Literature

अश्विन शुद्ध चतुर्दशी

जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांचा अभिमान आणि व्यवस्था, मात्रा, गुण यासर्वांना मागे टाकणारी कोणती तरी एक अवस्था आहे. जिला जागृतीही नाही, स्वप्नही नाही, सुषुप्ती तर नाहीच नाही. जीवाचे नांव, बंध, विश्व हे ही काहीच नाही. विराट नाही. ब्रंह्मदेवही तेथे नसतो व तेजसाचे तेथे नांव निशाणही नाही. स्वप्नावस्थेच्या अभिमानाच्या दृष्टीने विष्णुही नाही आणि हिरण्यगर्भही नाही. प्राज्ञ नाही, रूद्र नाही व ईश्वरही नाही. यांच उपाधी जागृत, स्वप्न, सुषुप्ती, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत अथवा अव्यक्त आणि सत्व, रज, तम हे काहीही तेथे नसून शुध्द, बुध्द सच्चिदानंद स्वरूपच एकमेव मात्र आहे. ते अदृष्ट आहे, अव्यवहारी पण आहे. एकात्मप्रत्यय साररूप आहे असे ज्यांनी ओळखले त्यांना ‘ साक्षात्कार ‘ झाला असून तेच सुखी होत. त्यांनाच निरंकुश-तृप्ती मिळते. इतर कोणालाही तशी निरंकुश-तृप्ती प्राप्त होत नाही, मिळत नाही.

विषयांचा अनुभव घेतल्याने विषयवासना थंडावली, कमी झाली असे म्हणणे शक्य आहे काय ? अर्थात नाहीच. धगधगणाऱ्या अग्नि ज्वालेमध्ये तूप ओतले, तूप टाकले तर किंवा कोणते तरी हविष्य टाकले तर तो अग्नि जास्त प्रज्वलित होतो. त्याचप्रमाणे विषयानुभवामुळे विषय-वासना जास्त वाढते, बलिष्ट होते. कर्माच्यापासून वासनांची वृध्दी होत असते व वासनेमुळे पुन्हा कर्म करण्याची प्रवृत्ती म्हणजेच उपभोगाची प्रवृत्ती वाढते, जास्त होते. येथे अशी ही गुंतागुंत आहे म्हणून आपण या गुंतागुंतीपासून अलिप्त राहिले पाहिजे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img