, मनाचे मन, वाणीची वाणी, प्राणाचा प्राण व नेत्राचा नेत्र आहे, असे ओळखणारे “अमृता भवन्ति” अमर होतील असें श्रुतींनी सांगितले’ आहे.

ज्या वस्तूंना उत्पत्ति व नाश आहे त्या अविनाशी नसतात. जीस गुण, धर्म, आकार, विकार, उत्पत्ति, विनाश नाही, जी निव्वळ आनन्दमात्र व स्वयंप्रकाशी आहे, तीच अमरप्रभा होय.

परमात्म्याचा हा अमरप्रकाश बाह्यदृष्टीने पाहू गेल्यास दिसत नाही. डोळयांनी पहाणे हा सुद्धा अमरप्रकाशाचाच अंश असल्यामुळे आपण त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करूं पहाणारा, पहाणे व दिसणाऱ्या वस्तु हे सर्व परमात्मप्रकाशांत एकरूप आहेत. त्या परमात्म प्रकाशाचा साक्षात्कार झाल्यावर हा पहाणारा, ही पहाण्याची वस्तु व ही दृष्टि हे तीन प्रकारांच्या भिन्नतेचे अस्तित्व रहातच नाही.

नाभि, हृदय, नासिकाग्र, भ्रूमध्य अशा स्थळी दृष्टी ठेवून केले जाणारे ध्यान वाढत गेल्यास सुरुवातीस मनाला आनंद देणारी अनेक दृश्ये मनःचक्षूपुढे दिसू लागतात. “नीहार धूमार्कनलानिलानाम् । खद्योत विद्युत्स्फटिकाशनीनाम् ।। एतानि रूपाणि पुरस्सराणि । ब्रह्मण्यभिव्यक्तकराणि योगे ॥” धुक्याप्रमाणे, सूर्य प्रकाशाप्रमाणे, अग्निप्रमाणे तांबडा, काळसर, पिवळसर, निळसर, व विद्युल्लतेसारखा, स्फटिकासारखा, चक्रासारखा, असे अनेक प्रकाश, ब्रह्मसाक्षात्कारापूर्वी दिसत असतात. मनोलयासाठी यांची आवश्यकता आहे. परंतु आत्मप्रकाश या सर्वाहून निराळा आहे. “न तेजो न तमस्ततं” तो तेजस्वरूप किंवा अन्धकारस्वरूपहि नाही. तो सर्व दृष्यवस्तूंत व्यापलेला आहे. त्यांत कोणताच वेगळेपणा नाही, “यत्रान्यत पश्यति तदल्प” जे दाखवता येतें तें अल्प. “यत्र नान्यत पश्यति नान्यच्छृणोति नान्यद्विजानाति स भृमा । ” जेथे इतर काही दिसणार नाही, ऐकू येणार नाही व समजून येणार नाही तोच निरतिशय आत्मप्रकाश होय.

“अत्रायं पुरुषः स्वयं ज्योतिः” आता आपण स्वप्नाचेंच उदाहरण घेऊ. स्वप्नांत आपला स्वयंप्रकाश दिसतो असे श्रुतींचे म्हणणे आहे. जागृतावस्थेत दृश्यमान असलेले सूर्य, चंद्र, अग्नि इ. स्वप्नावस्थेत प्रत्यक्ष नसतात. स्वप्नांत आत्मा आपल्या मनाने कल्पित असे दृश्यस्वरूप निर्माण करून तेथें भासमान होणाऱ्या सूर्यचंद्रादिकांना प्रकाश देऊन आपल्या प्रकाशाने त्यांचे ज्ञान करून घेतो. इच्छा, आलोचना, संकल्प, कामना ही सर्व मननिर्मित आहेत. यापासून होणारी सर्व कामें मनामुळेच होतात हे उघड आहे. स्वयंप्रकाशी परमात्म्याच्या मनोरूप संकल्पाने बाह्यसृष्टि निर्माण होतें त्याप्रमाणे आत्म्याकडून स्वप्नसृष्टीची निर्मिति होत असते. परमात्मा जीवरुपी असल्या कारणाने जीवनामध्ये हि सृष्टिनिर्मितीची शक्ती असते हे स्पष्ट आहे. यादृष्टीने विचार केल्याने जीव (आत्मा) व परमात्मा हे एकच आहेत हे सिद्ध होतें. उपाधीमुळे निर्मित अशी श्रेष्ठ-कनिष्ठता वगळल्यास निर्विकार, निरुपाधि असा स्वयंप्रकाश एकच आहे असे म्हणता येईल.

