Literature

अश्विन वद्य दशमी

परमात्म्याच्या ठिकाणी असलेले प्रेमच भक्ति मी ह्या जाणीवेचे ध्येय जाणून, आनंदस्वरूपाला ओळखून, समजून घेऊन आनंद उपभोगणे हीच श्रेष्ठ भक्ति होय. परमात्म्याच्या ठिकाणी भक्ति ठेवावयाची म्हणजे आपल्या स्वतःमध्येच भक्ति ठेवावयाची, कारण मी हा परमात्म्यापासून भिन्न नाही.

आपण भक्ति केली पाहिजे व ती परमात्म्यांत विलीन केली पाहिजे. या आपल्या दुर्गंधयुक्त शरीराच्या सुखासाठी उगीचच श्रम करू नयेत. या नश्वर देहापासून कोणते सुख मिळणार ?

आपण पदार्थांच्या प्राप्तीसाठी कष्ट घेतले तर ते देहाच्याच उपयोगास येतात. त्याप्रमाणे परमात्म्यासाठी श्रम केले तर, कष्ट घेतले तर परमात्माही प्राप्त होईल. परमात्म्याच्या ठिकाणी अधिकाधिक प्रेम करून परमात्मस्वरूप आईमध्ये, मुलामध्ये, सर्वांमध्ये पाहिजे, तो मोठा मुलगा, हा धाकटा मुलगा असा भेद असू नये. लहान मुलांच्यावर जेवढे ओरडावे लागते तेवढे मोठ्या मुलावर ओरडावे लागत नाही व ओरडण्याची पध्दतीही विभिन्न असते.श्रीसमर्थांना योग्यतेनुसार पाहिले पाहिजे व वागलेही पाहिजे. अनंतानंत सुखाची प्राप्ती आपल्या स्वरूपातच. विलीन होणे, स्वतःतच विलीन करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असू द्यावे.

आपणा सर्वांनाही सत्यसुखाची प्राप्ती होवो असा मी अंतःकरणपूर्वक आशीर्वाद देतो !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img