Literature

अश्विन वद्य तृतीया

कार्य किंवा कोणतेही कर्म केल्यावर ते नंतर नष्ट होते. नष्ट होणाऱ्या पदार्थांच्या संपर्कानेच कार्य नष्ट होते. नष्ट होणाऱ्या पदार्थांपासून शाश्वत सुख कधीतरी मिळेल काय ? म्हणूनच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. खरा आनंद प्राप्त करून, मिळवुन सुखी झाले पाहिजे. ज्याला कृतार्थ व्हावयाचे आहे त्याने निवृत्तिमार्गाचाच आश्रय घेणे आवश्यक आहे. त्याने विरक्त बनले पाहिजे, झाले पाहिजे, हेच आपण सप्रमाण सांगत असल्याची सूचना श्रुतींनी केली असून शास्त्रही तीच सूचना देते. शास्त्र म्हणते की, ‘ अरे बाबा, अशाप्रकारे विचार करून, तुझ्यामध्ये वैराग्य निर्माण करून घेऊन तूं ते सज्जनांच्या सहवासाने दृढ करीत करीत, आत्मसात करीत करीत, शेवटी मन विरक्त बनले आहे, विषयांची आशा आता राहिली नाही. सर्व पदार्थांच्याबाबत वमन केलेल्या अन्नाप्रमाणे थोडीही इच्छा वाटत नाही असा तुझा निश्चय दृढ झाला असेल तरच तूं संन्यास घे. नाहीतर हे ध्येय गाठेपर्यंत ते दृढ करण्यासाठी तूं गुरूसेवा कर, श्रवण कर ! ‘

गुरूजवळ राहून त्यांनी केलेल्या उपदेशाचे श्रवण कर. नंतर त्याचे मनन करून ते दृढ करून, पक्के करून घे आणि मग संन्यास घे. तुझ्यात कोणत्याही एखाद्या विषयवासनेची अपवित्रता असेल तर तुला पवित्र असा संन्यास मानवणार नाही. तेथे तुझा प्रवेशही होऊ शकणार नाही. म्हणून तूं सर्वप्रथम उत्तमप्रकारे वैराग्य बाणून घे व ते आत्मसात कर. त्यानंतर आत्मप्रभेने सूर्यासारखा तेजस्वी हो ! हीच जीवनमुक्ती, हेच जीवनाचे यथार्थ साफल्य.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img