बाह्य जग पहाण्यासाठी डोळे व मन या दोन्हींची गरज आहे. जगाला साक्षिरूप असलेले आत्मरूप पहाण्यासाठी मात्र या दोन्हींची आवश्यकता नाही. मन परमात्मस्वरूपांत लीन झाल्यास मनाच्या योगाने अनुभवास येणारे जगव्यवहार आत्मस्वरूपातच विलीन झालेले आढळतील. असे झाल्यास सर्वकाही परमात्मस्वरूपच आहे असें दिसेल व तीच अमरप्रभा होय.

दृश्य जग व मनोभास या दोन्ही गोष्टी नष्ट झाल्यास ज्ञान कसे प्राप्त होणार ? असा प्रश्न कोणी केल्यास ” मी’ म्हणून जे काही आहे तेच ज्ञान होय असे म्हणावे लागेल. जग आणि मन यांच्या नन्तरहि शिल्लक रहाणारा जो ” मी ” तेंच आत्मज्ञान होय, आत्मरूप हे शुद्धस्वरूप आहे “मी” चे खरे ज्ञान करून घेणे म्हणजेच यथार्थ ज्ञान होय आणि तेच ज्ञान आत्मशांतीस कारणीभूत आहे.

परमात्म्याच्या ठिकाणी प्रथम उत्पन्न होणारे कार्य म्हणजे ” मी ” पणाची स्फूर्ति. पिंड ब्रह्मांडास “मी” च कारणीभूत आहे. अंधारांत दोर पडला असता आपणास तो सर्प असावा असा भास होतो तद्वत जग हे भासरूपींच आहे. म्हणून हे भासरूप जग विसरून आपल्या सत्यस्वरूपांत स्थिर होऊन अमर-स्वयं-प्रकाशस्थिति प्राप्त करून घेणे यालाच अमरप्रभा असे म्हणतात.

विषयवासना म्हणजे प्रवृत्ति व ती वासना नाहीशी करणे म्हणजे निवृत्ति होय. जगांतील सर्व भिन्नभाव, भेदाभेद घालवून, एकात्मदृष्टीने निवृत्तिमार्गात पुढे पुढे जाणे हीच अमरप्रभेसाठी प्रत्यक्ष साधना होय. गृहस्थाश्रमांतील आवश्यक कर्मकाण्ड आचरीत सर्व विषयवासनांचा योग्य असा अनुभव घेऊन, नंतर त्याच वासना हळू हळू नाहीशा करून ज्ञान-वैराग्याने परमात्मप्राप्ति करून घेणे हेच परंपरागत प्रवृत्तिमार्गाचे लक्षण होय. प्रवृत्तिमार्गाचे खरे ध्येय निवृत्तिमार्गाची प्राप्ती करून घेणे हेच आहे व निवृत्तीमार्गाचे अंतिम ध्येय परमात्मप्राप्ति म्हणजेच अमर स्वरूपाची-अमर प्रभेची प्राप्ती होय,

