परमात्मप्राप्ती म्हणजेच खरोखरचे सुख होय. परमात्मा हा एकमेव सत्य आहे हे ज्ञान जेव्हा होते तेव्हाच त्याची प्राप्ती होते. या जगातील कोणत्याही उपभोगांनी चित्तशांती लाभत नाही. जगातील पदार्थामध्ये सुख असते तर ते सुख त्याच्याप्राप्तीनंतर सुध्दा का बरे मिळत नाही ! त्यावरूनच त्यांच्यात सुख नाही ही गोष्ट निश्चित होते. मानवीजीवनाचे परमलक्ष्य असलेल्या शाश्वत, सुखरूप परमात्मप्राप्तीचा मार्ग म्हणजेच धर्माचे शासन, कारभार तो मार्ग सोडून वेगळा धरल्यास, ‘ आपण वाट चुकलो आहोत ‘ हे ज्यावेळी समजेल त्यावेळी आपण खूप दूर गेलेलो असू व मग तितकेच अंतर मागे परत यावे लागेल.
या सर्व गोष्टींना संस्कारच कारण असतात. पूर्वी अनुभविलेल्या अनुभवांनी संस्कार निर्माण होतात. त्यापासून अलिप्त रहाणेच मानवी कर्तव्य होय. मानवाला विषयलालहा असणे साहजिकच आहे व त्यालाही कारण म्हणजे संस्कार, जन्मजन्मांतरीचे संस्कार. जन्मच संस्कारांना कारण असला तरी त्याचे मूळ विषयवासनाच !!
मानवीसुख दोन प्रकारचे असते. विषयसुख व ब्रह्मसुख. म्हणजेच जागतिक सुख व पारमार्थिक सुख. मागे सांगितलेल्या सर्व सर्व गोष्टींचा विचार केल्यास यातील श्रेष्ठ सुख कोणते हे स्पष्ट होते. जगत्कर्त्याचे सुख श्रेष्ठ की त्याच्या काल्पनिक जगाचें सुख श्रेष्ठ याचा तुम्हीच विचार करा !!
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*