जगांत अविनाशी अशी एकच वस्तु आहे. ” अविनाशीत अरे अयमात्मा” आत्मस्वरूप हेच अविनाशी तत्व आहे. ज्यास उत्पत्ति आहे ते अविनाशी नाही. कारण उत्पत्ति म्हणजे एक रूप होय व रूप-दृश्यमान वस्तु ही डोळयाने दिसू शकते. जगहि एक रूपच असल्याने ते दृश्यमान आहे आणि म्हणून तेंहि उत्पन्न झालेले आहे. “अक्षरात संभवतीह विश्वं ” विश्व हे उत्पत्तितत्वाप्रमाणे उत्पन्न झाले आहे. अर्थात् त्यास उत्पत्ति असल्याने ते अविनाशी नाही. ज्याला उत्पत्ति नाहीं तें अविनाशी व अविनाशीप्रभा हीच अमरप्रभा होय. उत्पत्ति आणि लय रहित वस्तु ही अमर वस्तु होय. अशी अविनाशी वस्तु न जाणता जगांतील सुख हेच खरे सुख आहे असे म्हणणारा हा निजसुखवंचित आहे असे म्हटले पाहिजे. असा मनुष्य नेहमींच हीन, दीन असणार. हे अविनाशी तत्व न जाणणारा अविवेकी होय. “एतद्ध्येवाक्षरं गार्ह्य विदित्वा अस्मालोकास्वैती स कृपणः” असें श्रुतिवचन आहे.

“तद्विष्णोः परमं पदम् सदा पश्यति सूरयः” सुरयः म्हणजे विद्वान. हे विद्वान नेहमी परमात्मतत्व म्हणजे अविनाशी आत्मप्रभा पहात असतात “न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोपमग्निः । तमेव भांतमनुभाति सर्वे तस्य भासा सर्वमिदं विभाति ।। ” सूर्य, चंद्र, तारका, विद्युत, अग्नि वगैरेना त्यांचा प्रकाश आत्मप्रभेपासून मिळत असल्याने ते आत्मप्रभेस प्रकाश देऊ शकत नाहीत. ‘वयं ज्योतिर्हि पुरुषः ” म्हणजे परमात्मा हा स्वयंप्रकाशी आहे. ‘न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः । यदगत्वा न निवर्तते तद्धाम परमं मम ।।” सूर्य, चंद्र, अग्नि इत्यादि हे ज्यास प्रकाश देऊ शकत नाहीत तें प्राप्त झाल्यास जन्ममरणाचे रहाटगाडगें चुकतें. तेच निजसर्वश्रेय असें माझे स्थान आहे असें भगवद्गीतेत परमात्म्याने म्हटले आहे. ‘सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म” म्हणजे परमात्मस्वरूप हेच सत्य-ज्ञानरूप आहे. त्याला मर्यादा नाही ते अनंतरूप आहे. ” तदेव ब्रह्म सर्वानुभूः । अनुभूतिमयं तस्मात्सारं ब्रह्मेति कथ्यते ।” ते ब्रह्म ज्ञानरूप आहे असा अनुभव येतो.

ज्ञान हे प्रकाशरूप आहे असे म्हटले जाते. अंतर्बाह्य जगतांत लाटस्वरूपी पाण्याप्रमाणे ज्ञान सर्वत्र भरले आहे त्या ज्ञानामुळे बाह्यजगतांतील सूर्य, चंद्रादिकांचा प्रकाश आपण पाहूं शकतो. या ज्ञानरूपी प्रकाशाने जगतातील सर्व वस्तूंचे आपणांस ज्ञान होते. मन, इंद्रिये व त्यांचे कार्य या सर्वांस सर्वव्यापी आत्मप्रकाशच कारणीभूत आहे. या सर्वांचे अस्तित्व व नाश ही ज्ञानरूप प्रकाशानेच समजु शकतात. उत्पतिनाशरहित अविनाशी आत्मप्रकाश, उत्पत्तिलय असलेल्या या बाह्य जगाशी असंबंधित व नेहमी निर्विकार असतो हे उघड आहे. मृगजलाभासामध्ये सूर्यप्रकाश मुख्य असतो त्याप्रमाणे या मिथ्य जगदाभासांत आत्मप्रकाश सर्व ठिकाणी भरलेला आहे. मृगजलाच्या आभासांत सूर्यप्रकाश मुख्य कारणीभूत आहे. तसंच या जगाच्या मिथ्याभासांत आत्मप्रकाश मुख्यत्वे कारणीभूत आहे. आपल्या या व्यावहारिक जगात अनुभवास येणाऱ्या सर्व वस्तूंना कारणीभूत असा हा आत्मप्रकाशच आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. “यथा रज्जुमविज्ञाय सर्व गृन्हाती वै बलात् । तथा ब्रह्म अविज्ञाय जगत् पश्यति मूढधीः॥” अज्ञानामुळे दोराचे खरे स्वरूप न जाणता तो सापच आहे असा निश्चित आभास होतो. त्याप्रमाणे ब्रह्मरूपाचे ज्ञान करून न घेतल्यामुळे अज्ञानाने जगच सत्य आहे, असा त्या अज्ञान्यास भास होतो. आपणांस दोराचे खरे स्वरूप समजल्यावर ज्याप्रमाणे सर्पाचा आभास नष्ट होतो. त्याप्रमाणेच ब्रह्मरूपज्ञानाने जगाच्या सत्यत्वाचा आभास नाहीसा होतो.

“चिन्मात्रं सर्वगं नित्यं संपूर्ण सुखमद्वयं । साक्षात् ब्रह्मैव नान्योस्तीत्येवं ब्रह्मविदां स्थितिः ” चिन्मात्र, सर्वव्यापी, नित्य, पूर्ण, सुखरुपी, अद्वितीय असे फक्त साक्षात् ब्रह्म हेच असून इतर, कोणीहि नाही. अशीच ब्रह्मज्ञान्यांची स्थिती असते. “येनेक्ष्यते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च । स्वाद्वस्वादु विजानाति तत्वज्ञान मुदीरितं ” ज्यामुळे श्रवणादि ज्ञानेंद्रियकर्मे, बोलणें आदि कमेंद्रियकर्मे संकल्प, निश्चय, चिंतनाहि मनाची कर्मे यांचा भास होत नाही अशा या ज्ञानप्रकाशास प्रज्ञान असें म्हणतात. “प्रज्ञानमेव तद्ब्रह्म सत्यं प्रज्ञानलक्षणम् । एवं ब्रह्म परिज्ञानादेव मत्योमऽमृतो भवेत् ॥” हे प्रज्ञानच परब्रह्म होय. तेच सत्य व शाश्वत असू शकते. अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यास मर्त्य अमर होतो.

” सर्वे त तत्प्रज्ञानेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञाप्रतिष्ठे प्रज्ञानं ब्रह्म । ” इंद्रियादि कर्माचें ज्ञान, मन, बुद्धि यांच्या संवेदना श्रद्धा-अश्रद्धा, धैर्य-अधैर्य वगैरे भाव, देवता, राक्षस ( तिर्थक ) व मानवरूप असलेल्या या चराचरांचे दर्शन घडविणारे एकमेव प्रज्ञान ब्रह्मच होय. यासच अविनाशी ज्ञान, शाश्वत प्रकाश, अमरप्रभा असे म्हणता येईल. ही प्रज्ञानदृष्टि सर्वांत असते. सर्वांना सर्व व्यवहारांत आवश्यक असलेली अंतश्चक्षुची दृष्टि म्हणजेच प्रज्ञान. हे त्रिकालाबाधित आहे. हे प्रज्ञान म्हणजेच परब्रह्म, असेंच ऐतरेय उपनिषदांत सांगितले आहे.

एकाच्या ज्ञानाने इतर सर्वांचे परिज्ञान करून देणाऱ्या तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मविद्या अथवा अध्यात्म विद्या या आहेत. “कस्मिन्नु विज्ञाते सर्वमिदं विज्ञान भवतीति । ” असें मुंडकोपनिषदांत शौनक ऋषीनी अंगिरस ऋषीस विचारले आहे. ” मैत्रीय्यात्मनि खल्वरे दृष्टे श्रुते मते विज्ञाते इदं सर्व विदितं ॥” हाच विषय बृहदारण्यकोपनिषदात आलेला आहे. तेथें याज्ञवल्क्य ऋषीनी आपल्या अर्धांगी मैत्रेयीस उद्देशून ‘ हे मैत्रेयी ! या आत्मरूप अशा प्रज्ञानब्रह्माचा किंवा आनंदब्रह्माचा विचार करून तें आपलेच स्वरूप आहे अशी दृष्टी ठेवून तें गुरुमुखाने नीट समजून घेऊन एकांतात त्याचे मनन आणि निदिध्यास केल्याने त्याचा साक्षात्कार झाल्यावर सर्वांचे परिज्ञान होईल ” असे सांगितलें आहे. ” येना श्रुतश्रुतं भवत्यमतं यतमविज्ञातं विज्ञातमिति कथं नु भगवः स आदेशो भवतीति ” असे छांदोग्योपनिषदांतील सहाव्या अध्यायांत सांगितले आहे. श्वेतकेतूला त्याच्या पित्याने असे विचारले होते की, ‘जें एकच ऐकण्याने सर्वच ऐकू येते, अनिश्चिताचे निश्चित होते, न समजणारे समजते, न कळणारे कळते, असे जे तत्वज्ञान आहे तें तू तुझ्या गुरुकडून समजवून घेतले आहेस काय ? ”

“स मोह वै तदच्छायमशीरमलोहितं शुभ्रमक्षरम् वेदयति यस्तु सोम्य स सर्वज्ञो भवति । ” प्रश्नोपनिषदांतील या मंत्रांतहि वरील प्रमाणेच सांगितले आहे. जो निरावरण, शरीररहित, त्रिगुणातीत, या अविनाशी स्वरूपास जाणतो तोच सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा असतो. भूरेखा, वृक्षमूल, जलधारा, सर्प इत्यादि भाव एका दोरीमुळे भ्रमाने कल्पिले जातात त्याप्रमाणेच सच्चिदानंद रूप अद्वितीय, सर्वकारण, सर्वपूर्त असलेल्या ब्रह्मरूपांत भ्रमाने कल्पिलेले विविध भाग एक ब्रम्हच आहेत असे परिज्ञान होते असा या श्लोकाचा गर्भितार्थ आहे.

तावत्सत्यं जगद्भाति शुक्तिका रजतं यथा । यावन्न ज्ञानते ब्रम्ह सर्वाधिष्ठानमद्यं ।। ” जो पावेतों शिंपल्याचे खरे ज्ञान होत नाहीं तो पावेतो त्या ठिकाणी चांदीचा आभास होतो, त्याप्रमाणेच सर्वाधार असलेल्या ब्रह्मास्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय विविधतेने नटलेल्या या ऐहिक जगाबद्दलची सत्यरूपी भावना नाहीशी होणार नाही. “ब्रह्म वा इदमग्न आसीत तदात्मानमेवा । वेदहं ब्रह्मास्मीति तस्मात्तत्सर्वमभवत । ” असे श्री जगदगुरु शंकराचार्यांनी म्हटले आहे. जगाच्या पूर्वीपासून असलेले पूर्ण, ज्ञेय, केवल ज्ञानरूप, साध्यसाधन विरहित, स्वयमेव आनंदरूप असें एकमेव ब्रह्मच आहे. ते ब्रह्म “ अहं ब्रह्मास्मि ” म्हणजे मी ब्रह्म आहे असें जाणावे. या जाणण्याच्या निजशक्तींतून या जगाची उत्पत्ति झाली आहे. “तद्यो यो देवानां प्रत्यबुध्यत स एव तदभवत्तथर्शीणाम् तथा मनुष्याणां । ” देवता, ऋषि, मनुष्य यापैकी ज्याने ब्रह्म जाणले तो तद्रूप होतो. “यं एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इद सर्वं भवति ।” अशा रीतीने जो मी ब्रह्म आहे असे समजून घेतो ( किंवा त्यास ज्ञान होते. ) तो अभेद दृष्टीने दृश्य जगतस्वरूप होतो; हे बृहदारण्यकांतील प्रथमोध्यायांत सांगितले आहे.

जगातील सर्व पदार्थामध्ये जसे निरनिराळे गुण असतात तसेच या ब्रह्मस्वरूपांतहि गुणवैशिष्ट्य आहे व ते म्हणजे आत्मस्वरूपामध्ये जाणत्यास विलीन करणे हे होय. ” “स योह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रहमैव भवति” असे एक वाक्य मुंडकोपनिषदात आहे. जो यथार्थाने ब्रह्म जाणतो तो ब्रह्मरूप होतो असा याचा अर्थ आहे.

मधाचे स्वरूप पाहिल्यानंतर तो कोणकोणत्या फुलामधून गोळा केला असावा हे सांगता येणे शक्य नाही त्याप्रमाणे जगत्सरभूत असलेल्या ब्रह्मस्वरूपात विलीन झाल्यावर ज्ञानीयांची गतहि तशीच होते. समुद्रास निरनिराळ्या नद्या मिळून जाऊन तद्रूप होतात तद्वत ज्ञानी मनुष्येहि ब्रह्मस्वरूप होतात. दावाग्नीच्या ज्वाला जरी निरनिराळ्या दिसत असल्या तरी त्या सर्व दावाग्नी स्वरूपांत विलीन होतात त्याप्रमाणे अविनाशी अशा ब्रह्मस्वरूपांतून अनेक भावना निर्माण होत असल्या तरी त्या शेवटी ब्रह्मस्वरूपांतच विलीन होतात.

“तमात्मस्थं येऽनु पश्यन्ति धीरास्तेषां सुखं । शाश्वतं नेतरेषां तेषां शांतिः शाश्वति नेतरेषां ॥” ज्ञानस्वरूपी परमात्म्यालाच जे ज्ञानी आत्मस्वरूप समजतात त्यांना शाश्वत सुख, अचल शांति प्राप्त होते असे कठोपनिषदांत सांगितले आहे. “ तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पंथा अयनाय विद्यते । ” परमात्मस्वरूप जाणणारा या जन्मीच अमर होतो. हा भवसमुद्र पार करून मृत्यूरहित होऊ इच्छिणाऱ्यास आत्मज्ञानाशिवाय दुसरा कोणताहि उपाय नाहीं असें श्रुतिवचन आहे. अमरप्रभा म्हणजेच अविनाशी आत्मज्ञानरूप होय. ते समजणे किंवा मिळविणे म्हणजेच तद्रूप होणे असा त्याचा अर्थ आहे.

देहातील ‘मी’ पणाचा प्रकाश डोळ्याच्या सूक्ष्मरंध्रांतून बाहेर पडतो. संपूर्ण जगाचे परिज्ञानास कारणीभूत असलेला स्वयंप्रकाशी कोण आहे अशा दिव्य दृष्टीने विचार करण्याचा प्रयत्न केल्यास ते फक्त ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मस्वरूप किंवा अमरप्रभाच आहे हेच आढळून येईल. बृहदारण्यकोपनिषदांतील चवथ्या अध्यायांतील तृतीय ब्राम्हणांत याचे विवेचन केलेले आढळते. स्वयंप्रकाशाच्या निश्चितीसाठी आपण निराळ्या दृष्टीने विचार करूं या. या ब्राह्मणांत याज्ञवल्क्य ऋषी व जनक राजा यांचा संवाद आहे.

“हे याज्ञवल्क्य ! किं ज्योतिरयं पुरुषः ? ” हे याज्ञवल्क्य ! देहांत असलेल्या पुरुषाच्या सर्व व्यवहाराचे कारण कोण ? शेवटी त्याची काय दशा होते ? ‘ असा राजा जनकानें प्रश्न करून दिवसा सूर्यास्तानंतर, रात्री चंद्रास्तानंतर व अग्नि किंवा दिवा हे नसतांना कोण प्रकाश देतो? अंधारांत वाणीरूपाने बाहेर पडणाऱ्या शब्दाने ज्ञान होते पण तेंहि नसल्यावर कोणत्या गोष्टीने सर्व व्यवहार होतात ? ” असाहि सवाल केला. त्यावर
“आत्म्यैवास्प ज्योतिर्भवतीति ।” ‘स्वयंप्रकाशी आत्मरूपी प्रकाश’ असें याज्ञवल्क्य ऋषींनी उत्तर दिले. “हृद्यन्तर्ज्योतिः पुरुषः” मीच स्वयंप्रकाशी आहे असे जे नित्यज्ञान तीच अमरप्रभा होय. हे जीवाचे यथार्थरूप आहे असे याज्ञवल्क्यानी जनकराजास समजावून सांगितले आहे. याच विषयासंबंधी श्रीमद् शंकराचार्यांनी आपल्या शिष्यांना एकाच श्लोकानें आत्मज्ञान करविले तो संवाद असा.

शिष्य – भवसमुद्र पार करण्यासाठी अज्ञ जनांना मार्गदर्शन करण्यासाठी अवतार घेतलेली परात्पर मूर्ति असलेल्या गुरूशिवाय दुसरा कोणताच उपाय नसल्याने मी आपल्या चरणी शरण आहे. आपल्या करुणाकटाक्षाने मजवर दृष्टी टाकून अमृतवाणीने संसाररूपी व्याधी नष्ट करून संसारतापभयांतून माझी सोडवणूक करावी.

आचार्य- भिन्न भिन्न प्रकारचे कष्ट करूनहि या संसारात सुख प्राप्ति नाही. विषय सुखाची ओढ निव्वळ मृगजळ आहे अशी ज्याची खात्री झाली असून त्याचा वीट आला आहे अशानांच तत्वज्ञान समजू शकेल.

शिष्य- निःसार अशा देहसुखांत काही तथ्य नाही हे माझ्या मनास पटले आहे त्यामुळे मनाला कशाचीच आशा नाही.

आचार्य- (स्वगत ) वेदोक्त विधिपूर्वक कर्म केल्यामुळे याची चित्तशुद्धि झाली आहे. उपासनाहि पूर्ण झालेली आहे. ” यथा देवो तथा गुरौ ” या म्हणीप्रमाणे यांच्या मनात गुरु व देव यांत फरक राहिलेला नाहीं.

आचार्य- ठीक आहे. बऱ्याच जन्माच्या दुःखद संस्कारामुळे या संसारातून मुक्त व्हावे अशी तुझी इच्छा आहे. पण त्या इच्छेला सत्कार्याचे सहकार्य हवें. उपासनेची पुण्याई ही हवी. या सर्वाचे एकत्रीकरण, श्रुत्यादि शास्त्रोक्त संस्कार आणि सज्जनांची संगति यामुळे नित्यानित्य विवेक, अंतर्बाह्य निग्रह, श्रद्धा, समाधान इत्यादि साधनसंपत्ति निर्माण होते. अशा अधिकारी मनुष्यास तत्वज्ञानोपदेश उपयुक्त असतो.

शिष्य – प्रभो ! आपल्या केवळ कृपेने मी खरोखरच कृतकृत्य होईन काय ? ” तरति शोकमातवित” सद्गुरुच्या मुखातून ज्याला आत्मज्ञानप्राप्ति झाली आहे असा मनुष्य शोकसमुद्र तरून जातो असें श्रुतीनी म्हटले आहे.

आचार्य- ( स्वगत ) तूं स्वयंप्रकाशी परमात्मा आहेस असे जर यास एकदम सांगितले तर ते त्यास समजणे कठीण आहे. यासाठी क्रमाक्रमाने प्रश्न विचारून मग शेवटी त्यास हे पटवून दिले पाहिजे.

आचार्य- ” किं ज्योतिस्ते बदस्व ?” या सर्व व्यवहारास कोणता प्रकाश कारणीभूत आहे?

शिष्य- ” अहनि रविरिह मे चंद्रदीपादि रात्रौ ” दिवसा सूर्याचा, रात्री चंद्र व दिवे यांचा प्रकाश सर्व व्यवहारास कारणीभूत आहे असे मला वाटते.

आचार्य- ” स्यादेवं भानुदीपादि परिकलने किं तव ज्योतिरस्ति ?” ठीक. सूर्य, चंद्र, दिवे इत्यादि बाह्य साधने नसतांना तू कोणत्या प्रकाशाने तुझे व्यवहार करतोस?

शिष्य- ” चक्षुः” डोळयाने.

आचार्य – “तन्मीलने किं?” डोळे मिटल्यावर मग?

शिष्य-“भवति हि सुतराम धीः” डोळे मिटून घेतल्याने मनोराज्य, कल्पनातरंग ते काम करतात.

आचार्य-“धिय: कि प्रकाशे ?” मनतरंगास कोण पहातो व कोण ओळखतो? स्वयंप्रकाशी कोण आहे ? पहाणे, समजणे या रूपी असलेला प्रकाशच ना?

शिष्य विचार करतो- मी पहातो, मी जाणतो, हे जे अनुभव आहेत ते मीपणामुळेच आहेत.

आचार्य- देहांतील ” मी ” पणाची जाणीव कशाने होते ? व कशी होते?

शिष्य- (स्वगत) मी पणाची जाणीव पूर्वीपासून आहे. आणि माझ्याच रूपाने माझी जाणीव मला होते. मीपणा गेल्यावर फक्त ‘ मी ” च शिल्लक राहातो. यांत कोणताच वेगळेपणा दिसत नाही. असें असल्याने माझ्यामुळेच असा विचार करून

शिष्य- माझी जाणीव माझ्यामुळेच उत्पन्न होते. ही जाणीव मीच असल्यामुळे दुसऱ्या कोणाकडून त्याची जाणीव होणार !! ती जाणीव माझ्यामुळेच होते.

आचार्य- पण तुझा “मी” पणा गेल्यावर मग काय शिल्लक राहाते ?

शिष्य- ” तत्रैवाहं” मीच.

आचार्य-” यांत तुझ्याशिवाय दुसरे काही आहे असे तुला वाटते काय ?

शिष्य विचार करतो- दुसऱ्या वस्तुचें ज्ञान होण्यापूर्वी “मी” पणाचे स्फुरण होत असते. मीपणा गेल्यानंतर ” मी ” च शिल्लक राहणे साहजिकच आहे.

शिष्य- नाही.

आचार्य- “ततः किम् ? ” दुसरी वस्तु नसेल तर मग कोणता प्रकाश तुला प्राप्त होतो?
शिष्य- दुसऱ्या कोणत्याहि प्रकाशाचा अभाव म्हणजेच स्वयंप्रकाशच मला मिळतो.

आचार्य-तू व तुझा प्रकाश ही निरनिराळी आहेत काय?

शिष्यविचार करतो.
मी हा माझा प्रकाश आहे असें ज्ञान झाल्यानंतर त्यातून मीपणा गेल्यावर फक्त प्रकाशाचाच अनुभव रहातो.
शिष्य- तिथे मी व माझे असा भेदच रहात नाही. माझ्या यथार्थ रूपाचे ज्ञान म्हणजेच मी ज्ञानरूप, प्रकाशरूप. ” तत्रैवाह ” मी त्याच स्थितीत आहे.

आचार्य- ” ततः किं तदसि?” मग काय? तो प्रकाशच मी असे ज्ञान झाल्यानंतर तूं स्वयंप्रकाशी आहेसच असें मी सुरवातीसच तुला सांगितले असते तर ते तुला समजले नसते. आता तूं कोण आहेस ? हे सांग बरें..

शिष्य- ” परमहं ज्योतिरस्मि प्रभोऽहं” मी खरोखरच स्वयंप्रकाशी अविनाशी ज्योतिरूप आहे हे मला आपण समजावून दिल्याने मी स्वतः निःसंशय अमरप्रकाश आहे ही माझी खात्री झाली आहे.

या संपूर्ण संवादाचा मूळ श्लोक असा आहे.
” किं ज्योतिस्ते वदस्वाहनि रविरिह मे चंद्रदीपादि रात्रौ ।
स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्ति ? ॥
चक्षुस्तन्मीलने किं भवति हि सुतरां धीधियः किं प्रकाशे |
तवेवाहं ततः किं तदसि परमहं ज्योतिरस्मि प्रभोऽहं ॥१॥”

आणि या श्लोकानें आजचा अमरप्रभा हा विषय पूर्ण झाला.
गुरुदेवतेच्या कृपेनें चिन्मात्र स्वप्रकाशी अशा आत्मरूपाचें ज्ञान अचल, असे आपणाठायीं वास करो !!

home-last-sec-img